मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुसर्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळली.अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले तर सत्ताधारी पक्षांनीही विरोधकांना चोख उत्तर दिले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आक्रमकपणे यावर भाष्य केले.सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या पटलावर पेन ड्राईव्ह ठेवला आहे. यात सर्व पुरावे असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान,एका वृत्तवाहिनीने दाखवलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या व्हिडिओची सत्यता तपासून चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नसल्याचा दावाही सोमैया यांनी केला आहे.
सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांच्या विषयीचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला आहे. या व्हिडीओचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विरोधी पक्षाने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले.
या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे हे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. अशा अनेक व्हिडीओ क्लिप उपलब्ध असून अनेक महिलांच्या तक्रारी असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे आपल्यावर आरोप असलेल्या व्हिडिओची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
भाजपने मागील 9 वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे. परंतु दुसर्याचे वस्त्रहरण करनार्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
भाजपचे नेते किरीट सोमैया हे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवायला निघाले होते. छोट्या प्रकरणात ईडी, सीबीआयकडे जायचे, लोकांची घरे तोडण्यासाठी खांद्यावर हातोडा घेऊन जायचे, असे अनेक उद्योग त्यांनी सुरु केले होते. पण त्यांनी आता स्वत:ची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. या पत्राप्रमाणे सोमैयांची ईडी, सीबीआय किंवा उच्चस्तरीय तपास यंत्रणांकडून चौकशी करणार का?
भास्कर जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)