Wednesday, April 22, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर...

Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर

नेमकं काय म्हटलंय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आध्यात्मिक ओढ आणि मदतीच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापकर्माचा घडा आता फुटला असून, तपासात अत्यंत भीषण आणि अंगावर शहारे आणणारी माहिती समोर आली आहे. खरातकडे सापडलेल्या २१ जिवंत काडतुसांपैकी पाच काडतुसांचा वापर झाला असून, त्याने पाच जणांचा खून (Murder) केला की अघोरी पूजेसाठी नरबळी दिला? असा खळबळजनक संशय एसआयटीसह पोलिसांनी थेट न्यायालयात (Court) व्यक्त केल्याने महाराष्ट्र हादरला आहे.

- Advertisement -

पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने मंगळवारी (दि. २४) खरातला अतिरिक्त वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्या. के. एच. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता अॅड. शैलेंद्र बागडे यांनी मांडलेला युक्तिवाद ऐकून उपस्थित सुन्न झाले. पोलिसांनी खरातच्या तृप्तबाला बंगल्याची झडती घेतली असता तिथे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि २१ जिवंत काडतुसे आढळली. मात्र, तपासात पाच काडतुसांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत. ही पाच काडतुसे नेमकी कुठे वापरली ? कुणाचा जीव घेण्यासाठी वापरली? याचा हिशेब खरात देऊ शकलेला नाही. यावरून त्याने नरबळी दिल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासातील (investigation) घृणास्पद बाब म्हणजे, पीडित महिलांना धार्मिक विधीच्या नावाखाली तो खारट आणि कडवट पाणी पिण्यास द्यायचा, तसेच विशिष्ट प्रकारचे पेढे खाऊ घालायचा. हे पदार्थ खाल्ल्यानंतर महिलांना गरगरू लागायचे आणि त्या शुद्ध हरपायच्या. या पेढ्यांमध्ये आणि पाण्यात तो गुंगी आणणारी औषधे किंवा मानवी मूत्र मिसळत असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच स्थितीचा फायदा घेऊन तो महिलांवर पाशवी अत्याचार करायचा, असेही नमूद करण्यात आले. पीडितेच्या वतीने अॅड. एम. वाय. काळे यांनी खरातच्या क्रूर कृत्यांचा पाढा वाचला.

तर खरातच्या वतीने अॅड. सचिन भाटे यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या पाच दिवसांच्या कोठडीत पाच काडतुसांचे डेथ मिस्ट्री उलगडणार का?, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. खरातच्या रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा आढळून आली आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या या भोंदूने सामान्यांना लुटून कोट्यवधी रुपयांची जंगम मालमत्ता गोळा केली आहे. या मालमत्तेचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत आणि या कृत्यात त्याला कोणाचे पाठबळ लाभले, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर (Police) मोठे आव्हान आहे.

वाघ, साप अन् हरणांची शिकार?

भोंदूबाबाच्या घरात केवळ शस्त्रास्त्रेच नव्हे, तर वन्यजीवांचे अवशेषही सापडले आहेत. त्याच्याकडे हरणांची दुर्मिळ पांढरी व काळी कस्तुरी आढळल्याने त्याने शिकार केल्याचे सिद्ध होत आहे. पीडित महिलांना आपल्या प्रभावात ठेवण्यासाठी आणि त्यांना घाबरवण्यासाठी तो वाघ आणि सापांची भीती दाखवायचा. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून त्याने अनेक प्राण्यांची हत्या केल्याचा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला.

मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही : खरात

युक्तिवाद सुरू झाल्यानंतर खरातला न्यायाधिशांनी काही बोलायचे आहे का असे विचारले? त्यावर मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही, असे तो म्हणाला. यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

खरातचा बालेकिल्ला वादात

शहर पोलिसांनी गुन्हेगारांचा बालेकिल्ला काढण्याचा धडाका लावला असला, तरी भोंदू अशोक खरातच्या बाबतीत मात्र पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे. (दि. २२) सोशल मीडियातील पोस्ट व मागणीनंतर युनिट एकमध्ये खरातला बालेकिल्ल्यात प्रसाद देण्यात आला. पण त्यावेळी तो पोलिसांच्या खांद्यावर लोंबकळत व अक्षरशः लंगडत चालत असल्याचे दिसले. मात्र, अवघ्या ४८ तासांत जिल्हा न्यायालयात धक्कादायक चित्र दिसले, तिथे हाच अशक्त खरात चक्क धावत सुटला आणि पोलिसांच्या गराड्यातून वेगाने सरकत्या जिन्यांकडे झेपावला. दोन दिवसांपूर्वी ज्याला आधार लागत होता, तो अचानक पळू कसा लागला? असा खोचक सवाल सुजाण नागरिक करत आहेत. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे आणि खरातच्या सोयीस्कर आजारामुळे शहरात उलट-सुलट चर्चा झडत आहे.

न्यायालयाला छावणीचे स्वरूप

भोंदू खरातला न्यायालयात आणण्यापूर्वी उपायुक्त परिमंडळ १ मोनिका राऊत यांनी न्यायालयातील परिस्थितीचा आढावा घेत बघ्यांची गर्दी कमी करायचे आदेश दिले. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला होता. खरात्तला न्यायालयात चेहऱ्यावर काळा बुरखा घालून आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या गराड्यात अक्षरशः पळत न्यायमूर्तीसमोर त्याला हजर करण्यात आले.

मला दोन चापट मारू द्या : देसाई

महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू खरातला दोन चापट मारण्यासाठी मी आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले. यावेळी पोलीस खरातला न्यायालयात घेऊन आल्यावर तृप्ती देसाईंनी समर्थकांसह पोलीस गाडीला आडवे जाण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तात तैनात असलेल्या दामिनी पथकाने त्यांना गराडा घालून पोलीस गाड्यांपासून दूर नेले.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Nashik Regional Transport Office) सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात (Strike) सहभाग घेतल्यामुळे मंगळवारपासून कार्यालयातील कामकाज पूर्णपणे...