रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १९व्या हंगामात सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावून एक सुवर्णपान लिहिले. एकेकाळी ‘फॉलोअर्स खूप पण हाती ट्रॉफी नाही’ अशी टीका सोसणार्या आरसीबीने गेल्या दोन वर्षांत दाखविलेले सातत्य थक्क करणारे आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळालेला हा विजय आरसीबीच्या एका नव्या पर्वाचा उदय आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज या दोनच संघांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्रत्येक हंगामात हेच दोन संघ जेतेपदाचे मुख्य दावेदार मानले जात. परंतु, आता सलग दोनवेळा ट्रॉफी उंचावून आरसीबीने या बलाढ्य कंपूत दिमाखात प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो आधुनिक क्रिकेटचा सम्राट-विराट कोहली.
आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकिर्दीच्या उत्तरार्धात, म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीकडे झुकत असताना विराटने दाखविलेली ही जिद्द थक्क करणारी आहे. वयाच्या या टप्प्यावरही तरुणांना लाजवेल असा उत्साह, मैदानातील चपळता आणि धावांची भूक कायम ठेवत विराटने या हंगामात तब्बल ७५४ धावांचा डोंगर उभा केला आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. त्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे देशभरातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे उधाण आले असून, आयपीएलची लोकप्रियता किती शिखरावर आहे हे अधोरेखित झाले आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर आयपीएलने क्रिकेटला जागतिक पातळीवर एक प्रचंड मोठी बाजारपेठ, पैसा आणि अभूतपूर्व ग्लॅमर मिळवून दिले आहे. परंतु, यामुळे क्रिकेटचा मूळ गाभा असलेल्या कसोटी क्रिकेटचा श्वास गुदमरत चालला आहे का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आज ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळाचे स्वरूप आणि प्रेक्षकांची मानसिकता पूर्णपणे बदलून टाकली आहे.
केवळ तीन-चार तासांत निकाल देणारा हा प्रकार मनोरंजनाचा उत्तम स्त्रोत ठरत आहे. चौकार-षटकार, मैदानातील डीजे आणि रोषणाई यामुळे तरुण पिढी या स्वरूपाकडे वेगाने आकर्षित झाली. या व्यावसायिक यशामुळे खेळाडूंनाही आर्थिक स्थैर्य मिळाले असून, जगातील अनेक नवोदित खेळाडूंना आपले टॅलेंट दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र, या झगमगाटाची दुसरी बाजू चिंताजनक आहे. क्रिकेटचे मूळ सौंदर्य फलंदाज आणि गोलंदाज यांचे कौशल्य, तंत्र आणि मानसिक क्षमतेच्या कसोटीत दडलेले असते, जे केवळ पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटमध्येच पहायला मिळते. दुर्दैवाने, झटपट क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे या मूळ वैशिष्ट्यांनाच धक्का बसत आहे. फलंदाज आता खेळपट्टीवर टिकून राहण्यापेक्षा पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी करण्यावर भर देतात. यामुळे बचावात्मक तंत्र आणि संयम हे गुण कालबाह्य ठरत चालले आहेत.
गोलंदाजांच्या बाबतीतही, कसोटी सामन्यात अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करण्याचे कौशल्य लोप पावत असून, केवळ धावा रोखणार्या ‘व्हेरिएशन्स’वर भर दिला जात आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कसोटीपटूंची वानवा जाणवू लागली आहे. खेळाडूंचे प्राधान्यक्रम बदलले असून, अनेक दिग्गज खेळाडू देशासाठी कसोटी खेळण्याऐवजी जागतिक स्तरावरील विविध ट्वेन्टी-२० लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत, ही क्रिकेटच्या भविष्यासाठी धोयाची घंटा आहे.दुसरीकडे, आर्थिक गणितांमुळे विविध क्रिकेट बोडर्सचे लक्षही आता कसोटी क्रिकेटवरून विचलित झाले आहे. आयपीएलमधून मिळणारा महसूल अफाट आहे, ज्याच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न नगण्य ठरते. यामुळे वर्षाच्या कॅलेंडरमध्ये कसोटी सामन्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि टी-२० लीगचा सुळसुळाट झाला आहे.
प्रेक्षकही पाच दिवस चालणारा सामना संयमाने पाहण्यास तयार नाहीत, ज्यामुळे कसोटी सामन्यांना मैदानावर मिळणारा प्रतिसाद रोडावला आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर कसोटी क्रिकेट इतिहासजमा होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. खेळाचा विकास, नवोदित संघांचे वर्चस्व आणि मनोरंजन आवश्यक आहे, पण ते मूळ अस्तित्वाच्या किमतीवर असू नये. आयपीएलच्या यशाचा उत्सव साजरा करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आणि बीसीसीआयने कसोटी क्रिकेटचे जतन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कसोटी खेळाडूंचे मानधन दुप्पट करणे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अधिक आकर्षक करणे आणि खेळपट्ट्यांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. ट्वेन्टी-२० आणि कसोटी क्रिकेट यांच्यात एक सुवर्णमध्य आणि समतोल साधणे हीच काळाची गरज आहे. क्रिकेटचा खरा आत्मा जिवंत राहिला तरच या खेळाचे भविष्य उज्ज्वल राहील.




