एकदा का लाज विकून खाल्ली आणि निगरगट्टपणा रक्तात भिनला की माणसाचे नेमके काय होते याची साक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेले वातावरण देते. त्यात एरवी निष्ठेचे आणि साधनशुचितेचे कांदे नाकाने सोलणार्या भारतीय जनता पक्षासह सगळेच पक्ष सामील आहेत. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ असे बिरुद मिरवून आणि त्यावरून इतर पक्षांना भाजप नेहमीच हिणवत आला आहे. पण सत्तासुंंदरीच्या नादात पक्षाचे पायही चिखलाने बरबटले आहेत हे नेत्यांनाही कळत नसेल का? की, कळत असूनही न कळत्याचा आव आणणे हा पक्षाच्या अध्वर्यूंंंचाही नाईलाज असावा.
सध्या बदलापूर प्रकरणावरून राळ उठली आहे. बदलापूरच्या एका शाळेतील अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. प्रचंड संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. तुषार आपटे हा त्या शाळेचा सहसचिव. ते प्रकरण लपवल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. काही दिवस तो फरार होता. आता जामिनावर बाहेर आहे. भाजपने त्याची बदलापूर नगरपालिकवर स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली. त्यावरून वाद होणारच होता. त्यानंतर आपटेने राजीनामा दिला. गेंड्याची जाड कातडी देखील कधीतरी थरथरते. मग पॉक्सोच्या आरोपीला नगरसेवक नेमणार्या भाजपच्या लोकांना कोणती उपमा द्यावी? आपटेला सत्तापदी बसवणार्यांच्या त्वचेवर किती पुटे चढली आहेत हे यावरून लक्षात येते.
एकदा का कातडी जाड झाली की मग फरक पडणेच बंद होते. अकोट नगरपालिकेत सहज एमआयएमशी सहज युती केली जाऊ शकते. अशी याची कितीतरी उदाहरणे आढळतात. अशा अनेक प्रकारणांवरून भाजप सातत्याने टीकेचा धनी बनतो आहे. पण ती टीका करणार्या विरोधी पक्षांचा निलाजरेपणाही त्यापेक्षा वेगळा नाही. सगळ्या पक्षांना महानगरपालिकेत सत्ता हवी आहे. निवडून येण्याची क्षमता हाच सर्वांच्या उमेदवार निवडीचा एकमात्र निकष आहे. त्यात अर्थबळ आलेच. बाकी सगळे निकष फक्त तोंडीलावणी आहेत. परिणामी, एकूण उमेदवार्यांमध्ये सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त उमदेवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारावर पंचवीस गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात गुंड मजा मारणे याची पत्नी निवडणूक लढवत आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची सगळ्या पक्षांची तयारी आहे, असाच याचा अर्थ आहे. अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्यांची संख्याही कमी नसेल. अशा व्यक्तींना चारित्र्य, नीतिमत्ता, साधनशुचिता, निष्ठा असे शब्द कशाशी खातात हे माहीतच नसणार. फसवणूक, दमदाटी, दबंगगिरी, गुंडगिरी त्यांच्या अंगवळणी पडलेले असतात. अशा व्यक्तींचे वर्णन पूर्वीच्या काळी ‘समाजावरून ओवाळून टाकलेला’ असे केले जायचे. त्यांचेच उदात्तीकरण करण्याचा अनाठायी उद्योग सगळ्याच पक्षांनी आरंभला आहे. ते जसे त्यांचे पित्तेही तसेच. जे सेवा फक्त दाखवण्यापुरती करत असतील ते लोकसेवक तरी कसे बनतील? सात पिढ्यांचे कोटकल्याण हाच त्यांचा उद्देश असणार.
कारण जे आडातच नाही तर पोहर्यात कसे येणार? या सगळ्यात जनता मात्र पिसली जाते आणि त्याच हतबल जनतेचे वर्णन लोकशाही सार्थ ठरवणारे असे केले जाते. हाच लोकशाहीतील सगळ्यात मोठा विनोद ठरू शकेल. सामाजिक जीवनात ज्यांची दहशत असते, त्यांनाच नमस्कार घालण्याची वेळ लोकांवर सगळ्यांंनी आणली आहे. मतदानाच्या अधिकाराचा वापर लोकांनी शहाणपणाने वापरावा हे म्हणणे योग्यच. पण त्यांना तसा पर्याय किती पक्ष देतात? ङ्गमी सत्ताधारी, तू विरोधी, तू विरोधी, मी सत्ताधारी, पर्यायच नाही दुसराफ असे कवी खेमराज भोयर म्हणतात. ते सद्यस्थितीला चपखल लागू पडते.
पारदर्शक व्यवहार, सभ्यता, स्वच्छ चारित्र्य ही मूल्ये लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरतीच संभाळावीत. त्यांचा उदोउदो जरूर करावा; पण तो त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवावा. त्याचे ओझे राजकारण्यांच्या खांद्यावर टाकू नये असेच सगळ्या पक्षांंना सुचवायचे असावे. स्वच्छ राजकारण करण्याची जबाबदारी ज्यांंच्यावर आहे ते राजकीय पक्ष अनेक बाबतीत एकाच माळेचे मणी आहेत. त्यांची नावे फक्त वेगवेगळी आहेत इतकाच काय तो फरक. बजबजपुरी यापेक्षा वेगळी असते का?




