देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
देवळाली प्रवरा येथील चव्हाण वस्ती वरील शेतमजुरांच्या गायींचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 9 गायी व 1 शेळी मृत्यूमुखी पडली आहे. तर, इतर बाधीत गायी अत्यवस्थ आहेत. यामुळे गायींच्या मृत्यूची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, देवळाली प्रवरा येथिल चव्हाण वस्ती परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धूमाकूळ घातला आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परिसरातील एका पिसाळलेल्या कुत्र्यानेे गायी, शेळ्यांसह अनेेक जनावरांचा चावा घेतला. ही बाब संंबधीत पशूपालकांच्या लक्षात येेताच त्यांनी सर्व जनावरांना खाजगी डॉक्टर कडून लसीकरण करून घेतलेे होते. परंतु चावा घेतलेल्या जनावरापैकी काही जनावरे बाधित होऊन दगावण्यास सुरुवात झाली. यामध्ये शंकर पांडुरंग चव्हाण, मच्छिंद्र जाधव यांच्या गायी व सर्जेराव भास्कर चव्हाण यांची कालवड, शंकर रायभान चव्हाण, अकबर इब्राहिम शेख यांची कालवड, रामभाऊ गायकवाड यांची शेळी, संजय बापूराव जाधव यांची सात महिन्याची गाभण असलेली मोठी गाय, अण्णासाहेब सखाराम चव्हाण, सुनील पाराजी लोंढे, गणेश नामदेव चिकणे यांच्या अशा एकूण 9 गायी व एका शेळीचा मृत्यू झाला आहे.
या कुत्र्याने परिसरातील अनेक जनावरांना चावा घेतलेला आहे. यापैकी बरेच शेतमजूर असून त्यांच्या कुटुंबियांची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे. उदरनिर्वाहासाठी एवढे एकमेव साधन त्यांच्याकडे उपलब्ध होते. या शेतकर्यांकडे आणखीही जनावरे आहेत. परंतु कोणत्या जनावराला चावा घेतला हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. तरीही त्यांनी गोठ्यातील सर्व जनावरांना लसीकरण केलेले आहे. काही उपयोग झालेला नाही. देवळाली प्रवराचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री भवार यांनी भेट दिली. नगरपालिकेचे कुत्रे पकडणारे पथकही आज कुत्र्याचा शोध घेत होते. हे गोधन शेतमजूर महिलांनी काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी एक तरतूद करून ठेवली होती. परंतु, निसर्गाचा मोठा घाला त्यांच्या कुटुंबावर घातल्याने त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा बंद होईना. या रेबीजग्रस्त गोधनाला इंजेक्शन देऊन मारावे लागत आहे. अशी अवघड परिस्थिती पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.यामुुळे पशुपालक हवाालदिल झाला आहे.
इतक्या मोठ्यासंख्येने गायींचा मृत्यू झाला असला तरी देखील नेहमी मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार फिरणाऱे पुढारी मात्र, इकडे फिरकले देखील नाहीत. किंवा साधी विचारपूस देखील या लोकांची केली नाही. हे विशेष.