राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जामिन करण्याच्या वादातून चार जणांनी मिळून चांगदेव भिसे यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतल्याची घटना राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात घडली आहे. चांगदेव कोंडीराम भिसे, (वय 49) रा. ब्राम्हणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, चांगदेव भिसे हे अहमदनगर येथील रुग्णालयात कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांना आरोपी भेटले व म्हणाले की, तुम्ही आमच्या जामिनाचे काय केले असे म्हणून बाचाबाची केली. त्यानंतर चांगदेव भिसे हे मोटारसायकलवर राहुरीकडे येत असताना आरोपींनी त्यांना विद्यापीठ येथील पेट्रोल पंपाजवळ अडवीले. आणि म्हणाले की, तू आम्हाला जामिन पाहुन का देत नाहीस, आम्हाला पैसे का देत नाहीस.
तेव्हा चांगदेव भिसे त्यांना म्हणाले की, तुम्हाला पुर्वी जामिनासाठी खर्च केलेले पैसे मला द्या. त्यावेळी आरोपींनी चांगदेव भिसे यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातील 12 हजार 720 रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच तू आमची पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यास तुझ्यावर आम्ही बलात्काराच्या खोट्या केसेस टाकू व तुला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. चांगदेव कोंडीराम भिसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सचिन आण्णासाहेब भांड व लताबाई आण्णासाहेब भांड व दोन अनोळखी इसम रा. वडगावपान, ता. संगमनेर, अशा चार जणांवर गु.र.नं. 968/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 119 (1), 119 (2), 126 (2), 137 (2), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.