Friday, March 27, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, 'वर्षा'वर खास...

Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तर खरातच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा त्यावेळी होती. सत्ता टिकवण्याची कसरत करताना खरातची केव्हाही गरज पडू शकते म्हणून शिंदेंनी खरातसाठी मंत्रालयाजवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये काही खोल्या कायमच्या बुक करून ठेवल्याची चर्चा होती. खरातसह त्याच्या काही चेल्यांचा मुक्काम नेहमीच तेथे असायचा. मंत्रालयात येणाऱ्या अनेक सिन्नरकरांची तेथे त्याच्याशी हमखास भेट व्हायची. मुंबई-गुवाहाटी व्हाया सुरत असा एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा झालेला प्रवास त्यांना थेट राज्याच्या सत्तेवर बसवण्यास कारणीभूत ठरला होता. या प्रवासाच्या आधीपासून खरातशी त्यांचा घरोबा झालेला होता असे त्याचे भक्त सांगतात.

- Advertisement -

मोठी कसरत करून मिळवलेली सत्ता सहजासहजी हातून निसटू नये, म्हणून जमवाजमवीचं राजकारण करतानाच खरातच्या विद्येचाही आधार घेतला जात असल्याची चर्चा खरातचे भक्त तेव्हा करायचे. मुख्यमंत्र्यांचे (CM) निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्याचे दार खरातला २४ तास खुले होते. शिंदेंवर येणारी ‘इडा पिडा’ टळावी यासाठी खरातच्याच पुढाकाराने थेट वर्षावरच खास पूजा झाल्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल व्हायचे आणि ते अचानक त्यांच्या मूळ गावी गेल्याचा शोध वृत्तवाहिन्यांना लागायचा. मुख्यमंत्री सर्व ताण तणाव विसरण्यासाठी गावात जाऊन शेतीत रमल्याचा शोधही काहींना लागायचा. मात्र, मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या खरातकडे त्यांचे लक्ष जायचे नाही. खरातच्या सल्ल्यानेच काही पूजा विधी करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या दरे गावी दाखल व्हायचे असे खरातचे भक्त नंतर बाहेर सांगायचे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर

खरातने सांगितलेले सर्व मार्ग अवलंबल्या नंतर पुढच्या निवडणुकीत चमत्कार झाला आणि जिथे दहा-वीस आमदार निवडून येणे शक्य नाही, असे राजकीय ज्योतिषाचार्य छाती ठोकपणे सांगायचे, तेथे शिंदेंचे पन्नासहुन अधिक आमदार (MLA) निवडून आले होते. एवढी मोठी किमया केल्यानंतर पुन्हा आपल्यालाच मुख्यमंत्री करतील असं खरातनेही सांगितलेलं असल्याने शिंदे खुश होते. मात्र, शिवसेनेत उभी फूट पाडण्यासाठी आपल्यातील सारे कसब रात्र अपरात्र न पाहता पणाला लावणाऱ्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याची बोच सारखी सलत होती. स्वतःच्या ताकदीवर भाजपाचे १३० च्या आसपास आमदार निवडून आल्यावर ते शांत बसणे शक्य नव्हते.उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे यांच्या पद टिकवण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपी फडणवीसही पाहतच होते. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याचा हायकमांडचा निर्णय झाल्यानंतर अपमानाचा घोट पचवत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते.

त्यानंतरही शिंदेचं खरातवरील प्रेम कमी झालेलं नव्हतं. अधून-मधून त्यांच्या पूजा-अर्चा सुरूच होत्या. हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घेण्याची फडणवीसांनाही उत्सुकता लागल्याची चर्चा त्यावेळी खरातचे भक्त करायचे. सुरत-गुवाहाटीची तयारी करण्यासाठी मध्यरात्रीनंतर वेश बदलून जाणाऱ्या फडणवीसांकडे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर खरातही जाऊ लागल्याची चर्चा त्यांच्या भक्तांमध्ये व्हायची. त्याचवेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प बसलेले नव्हते. आपल्या ४०-४२ आमदारांच्या जोरावर त्यांनी आपल्यासह कुटुंबियांवरील असंख्य खटले निकाली काढले होते. त्यांची ‘ईडी’ची भीतीही कमी झाली होती. ‘अर्थ’ सारखं राज्याचं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे असल्यामुळे भाजपतील मातब्बरांच्या फाईल्सही त्यांच्या हाताखालून जाऊ लागल्या होत्या. फडणवीसांची अस्वस्थता वाढवणाऱ्याच या घटना होत्या. त्यातून त्यांना खरातची गरज पडू लागल्याची चर्चा खरातचे भक्त करत होते. त्यामुळे अर्ध्या रात्री खरातच्या त्यांच्याकडे चकरा सुरू वाढल्याचे भक्त आपसात सांगू लागले होते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या मंदिरासाठी २०१८ साली सरकारकडून निधीची ‘खैरात’; सभामंडप, भक्तनिवास बांधकाम, चेंजिंग रूमचा समावेश

त्यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली. अजितदादा ‘एनडीए’ला सोडचिठ्ठी देणार यासारख्या वार्ता पसरू लागल्या होत्या. विरोधी पक्षात बसून पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवायची आणि सन २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढत मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने अजितदादांची वाटचाल सुरू झाली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरणे साहजिक होते. त्यामुळे ते खरातच्या अजूनच जवळ गेल्याची चर्चा होती. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्सही आपल्याजवळ असल्याचा बॉम्ब अजितदादांनी फोडला होता. त्यामुळे ‘खासगी चार्टर’ विमानांमध्ये फिरणाऱ्या खरातचा भाव वधारला होता. खरातचे अनेक भक्त हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. आपल्या साहेबाचा वधारलेला भावही त्यांना उत्साहीत करत होता. त्यातूनच चर्चेचा जोर वाढत गेले.

कारनामे उघड होण्याचे पुणे कनेक्शन

नर्मदा परिक्रमेत १५-१७ वर्षांपूर्वी भेटलेल्या खरातच्या प्रेमात पडलेला एक भक्त पुण्यात राहतो. खरातला पैसे कमावण्याचा जमिनीसारखा सोन्याचा मार्ग या भक्ताने दाखवल्याची चर्चा आहे. खरातला जमिनी खरेदी करण्यासाठी चांगले भागीदारही त्यानेच पाहून दिल्याचे समजते. त्यातूनच खरातने बखळ पैसा कमावला आणि त्याची संपत्तीची हावही वाढत गेली. मात्र, मिळालेल्या नफ्यातला वाटा या भक्ताला, त्याच्या मुंबईतल्या दुसऱ्या एका भक्तालाही मिळाला नाही. त्यातूनच त्यांच्यातील संबंध ताणले गेले आणि त्यांनीच खरातचे कारनामे बाहेर काढण्याचा चंग बांधला. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याची चर्चा आहे. पुण्यातला हा भक्त आमदार रोहित पवार यांच्या बंगल्याशेजारीच राहत असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

चैत्रोत्सवाला

सप्तश्रृंगीगडावर चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; गडावर येणाऱ्या भक्तांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

0
सप्तश्रृंगगड | वार्ताहरमहाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ...