Saturday, July 25, 2026
HomeनगरAkole : मुळा पाणलोटातही धो-धो पाऊस

Akole : मुळा पाणलोटातही धो-धो पाऊस

नदीची पाणीपातळी वाढली, धरणात पाण्याची आवक जोमात || डिंभे धरणात 75 टक्के पाणीसाठा

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती, पाणीयोजना, औद्योगिकीकरणासाठी लाभदायी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात काल सायंकाळनंतर आषाढसरींनी तांडव सुरू केल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज मुळा धरणात नव्याने विक्रमी पाण्याची आवक होणार आहे. मंगळवारी रात्री आषाढ सरींनी जोर धरल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 8028 पर्यंत वाढला तोच मंगळवारी सायंकाळी केवळ 3212 क्युसेक होता.

- Advertisement -

काल दिवसभरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने या नदीचा विसर्ग बुुधवारी सायंकाळी थेट 17243 क्युसेकपर्यंत वाढला होता. नंतर पावसाचा वेग काहीसा मंदावल्याने नदीतील पाणी 12041 क्युसेक होता.26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 12179 दलघफू झाला होता. पाण्याची आवक टिकून राहिल्यास आज या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या वर जाण्याची शक्यता आहे.

धो-धो पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक विजेचे पोल पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासोबतच कमालीचा गारठा असल्याने जनजीवन गारठून गेले आहे.
दरम्यान, काल सायंकाळनंतर पाणलोटात पावसाचा जोर आणखी वाढल्याने मुळा नदीतील पाणी पातळी वाढली होती.

डिंभे धरणात 75 टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुकडी खोर्‍यात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प समूह धरणात नवीन पाण्याची आवक जोमाने सुरू आहे. 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 4 वाजता 71.55 टक्क्यांवर गेला होता. पाण्याची आवक सुरू असल्याने आज हे धरणही 75 टक्के भरणार आहे.

दरम्यान, या वर्षाचे वैशिष्ट्य असे की, पंधरा वीस दिवसांपूर्वी कुकडी प्रकल्पात उपयुक्त साठा केवळ 4 टक्के पाणीसाठा होता. पण काल तो 16309 दलघफू (55 टक्के) झाला होता. याच दिवशी गतवर्षी हा पाणीसाठा 15849 दलघफू (53.40 टक्के) होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. काल धरणात नव्याने 844 दलघफू पाणी जमा झाले. घोड धरणही तुडूंब झाले आहे. पाण्याची आवक वाढतच असल्याने वडज धरणातील पाणीसाठा 86 टक्के स्थिर ठेऊन या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

मायनसमध्ये असलेल्या पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर गेला आहे. विसापूरही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणीसाठा (93.61 टक्के) आहे. घोड धरणही भरले असून या धरणातील पाणीसाठा 5959 दलघफू (99.60 टक्के) आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...