Friday, May 29, 2026
Homeक्राईमCrime News : निफाडमध्ये 'पाप'धुण्याचा बाजार? 'भोंदूगिरी'चा नवा अड्डा! खरातनंतर आता 'बडेबाबा'चा...

Crime News : निफाडमध्ये ‘पाप’धुण्याचा बाजार? ‘भोंदूगिरी’चा नवा अड्डा! खरातनंतर आता ‘बडेबाबा’चा उच्छाद!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

विकृत मानसिकतेचा ‘कॅप्टन खरात’ सध्या पोलीस कोठडीत (Police Custody) असतानाच नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीचा दुसरा चेहरा समोर आला आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे ‘बडेबाबा’ उर्फ गणेश जगताप (Ganesh Jagtap) याने श्रद्धेच्या नावाखाली आपले मायाजाल पसरवून, त्याच्या काळ्या कृत्यांची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, ज्याच्यावर बलात्कार व अॅट्रासिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तोच भोंदू आज कोट्यवधींचे दैवी सोहळे आयोजित करून राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करीत स्वतःला ‘पावन’ करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

गणेश जगताप उर्फ बडे बाबा असे संशयित भोंदूचे नाव असून तो स्वतःला ‘पीठाधिश्वर श्री गणेशबाबा जयराम जगताप’ म्हणवून घेतो, याचा उदय हा श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेच्या जोरावर अधिक झाल्याचे समजते. सर्व सामान्य भाविकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्याने स्वतःभोवती एक वलय निर्माण केले. निफाडच्या धारणगाव खडक परिसरात ‘कामाख्या देवी मंदिरा’च्या नावाने त्याने मोठे साम्राज्य उभे केले आहे. सुरुवातीला अध्यात्माचा बुरखा पांघरलेल्या या बाबाने अल्पावधीतच अफाट संपत्ती आणि काही अंधांसह भक्तांचा फौजफाटा जमवला. मात्र, या चकाकीच्या मागे एक काळं वास्तव दडल्याचेही उघड झाले आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) या भोंदू बाबावर एका विवाहितेने बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल केला होता. पीडितेने केलेले आरोप अंगावर काटा आणणारे होते. मात्र, इतका गंभीर गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी बाबावर नेमकी काय कारवाई केली? त्याला अटक झाली का? आणि तो आजही उजळ माथ्याने भव्य सोहळे कसा करू शकतो? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या या ‘ढिल्या’ भूमिकेमुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबाच्या ‘कांडांचा पेटारा’ उघडण्यास सुरुवात केली आहे. ज्या नेत्यांची नावे या बॅनरवर झळकत आहेत, ते या भोंदूगिरीचा जाहीर निषेध करणार की त्याच्या सोहळ्याला हजेरी लावून या विकृतीचे समर्थन करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बॅनरवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची नावे

धारणगाव खडक येथे सध्या कामाख्या देवी मंदिराचा ‘प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा’ सुरू आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे आणि अनेक आमदारांची नावे प्रमुख अतिथी म्हणून छापण्यात आली आहेत. ज्याच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत, भोंदूगिरीसाठी बदनाम आहे, अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला राज्याचे सर्वोच्च नेते उपस्थित राहिले की राहणार? की या नेत्यांच्या नावाचा वापर करून हा बाबा स्वतःच्या पापांवर पडदा टाकत आहे? राजकीय नेत्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया न दिल्याने, एकप्रकारे या भोंदूला ‘मूकसंमती’ दिल्याची चर्चा जनमानसात रंगली आहे.

बडे बाबावरील गुन्ह्याचा तपशील

पोलीस ठाणे : इंदिरानगर
दाखल तारीख : १४ नोव्हेंबर २०२५
गुन्हा दाखल कलमे बीएनएस कलम ६४ (१), ३१६ (२), ३१८ (४) व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत
घटनेचा कालावधी : १ जानेवारी २०१० ते १ जानेवारी २०२५ दरम्यान
घटना : ४२ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित गणेश उर्फ (बडेबाबा) याने तुझ्या पतीचे दारूचे व्यसन सोडवणे आणि जमिनीतून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. ‘स्मशानातील पूजा’ आणि ‘जीवितास धोका’ असल्याचे सांगून त्याने भीती घातली. तसेच घर, बंगला आणि पैशांचे पाऊस पाडण्याच्या बहाण्याने तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केली. इतर तक्रारदारः लता आहेर (चांदवड), संजय देशमुख, सचिन निकुंभ (उत्तमनगर) आणि सुनील मनोहर कायस्थ (पंचवटी) यांनीही बडेबाबाविरोधात तक्रारी केल्या आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...