Monday, November 25, 2024
Homeक्राईमखून नगरजवळ मृतदेह सांगलीत

खून नगरजवळ मृतदेह सांगलीत

मृत नेवासा तालुक्यातील || एक ताब्यात, दुसरा फरार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या मोरया चिंचोरे (नेवासा) येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह सांगली जिल्ह्यात वारणा नदीकाठी फेकून दिल्याचे आढळले. यासंदर्भात नगर एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरा फरार आहे. हा फरार आरोपी व मृत तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पूर्वीच सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

- Advertisement -

भाऊसाहेब रामदास पवार (वय 32, मोरया चिंचोरे, नेवासा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गोरख अशोक माळी (मोरया चिंचोरे) हा मुख्य आरोपी फरार आहे, तर रवींद्र किसन माळी (मोरया चिंचोरे) याला ताब्यात घेतल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक चौधरी यांनी दिली. यासंदर्भात समजलेली माहिती अशी, वरील तिघेही मित्र आहेत. गोरख माळी याचे हॉटेल असून हॉटेलचा माल आणण्यासाठी तिघे गोरखच्या मोटारीतून नगरकडे चालले होते. रस्त्यात एमआयडीसीतील दुध डेअरी चौकाजवळ, शेंडी बाह्यवळण रस्त्याने जाताना गोरखने रस्त्यात गाडी थांबवली व मोटारीतील सीटखालून गावठी कट्टा काढून

भाऊसाहेबच्या डोक्यात गोळी झाडली. भाऊसाहेबचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी रवींद्र माळी तेथून पळून गेला, नंतर गोरख माळीने भाऊसाहेब पवारचा मृतदेह सांगली जिल्ह्यात करळप याथील वारणा नदीकाठी टाकला. या संदर्भात करळप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत भाऊसाहेब पवारने परिधान केलेल्या बनियानवर बजरंग मित्र मंडळ, मोरया चिंचोरे असे लिहिले होते. त्यावरून त्याची ओळख पटली.

घटनास्थळावरून पळालेल्या रवींद्र माळीने घटनेची गावात वाच्यता केल्याने खुनाला वाचा फुटली व त्यातूनच भाऊसाहेब पवार याचा नातलग अण्णा वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख माळी व रविंद्र माळी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 जूनला घडली. तेव्हापासून गोरख माळी व भाऊसाहेब पवार बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

कारण अस्पष्ट
खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रवींद्र माळीने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गावठी कट्टा हाताळताना त्यातून उडलेली गोळी भाऊसाहेब पवारच्या डोक्यात गेली. मात्र, मुख्य आरोपी गोरख माळी हा फरार असल्याने त्याबाबत खातरजमा केली जात असल्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. सुरुवातीला कळरप पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा तपासासाठी नगर एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या