महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सहासष्टावा वर्धापनदिन अन्य काही दिनांप्रमाणे केवळ साजरा करण्यात मराठीजनांनी धन्यता मानली तर सध्याच्या स्थितीत ती एक मोठीच आत्मवंचना ठरेल, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री व देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हे आपल्याला ठाऊक आहेच; पण आजचा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेताना आपले जीवन समर्पित करणार्या हजारो कार्यकर्त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आहे, असे आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो का? असा प्रश्न स्वत:ला विचारता आला तरच महाराष्ट्र राज्यनिर्मितीची शतकी वाटचाल करणे सुकर होईल; अन्यथा कठोर आत्मपरीक्षणापासून पळ काढून स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे होईल.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी, ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान असे म्हटले असले तरी याच अभंगात पुढे महाराजांनी, घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी असे म्हणत, सर्व चिंता देवावर सोपवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही सुचवले आहे. मात्र, सध्याच्या घडीस फार मोठा मराठीवर्ग याचा सोयीस्कर अर्थ घेऊन आहे त्या स्थितीत समाधान मानतो आहे की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. खरे पाहता देशाच्या उद्यमशीलतेचा प्रारंभच महाराष्ट्रात झालेला असताना आणि त्यात पिढ्यान्पिढ्या येथे स्थायिक झालेल्या घराण्यांचे फार मोठे योगदान असताना त्यापासून स्फूर्ती घेणारे किती मराठी लोक आहेत, या प्रश्नाचे उत्तर निराशाजनकच येईल.
राज्य जसे उद्यमशील तसे लोकही उद्यमशील झाले तर हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही. आणि तसा संकल्प करण्यासाठी महाराष्ट्र दिन व कामगार दिनापेक्षा चांगला मुहूर्त नसावा. तसे पाहायला गेले तर आजही देशासह परदेशातूनदेखील महाराष्ट्रात होणार्या गुंतवणुकीचे प्रमाण बहुतांश राज्यांपेक्षा जास्तच आहे; मात्र अनेक राज्ये औद्योगिक आघाडीवर वेगाने वाटचाल करत असताना महाराष्ट्र काहीसा स्थितीशीलतेकडे झुकतो आहे का, अशी भीती वाटल्यावाचून राहत नाही. राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षाचे असो, मोठे आकडे देण्याकडेच त्यांचा कल असतो; मात्र नवीन पिढी त्यावरच विसंबून राहिली तर फसगत होऊन भविष्यात स्मरणरंजनावरच भागवून घ्यावे लागण्याचा धोका आहे. महाराष्ट्राला सुधारकी विचारांचीही मोठी परंपरा आहे. मराठी समाज सुधारकांनी देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे हे सर्वविदीत आहेच. त्यामुळे आपल्या राज्याकडे आदराने पाहिले जाते, खरे तर ‘जात असे’ म्हटले पाहिजे; कारण अलीकडच्या काळात राज्यामध्ये बुवाबाजीला आलेला ऊत समाजमाध्यमांमधून अत्यंत विकृत पद्धतीने संपूर्ण देशात फैलावल्याने महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असण्याची शक्यता आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, नीचपणाचा कळस गाठणारे भोंदू आपले विकृत उद्योग सुखेनैव राजाश्रयाखाली करत असल्याचे सिद्ध होत आहे. अगदी अध्यात्माचीच चर्चा करायची झाली तर अनेक अवलिये, सिद्ध पुरुषही या भूमीत होऊन गेले; पण त्यांनी परस्त्रीपासून अंतर राखले. हा होता खरा नारी सन्मान. महिलांच्या सन्मानाचा सर्वोत्तम आदर्श असणार्या छत्रपतींचे नाव घेतानाही खजिल झाल्यासारखे होते. महाराष्ट्राची संत परंपराही थोर आहे. या भूमीतल्या संत साहित्याच्या तोडीचे लिखाण जगातही झालेले नसल्याचे मत अभ्यासक मांडतात; पण या साहित्याचा काहीच संस्कार राज्यातील मोठ्या जनसंख्येवर झाला नसेल का? तसे असते तर मठ, आश्रमांमध्ये रांगा लागल्या नसत्या. भोंदूगिरीवर प्रहार करणार्या शेकडो संत रचनांचा दाखला देता येईल. मग या रचना केवळ वाचून अन् धार्मिक समारंभांमध्ये पारायणे करून कानाआड, मेंदूआड केल्या गेल्या का? कारण, दिवसागणिक एखाद्या बाबाचे कारनामे समोर येतात आणि त्याचे भक्त हजारोंनी असल्याची माहिती पुढे येते.
जिथे पाहावे तिथे मंदिरे, मशिदी-दर्गे, चर्च उभी राहत आहेत. भाबडे लोक केवळ वर्गण्याच गोळा करत नाहीत तर त्यांच्या संरक्षणासाठीही उभे ठाकतात. त्याचा फायदा भामटे घेत आहेत. जी पारंपरिक देवस्थाने आहेत तेथे दर्शनाच्या काळ्याबाजारातून मिळवलेल्या कोटींच्या रकमा बँक खात्यात जमा केल्या जात आहेत. खरेच, हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे का? त्यातच काही प्रतिगामी शक्ती जाणीवपूर्वक त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अवसानघात करण्याच्या प्रयत्नात आहेत. अलीकडे हे देखील एक मोठे आव्हान उभे राहू पाहत आहे; मात्र त्यांना वेळीच ओळखून बुद्धिभेद होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आव्हान मोठे आहेच; पण मराठी माणूसही लेचापेचा नाही. सार्यांना पुरून उरणारा आहे..




