मोबाईल-समाजमाध्यमे, त्याचे व्यसन, त्याचा गैरवापर आणि त्यावर बहुसंख्य लोक वाया घालवत असलेला वेळ याकडे संशोधक सातत्याने लक्ष वेधून घेतात. या मुद्यावर होत असलेल्या सर्वेक्षणांमध्ये तोच निष्कर्ष नमूद असतो. नुकतेच अशा एका अभ्यासाचे निष्कर्ष माध्यमात प्रसिद्ध झाले. मोबाईलवर वेळ वाया घालवणार्या भारतीयांच्या संख्येत सातत्याने वाढ होते.
2022 मध्ये भारतीयांनी तब्बल 84 हजार कोटी तास वाया घालवले असे त्या वृत्तात म्हटले आहे. त्यात आता सुमारे पंधरा टक्के वाढ झाली आहे. आकड्यांच्या गर्तेत पडायचे नाही असे ठरवले तरी हे सांगण्यासाठी निदान भारतीयांना तरी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नसावी. कृती करत असतांना मोबाईलमध्ये डोके खुपसलेले लोक जागोजागी आढळतात. त्यामुळे सामाजिक, वापरकर्त्यांच्या कौटुंबिक, वैयक्तिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
मानसिक विकार वाढत आहेत तरीही वापर वाढतच आहे. नकळत्या आणि पौगंडावस्थेतील युवांचे त्यातील प्रमाण चिंताजनक आहे. ते आभासी जगात रमतात आणि वास्तवाशी त्यांची फारकत होते. गैरवापर आणि अयोग्य वापरामुळे मानवी मूल्यांची सातत्याने घसरण समाजतज्ञांची चिंता अजून तीव्र करते. लोकांचे व्यावहारिक आणि सामाजिक जग मोबाईलमध्ये सामावले आहे. शिक्षण पद्धतीवरही त्याचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. लहान मुले अगदी लीलया मोबाईल हाताळतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.
अर्थात, माध्यमांचे व्यसनच इतके तीव्र आहे की, त्यावरून हत्या करण्यापर्यंत काहींची मजल जाण्याच्या घटना अधूनमधून घडतात. समाजातील गैरप्रवृत्ती मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करतात. गुन्हे घडवून आणतात. त्यात निष्पाप मुलांना सहभागी करून घेतात. एकूणच दुष्परिणाम टाळण्यासाठी मोबाईल आणि त्यावर सामावलेली समाजमाध्यमे याविषयीची माध्यम साक्षरता आणि त्या माध्यमातून वापरकर्त्यांची समज वाढवणे हाच व्यवहार्य उपाय ठरू शकेल. ज्याचा पूर्ण अभाव सध्या आढळतो. त्यामुळेच त्यांच्या वापरात वेळ वाया जातो यांची जाणीवसुद्धा फारशी आढळत नाही.
किंबहुना बहुसंख्य लोक त्यालाच ‘टाईमपास’ म्हणतात आणि दिवसभराच्या वेळापत्रकात तो आवश्यकच मानतात. त्यामुळे माध्यम साक्षरतेचे प्रयत्न अविरत सुरु ठेवण्याचे आव्हान प्रयत्नकर्त्यांना पेलावे लागेल. केवळ मोबाईलच नव्हे तर एकूणच सगळ्याच माध्यमांचा विवेकी वापर लोकांना शिकवणे आवश्यक झाले आहे. समाजमाध्यमांवर त्याचे वर्ग आयोजित केले जाऊ शकतील. ऑफलाईन शिकवले जाऊ शकेल. चर्चासत्रे, व्याख्याने हाही एक मार्ग आहे. त्याची एक सुरुवात शाळेपासून देखील करता येऊ शकेल. माध्यम साक्षरतेच्या छोट्या छोट्या अभ्यासक्रमांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकेल. त्यातच उद्याचे सुजाण वापरकर्ते निर्माणाचा एक मार्ग दडला आहे.