अहमदनगर । प्रतिनिधी
गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांना कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरात पकडले. त्यांच्या ताब्यातून एक लाख एक हजार 350 रूपये किमतीचा सुमारे 10 किलो गांजा, दोन दुचाकी, पाच मोबाईल असा तीन लाख सहा हजार 550 रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार भाऊसाहेब तोडमल (वय 19 रा. सुपा, ता. पारनेर), अनिकेत परसराम हजारे (वय 23 रा. चिंचोडी पाटील ता. नगर), ओमान लियाकत सय्यद (वय 19 रा. हिंगणगाव ता. नगर) व अक्षय उत्तम चौधरी (वय 22 रा. दूधसागर सोसायटी, केडगाव) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. काही व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी झेंडीगेट परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरूवारी (15 ऑगस्ट) मिळाली होती.
हे हि वाचा : धक्कादायक! अज्ञात व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून
त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे, तानाजी पवार, ए. पी. इनामदार, अनुप झाडबुके, दीपक रोहकले, सचिन लोळगे, शिवाजी मोरे, बापुसाहेब गोरे, संगिता बडे यांचे पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाने पंचासमक्ष झेंडीगेट परिसरात सापळा रचून चौघांना पकडले.
त्यांच्या ताब्यातील सॅकमध्ये गांजा मिळून आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे करत आहेत.
हे हि वाचा : बोधेगाव परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोन महिलांसह चार जण गंभीर जखमी, लाखोंचा ऐवज लंपास
शेतात गांजाची लागवड
केडगाव उपनगरातील मतकर मळ्यात एका शेतात कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 50 हजार रूपये किमतीचा सुमारे पाच किलोचा गांजा जप्त केला आहे. पोलीस अंमलदार सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी बापु दत्तात्रय मतकर (रा. मतकर मळा, केडगाव देवी रस्ता, केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतकर याने त्याच्या केडगाव शिवारातील दुधसागर सोसायटी ते अरणगाव रस्त्यावरील शेतात गांजाची झाडे लावली होती.
हे हि वाचा : नगरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर; पोलिस अधीक्षक कार्यालय चौकात रास्ता रोको