Thursday, March 13, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १४ फेब्रुवारी २०२५ - जीवनशिक्षणाकडे नेणारे उपक्रम

संपादकीय : १४ फेब्रुवारी २०२५ – जीवनशिक्षणाकडे नेणारे उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांकडे उद्याचे भारताचे नागरिक म्हणून पाहिले जाते. शालेय प्रवासात एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण व्हावी, त्यांच्यावर संस्कार व्हावेत अशी पालकांची आणि एकूणच समाजाची अपेक्षा असते. असे उपक्रम आयोजित करण्यात अनेक शाळा पुढाकार घेतात.

हरियाणा राज्यात सिरसा जिल्ह्यातील एका शाळेतील उपक्रम सध्या चर्चेत आहे. शाळेतील मुले डब्यात रोज एक पोळी जास्त आणतात. अनेक जण धान्यही आणतात. परिसरातील भटक्या गायी आणि पक्ष्यांना खायला घातले जाते. महिन्यातून एकदा मुले शाळेचा आणि परिसरातील तलावाचा परिसर स्वच्छ करतात. प्लास्टिकचा कचरा गोळा करतात. त्याचे व्यवस्थापन करण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. शिक्षकही त्यात सहभागी असतात. असाच एक कार्यक्रम पुण्यातील एका शाळेत पार पडला.

- Advertisement -

पुण्यातून राम नावाची नदी वाहते. ती मुळा नदीची उपनदी मानली जाते. राज्यातील बहुसंख्य नद्या प्रदूषित आहेत. त्याला राम नदीही अपवाद नाही. ती नदी स्वच्छ करण्यासाठी काय करावे असा विषय मुलांना दिला गेला. काही मुलांनी कल्पनांची चित्रे रेखाटली तर काहींनी नदीला पत्र लिहिले. यातून घराघरांमध्ये ‘स्वच्छतादूत’ नेमण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षकांनी माध्यमांना सांगितले. हे उपक्रम स्वागतार्ह आहेत. समाजात एकूणच हरवत चाललेले सामाजिक भान हा चिंतेचा विषय आहे. तथापि ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे या शाळांमधील शिक्षकांनी लक्षात घेतले असावे.

हवामानात बदल आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. उपाययोजना केली नाही तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा तज्ज्ञ नेहमीच देतात. ही समस्या निर्मितीत सामान्य माणसांचा कळत-नकळत कसा हातभार लागतो हे मुलांच्या लक्षात येऊ शकेल. नदी प्रदूषण नेमके कसे होते? कोणकोणत्या सवयी कारणीभूत ठरतात? नदी मृत झाली तर काय परिणाम होतील? पक्ष्यांना काय खायला घालावे? गायींसारख्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी? भटक्या जनावरांच्या समस्या काय असतात? अशा अनेक गोष्टी मुलांच्या लक्षात येऊ शकतील.

शाळांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच मुलांना जीवनशिक्षणही देणे गरजेचे आहे. कारण जीवनशिक्षण मुलांना जगण्याची दिशा देते. मनुष्य हा जीवसृष्टीचाच एक भाग आहे. जैवविविधता किंवा सृष्टी जगली तर माणूस जगू शकेल याचे भान असे उपक्रम देऊ शकतात. ते कौतुकास्पद आहेत. जीवनशिक्षण देणारे असे उपक्रम प्रत्येक शाळेत योजले जातील अशी अपेक्षा करावी का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...