दोन तीन दिवसांपासून अचानक थंडी वाढली आहे. हवामानातील विरोधाभास दिवसेंदिवस वाढत आहे. तिन्ही ऋतूंचा अनुभव लोक अकाली घेत आहेत. सकाळी थंडी, दुपारी कडाक्याचे ऊन, संध्याकाळी पाऊस आणि रात्री पुन्हा थंडी असे सध्याचे चक्र आढळते. यावर समाजमाध्यमांवर विनोद आणि व्यंगचित्रे फिरतात. ते चेहर्यावर हास्याची लकेर फुलवणारे असले तरी हवामान बदल हा विनोदाचा विषय अजिबात नाही. त्याचे भयंकर दुष्परिणाम वेगवेगळ्या तर्हेने दिसतात.
पुढच्या पिढीला त्याचे तीव्र स्वरूप अनुभवावे लागण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. म्हणूनच कदाचित, तुमच्या मुलांसाठी आत्तापासून पाणी वाचवा, असे भावनिक आवाहन सामाजिक संस्था करतात. शेती ऋतुचक्रावर अवलंबून असते. ते बदलले की पीकपाणी धोक्यात येणारच. जसे आता आले आहे. असे होते तेव्हा पिके टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा मारा वाढू शकेल. सृष्टीमधील जलसाठा हळूहळू कमी होऊ शकेल. पाण्यावरून युद्ध होण्याचा धोका आताच वर्तवला जातो आहे. सर्व प्रकारचे प्रदूषण वाढेल. हे हवामान बदलाचे दृश्य आणि सतत चर्चिले जाणारे काही परिणाम. पण याचे मानवाच्या सामाजिक जीवनावर होणारे खोल परिणाम संशोधकांच्या अभ्यासाअंती व्यक्त होतात. त्याच्या तर जाणिवेचाच अभाव आहे. बोली भाषेत सांगायचे तर, ते परिणाम माणसांच्या गावी देखील नाहीत.
कोणते आहेत ते परिणाम? आगामी काळात मुलांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल. त्यात उष्णतेच्या लाटा, पूर आणि जंगल वणवे यांचा समावेश असू शकेल. त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार नाही. शिक्षणाचाही अभाव आणि आरोग्यसेवांची कमतरताही त्यांच्या वाट्याला येऊ शकेल. हा निष्कर्ष युनिसेफच्या एका अहवालात नमूद आहे. आर्थिक अस्थिरता, गढूळ सामाजिक वातावरण आणि मानसिक तणाव यामुळे महिलांवरील हिंसाचारात वाढ होऊ शकेल. आर्थिक अस्थिरतेचा तो गंभीर परिणाम असेल असे त्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत म्हटले आहे. याचा मिळून परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर संभवतो.
हवामान बदलामुळे अजून कोणकोणते सामाजिक घटक प्रभावित होतील यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरु आहे. या व अशा न दिसणार्या परिणामांचा लोकांना अंदाजही आढळत नाही. हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. ऋतू बदलाला सामान्य माणसे कशी कारणीभूत ठरतील? त्यावर सामान्य माणसे काय करू शकतील? हवामान बदलाचे सर्वात जास्त परिणाम ज्या घटकाला भोगावे लागतात त्या पातळीवर असे उपरोक्त अनेक ग्रह आढळतो. तथापि आता असा भाबडेपणा उपयोगाचा ठरणार नाही असेच या संशोधकांना सुचवायचे असावे. ही निश्चितपणे जागतिक समस्या आहे पण एखाद्या जगव्याळ कामातील खारीच्या वाट्याची गोष्ट लोकांना माहित आहेच. हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी सामान्य माणसेही बरेच काही करू शकतील.