सिन्नर | प्रतिनिधी
तालुक्यातील निमगाव सिन्नर येथे मद्यपी पतीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या डोक्यात हातोडीन प्रहार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नंदा किरण सानप (३४) असे मृत महिलेचे नाव असून पती किरण विष्णू सानप (३८) याला नाशिकमधून अटक करण्यात आली. निमगाव सिन्नरच्या टेकाडे वस्ती शिवारात राहणारे या दाम्पत्यामध्ये नेहमीच कुठल्यातरी कारणाने खटके उडत होते. किरण याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र, तिने ते देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तिथून गावात आला. सायंकाळी तो घरी न आल्याने त्याची आई अणि मुलाने गावात शोध घेतला. दोघांना पाहताच त्याने आपल्या टेकाडे मळ्यातील वस्तीवर धूम ठोकली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दारूच्या नशेत असलेल्या किरण याने घरामागे शेतात काम करीत असलेल्या पत्नीशी हुज्जत घातली आणि तेथेच हातात असलेल्या हातोडीने त्याने तिच्या डेक्यात वार केले. छोटा मुलगा सार्थक घटनास्थळी आल्यानंतर त्याने नातेवाइकांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील नंदाला उपचारांसाठी सुरुवातीला सिन्नर आणि त्यानंतर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान नंदाची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, नाशिक येथील मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या माहितीनंतर मुसळगांव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत जाधव यांच्यासह एका टीमने निमगाव-सिनरला, तर दुसऱ्या टीमने नाशिक येथे खासगी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला. महिलेचे वडील बबन गोपाळा साबळे (६६) रा. दापूर यांच्या फिर्यादीवरून किरण सानप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू पाटील करत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




