आज मकरसंक्रांत. उद्या मतदान. निवडणूक, हा लोकशाहीतील सगळ्यात मोठा आणि मकरसंक्रांत, हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा उत्सव. असा दुग्धशर्करा योग यावर्षी जुळून आला आहे. हे दोन्ही उत्सव लोक उत्साहाने साजरा करतील अशी अपेक्षा. संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटण्याची परंपरा पाळली जाते. छोटे मोठ्यांचा आशीर्वाद घेतात. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हणून लोक एकमेकांना उराउरी भेटतात. राजकीय कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे चालवायला हवी. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे शाब्दिक बाण तात्पुरते का होईना भात्यात गेले आहेत. एकमेकांवरचे शरसंधान थांबले आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदानाची आणि निकालाची.
विजयाच्या अंदाजाचे पतंग सगळेच पक्ष उडवत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात सर्वांनी सगळ्या प्रकारची राळ उडवली. परस्परांवर अपप्रचाराची संंक्रांत आणली असेही म्हणता येऊ शकेल. व्हिडिओ लावले गेले. उणीदुणी काढली गेली. अनेकांंच्या पिताश्रींचाही उल्लेख केला गेला. मायमराठीच्या संवर्धनाचे, मराठी माणसाच्या उत्थानाचे गाजर सगळ्याच पक्षांंनी लोकांना दाखवले. पण म्हणजे नेमके काय आणि कधी करणार यावर सर्वानीच चुप्पी साधली. विकासाच्या सरड्याची धाव कुंपणापर्यंतच जाणार. विकासाची कल्पना गटारी बांधणे, उद्याने निर्माण करणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, स्वच्छतागृहे बांधणे इथपर्यंतच मर्यादित राहिली. म्हणजे वर्षानुवर्षे लोकांचे हे प्रश्न सुटलेलेच नाहीत हे कळूनही न कळल्याचा अभिनय सगळेच करत राहिले. त्यात नेते आणि कार्यकर्त्यांचा तरी काय दोष म्हणा, काम केले तर सांगता येईल ना! त्यामुळेच प्रचाराचा भर भेदाभेदांवर आणि वैयक्तिक टीकेवर केंद्रित राहिला.
या सगळ्या गदारोळात विकास हरवून गेला. निवडणूक म्हटली की असे काहीसे घडते हे खरे; पण त्यासाठी सभ्यतेची पातळी सोडणे आता सामान्य बाब बनवले गेले. त्याला ही निवडणूक अपवाद राहिली नाही. हे दुर्दैव खरेच. पण हीच कटुता विसरावी असा संदेश देत संक्रांत आली आहे. प्रचारातील कटुता संपुष्टात यायला हवी. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी परस्पर भिडण्याचे प्रसंगही काही ठिकाणी उद्भवले. प्रकरण हाणामारीपर्यंत देखील गेले. वास्तविक, विजय आणि पराभव या एकाच नाण्याचा दोन बाजू. पण निवडणुकीतील वैरभाव विकासाच्या मुळावर उठू शकतो हे नाकारले जाऊ शकेल का? लोकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सगळ्यांनीच दिले आहे. त्याचा विसर पडू न देणे ही पक्षनेत्यांची जबाबदारी आहे.
लोक एकदाच आणि एकालाच आणि आता प्रभागामुळे एकाच वेळी तीन किंवा चार वेळा मतदान करू शकतात. रचनाच तशी आहे. त्यामुळे पराभवाचे खापर लोकांच्या माथ्यावर न फोडण्याचा आणि विकासाला आडकाठी न करण्याचा विवेक सगळेच दाखवतील. अन्यथा गढूळ वातावरणाची किंमत लोकांनाच जास्त मोजावी लागते. संक्रांतीला महिला विविध वस्तूंचे वाण लुटतात. उद्या सुजाण मतदानाचे वाण लुटण्याची संधी लोकांकडे आहे. त्या पातळीवर संभ्रमावस्था आहे हे खरे. युती आणि आघाडी नेमकी कोणाची कोणाबरोबर, हे कदाचित पक्षनेतेही सांगू शकणार नाहीत. इतका गोंधळ त्यांनीच घालून ठेवला आहे. सत्तेत बरोबर पण निवडणुकीत नाही असे आक्रीत घडवून दाखवले आहे. तरीही मतदानाचे जबाबदार कर्तव्य लोक पार पाडतील. टक्केवारी वाढवतील. कारण घटनेने ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्या अधिकाराचा योग्य वापर करणे लोकांनी शिकणे ही लोकशाहीची खरी गरज आहे.
कोणत्याही आमिषाला बळी पडण्याचा मोह लोकांनी टाळायला हवा. कारण आमिष स्वीकारले तर लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार लोक गमावून बसतात हे लक्षात घ्यायला हवे. आमिष स्वीकारले नाही तरच अमुक एका उमेदवाराला मत का देतो असा प्रश्न मतदार स्वतःला विचारू शकतील. नव्हे, त्यांनी तो विचारायला हवा. लोकप्रतिनिधींकडून कोणती कामे त्यांना अपेक्षित आहेत हे त्यांना माहित असायला हवे. एका मताने काय फरक पडतो किंवा कोणीही निवडून आला तरी काय बदल घडणार आहे अशी मानसिकता अंतिमतः लोकांचाच घात करते. तेव्हा सद्सद्विवेकबुद्धीने मतदान केले तर सामाजिक परिस्थिती बदलवून घेण्याचा अधिकार लोक बजावू शकतील हेच खरे. म्हणून, सुजाण मतदानाचे वाण लुटूया आणि संक्रांत साजरी करूयात.





