अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास करणार्या सराईत टोळीला पोलिसांनी तडीस नेले असून, तब्बल पाच लाख 45 हजार रूपये किमतीचा 100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान संशयित आरोपींनी एकूण तीन घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गणेश सुधाकर मंचरकर (वय 42, रा. शिवसुदा रेसीडेन्सी, दसरे नगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5.15 दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 53 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, सदर गुन्हा कैलास चिंतामण मोरे (रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (रा. दिनदासपूर, वाराणसी, उत्तर प्रदेश), रवींद्र आनंद माळी (रा. सोनगीर, जि. धुळे), आणि सुशील ऊर्फ सुनील ईश्वर सोनार (रा. बालाजीनगर, शिंगवे, जि. धुळे) या चौघांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करून पोलीस कोठडीत घेतल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील तीन घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख 45 हजार रूपये किमतीचे एकूण 100 ग्रॅम (10 तोळे) दागिने हस्तगत केले आहे. या कारवाईत घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, अंमलदार बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दीपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, रमेश शिंदे, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, भागवत बांगर यांच्या पथकाने केली.




