अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शासनाने यंदापासून 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून सुधारित पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. या योजनेला शेतकर्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने शासनाने या योजनेला तीनदा मुदतवाढ दिली. पण, यानंतरही या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. शेतकर्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली. परंतू तो विमा मोठ्या संख्येने शेतकर्यांनी उतरविला असता तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी विमा वरदान ठरला असता.
जिल्ह्यात आतापर्यंत कर्जदार व विना कर्जदार अशा एकूण 2 लाख 23 हजार शेतकर्यांनी 2 लाख 37 हजार 775 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला आहे. यासाठी 4 लाख 49 हजार 647 शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. त्यापोटी शेतकर्यांना त्यांचा हिश्याचे 25 कोटी 28 लाख 58 हजार 543 रुपये भरले आहेत.शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून या वर्षीपासून सुधारित पीक विमा योजना लागू केली. तसेच पीक कर्जाची उचल करणार्या शेतकर्यांसाठी सुद्धा ही योजना ऐच्छिक केली. त्यामुळे योजनेला शेतकर्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
तर मागील तीन-चार वर्षातील पीक विमा योजनेबाबत शेतकर्यांचा अनुभव चांगला नाही. नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने पीक विमा काढण्याकडे शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकर्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने या योजनेला जुलैमध्ये आणि त्यानंतर 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. पण, यानंतरही अल्पप्रतिसाद मिळत असल्याने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पण, यानंतरही शेतकर्यांनी याकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.
1 रुपयात पीक विमा योजना असतांना 2024-25 मध्ये जिल्ह्यात 5 लाख 67 हजार शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. तर 11 लाख 80 हजार अर्ज आले होते. त्या वर्षी शेतकर्यांना नुकसानभरपाई पोटी तब्बल 1 हजार 200 कोटीहून अधिक रक्कम मिळाली होती. मात्र ही योजना बंद झाल्यानंतर या योजनेचे स्वरूप बदले आणि शेतकर्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तालुकानिहाय आलेले अर्ज व शेतकर्यांचा हिस्सा पुढीलप्रमाणे आहे. अहिल्यानगर 20 हजार 987 शेतकरी तर 1 कोटी 11 लाख 93 हजार 751 शेतकरी हिस्सा, अकोले 33 हजार 689 शेतकरी तर 89 लाख 44 हजार 499 रुपये, जामखेड 51 हजार 553 शेतकरी तर 2 कोटी 29 लाख 44 हजार 980 रुपये. कर्जत 23 हजार 954 शेतकरी तर 73 लाख 17 हजार 607 रुपये. कोपरगाव 20 हजार 213 शेतकरी तर 1 कोटी 45 लाख 52 हजार 743 रुपये. नेवासा 45 हजार 344 शेतकरी तर 4 कोटी 36 लाख 43 हजार 556 रुपये. पारनेर 50 हजार 690 शेतकरी तर 1 कोटी 88 लाख 98 हजार 330 रुपये. पाथर्डी 60 हजार 900 शेतकरी तर 2 कोटी 64 लाख 72 हजार 22 रुपये. राहाता 22 हजार 480 शेतकरी तर 1 कोटी 76 लाख 69 हजार 49 रुपये. राहुरी 23 हजार 513 शेतकरी तर 1 कोटी 94 लाख 72 हजार 57 रुपये. संगमनेर 28 कोटी 744 शेतकरी तर 1 कोटी 24 लाख 10 हजार 535 रुपये. शेवगाव 39 हजार 347 तर शेतकरी 2 कोटी 96 लाख 40 हजार 79 रुपये, श्रीगोंदा 13 हजार 565 शेतकरी तर 27 लाख 12 हजार 627 रुपये. श्रीरामपूर 14 हजार 668 शेतकरी तर 1 कोटी 35 लसाख 49 हजार 951 रुपये असा आहे.




