मुंबई । Mumbai
दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्याच्या मुद्द्यावरून आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. जैन समाजाच्या काही सदस्यांनी स्वत:हून कबुतरखान्यात प्रवेश करत ताडपत्री आणि बांबू काढून टाकले. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईपूर्वीच हे पाऊल उचलल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
आज सकाळी दादर कबुतरखाना परिसरात जैन समाजाने प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेत कबुतरखान्यात प्रवेश केला आणि ताडपत्री फाडून बाजूला केली. यात महिला सदस्यांचाही सहभाग होता. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला, आणि पोलिसांना आंदोलकांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. मात्र, आंदोलक अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांना त्यांना बाजूला करावे लागले.
काल मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखाना प्रकरणाबाबत बैठक घेतली होती. या बैठकीत काही सकारात्मक निर्णयांवर चर्चा झाल्याचे सांगितले गेले. यानंतरही जैन समाजातील काही सदस्यांनी आज सकाळी आंदोलन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले, “आज सकाळी घडलेली घटना चुकीची आहे. मी मंदिराच्या ट्रस्टींशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, हे कृत्य बाहेरील व्यक्तींनी केले आहे. यात मंदिर ट्रस्टींचा सहभाग नाही. आम्ही आंदोलन रद्द केले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांमुळे समाधानी होतो.”
लोढा यांनी पुढे स्पष्ट केले की, सकाळच्या घटनेत जैन समाज किंवा साधुसंत यांचा सहभाग नव्हता. “जे काही घडले, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कायदा हातात घेण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करणार नाही,” असे ट्रस्टींनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या घटनेमुळे कबुतरांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. “बाहेरील लोकांनी हे कृत्य केले, पण ते कोण होते याची माहिती नाही,” असे लोढा यांनी म्हटले.




