अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिंदा (ता. कर्जत) येथील भाळावस्ती परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून मयताचा भाचाच या खुनाचा संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून भाच्यानेच मामाच्या डोक्यात टणक हत्याराने प्रहार करून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणातील मयताचे नाव हनुमंत गोरख घालमे (वय 35, रा. भाळावस्ती, शिंदा) असे आहे. 6 जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके नियुक्त करण्यात आली. या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लबडे आदींचा समावेश होता.
पथकाने सलग 15 दिवस तपास करताना पथकांनी मयताचे आर्थिक व्यवहार, जुने वाद, कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा सखोल अभ्यास केला असता मयत हनुमंत घालमे हे त्यांच्या भाच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भाचा तेजस रामदास अनभुले (वय 21, रा. घुमरी, ता. कर्जत) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत तेजस अनभुले याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत हनुमंत घालमे यांचे आरोपी व त्याच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेले होते. यापूर्वी आरोपीच्या आई-वडिलांनी वेळोवेळी मयतास पैसे दिले होते. मात्र, पुन्हा 10 लाख रूपयांची मागणी केल्यावर आरोपीच्या आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे मयताने आरोपी व त्याच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे संतप्त झालेल्या तेजस अनभुले याने मयताच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.





