बीड | Beed
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बीड जिल्हा (Beed District) हा संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर घटनांमुळे चर्चेत आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा बीडच्या आष्टीतील पिंपरी घुमरीत प्रेम प्रकरणातून विकास बनसोडे नावाच्या एका युवकाला (Youth) बेदम मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील हा तरुण आष्टीत ट्रक ड्रायव्हरचे काम करत होता. विकास याचे मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय आल्याने भाऊसाहेब क्षीरसागरसहित त्याच्या इतर दहा साथीदारांनी विकास याला दोरी व वायरने बेदम मारहाण केली. यात विकास याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.
याबाबत विकास बनसोडे याचा भाऊ आकाशने पोलिसांना (Police) दिलेल्या जबाबात म्हटले की, “घुमरी पिंपरी येथील भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर यांनी फोन केला आणि ते मला म्हणाले की, तुझ्या आई-वडीलांना व नातेवाईकांना पिंपरी घुमरीला घेऊन ये व विकास याला घेऊन जा आणि नसेल यायचे तर ते पण सांगा. आम्ही आमच्या पद्धतीने त्याचे काय करायचे ते करतो. त्यावर मी त्यांना विचारले की, काय झाले आहे? त्यावर ते मला म्हणाले की, तुम्ही इथे या आल्यावर सांगतो. यावर फोन करुन मी तुम्ही कोठे आहेत असे विचारले असता त्याने सांगीतले की, मी व विकास असे आम्ही घुमरी पिंपरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर यांचे घरी असून त्यांनी आम्हाला विकास व भाऊसाहेब याची मुलगी यांचे प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन आम्हाला त्यांचे घराचे समोरील त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले आहे. तसेच दोरी आणि वायरने बेदम मारहाण करत असून महिला शिवीगाळ करत आहेत. तुम्ही आल्यानंतर ते आम्हाला सोडतील तुम्ही लवकर या असे म्हणाला.
त्यानंतर आम्ही त्याला निघालो आहोत असे सांगीतले. यानंतर मी, माझे आई वडील आण्णा, मामा सुभाष देवराव दाभाडे, कांतीलाल देवराव दाभाडे, काका कैलास भिकाजी बनकर नातेवाईक अजय समाधान साळवे, समाधान गणेश खिल्लारे असे मिळून पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब क्षीरसागर याचे घरी गेलो. त्यांच्या घरी भाऊसाहेब क्षीरसागर यांची भावजयी सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर या घरी होत्या. त्यांना मी विकास कुठे आहे? असे विचारले असता त्यांनी मला सांगितले की, विकास याच्या पोटात दुखत आहे त्यामुळे त्याला भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर व बाबासाहेब भानुदास क्षीरसागर हे कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले आहेत. त्यानंतर आम्ही सर्वजण कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये गेलो व भाऊसाहेब यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.त्यानंतर भाऊसाहेबचा भाऊ बाबासाहेबाला कॉल केला. त्यावेळी विकासला शासकीय रुग्णालयात टाकल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर बाबासाहेबाने फोन बंद केला, असे आकाश म्हणाला. तसेच मी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना विचारले. त्यावेळी डॉक्टर म्हणाले, गाडीमध्ये २ जण येऊन विकासला दवाखान्यात दाखल करून नाव गाव न सांगता लगेच निघून गेले. डॉक्टरांनी विकासची तपासणी केली, त्यावेळी त्यांनी विकासला मृत घोषित केले”, असे आकाशने सांगितले.