किती वेळा त्याच त्याच चुका सरकार आणि माणसे करणार आहेत? त्याची किंमत समान म्हणून आपण अजून किती दिवस मोजणार आहोत? मागच्या चुकांमधून शिकायला तयार नाही अशांची संभावना समाजाने तरी कोणत्या शब्दात करावी? अजून किती अनावस्था प्रसंगांनंतर गर्दीचे नियोजन हे एक शास्त्र आहे हे लक्षात घेतले जाईल? बुद्धी हे फक्त माणसाचे वैशिष्ट्य आहे याचा विसर पडणार्यांना काय म्हणावे? हे सगळे प्रश्न कोलकात्यात नुकत्याच घडलेल्या फुटबॉलपटू मेस्सी घटनेमुळे निर्माण झाले आहेत.
अर्जेटिनाचा हा खेळाडू जगभरातील युवांचा आदर्श आहे. फुटबॉलप्रेमींमध्ये तो विलक्षण लोकप्रिय आहे. तो भारताच्या तीन दिवसांच्या दौर्यावर आहे. कोलकात्यात त्याचा कार्यक्रम होता. अपेक्षेप्रमाणेच त्याच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी, आयोजकांचे नियोजन कोलमडले. गर्दीच्या भावना अनावर झाल्या. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. सुरक्षिततेच्या कारणावरून मेस्सीला तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर संतप्त चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. साहित्याची मोडतोड केली. काही महिन्यांपूर्वी कोलकात्यातच पार पडलेल्या आरसीबी संघाच्या विजयोत्सव प्रसंगी वेगळे काय घडले होते? तेव्हा तर काही प्रेक्षकांचे जीव देखील गेले होते. म्हणजेच त्यानंतरही सरकार आणि आयोजक यांना शहाणपण आलेले नाही. अन्यथा इतया मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनात त्याच त्याच चुका घडल्या नसत्या.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली खरी; पण चुका सुधारल्या जाणार नसतील तर ती माफी काय कामाची? सरकारी यंत्रणेत आपत्ती व्यवस्थापन हा एक विभाग असतो. आपत्ती घडल्यावर नव्हे तर ती घडू नये असे नियोजन करणे हेच त्या विभागाचे काम असते याचा विसर पडला असावा. गर्दीला मेंदू नसतो असे म्हणतात किंवा दुसर्या शब्दात गर्दीचे वर्णन करायचे झाले, तर गर्दीची एकसमान मानसिकता असते. उन्माद असू शकतो. व्यवस्थापनाअभावी जमवलेली गर्दी अनियंत्रित व्हायला एक अफवा पुरेशी ठरते. आरसीबी आणि मेस्सीची घटना हे त्याचे ताजे उदाहरण ठरावे. त्यामुळे गर्दीचे आणि आपत्ती घडू नये किंवा दुर्दैवाने घडली तर तिचे व्यवस्थापन ही हजारोंची गर्दी जमवणार्या आयोजकांची देखील जबाबदारी असते. कार्यक्रमाला परवानगी देण्यापासून तर तो पार पडेपर्यंत आयोजनावर लक्ष ठेवणे आणि व्यवस्थापन आणि नियोजन अचूक नसेल तर गर्दी जमवण्यास परवानगी नाकारणे हे सरकारचे काम असते. ना ते कर्तव्य सरकारने पार पाडले ना आयोजकांनी, हेच उपरोक्त घटनेचे एकमेव वास्तव आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण कोण आहे? त्यांच्या एका कटाक्षासाठी लाखो माणसे मोठमोठ्या रकमेची तिकिटे खरेदी करून गर्दी करू शकतात हे आयोजकांच्याही लक्षात येऊ नये यासारखी चाहत्यांची दुसरी चेष्टा कुठली असू शकेल? उपरोक्त घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी माफी मागायलाच हवी होती. पण, तेवढी पुरेशी नाही. आयोजकांवर कारवाई देखील केली जायला हवी. भविष्यकालीन आयोजकांना धडा घालून दिला जाईल इतपत ती कठोर असावी. जनतेला ती माहित व्हायला हवी. अर्थात, अशा घटनांपासून लोकांनाही स्वतःला नामानिराळे ठेवता येणार नाही.
सामाजिक भान राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. काहीही घडले तरी लोकांनी बेभान होणे कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थनीय नाही. सार्वजनिक साधनसंपत्तीची मोडतोड करून लोक त्यांच्याच पायावर धोंडा पाडून घेतात हे लोकांना तरी कधी कळेल? सामाजिक सुरक्षिततेचा प्रसंग निर्माण झाला की, समाजकंटक एसटी आणि बसगाड्या जाळतात. बसथांबे मोडतात. विजेचे दिवे फोडतात. पण अशा सार्वजनिक पायाभूत सुविधा नागरिकांनी भरलेल्या कराच्या रकमेतूनच उभारल्या जातात. त्याचे नुकसान म्हणजे लोकांच्याच पैशांची उधळपट्टी नाही का? पण सर्वांचेच भान सुटते आणि अनावस्था प्रसंग उद्भवतात. तेव्हा, कार्यक्रम छोटा असो अथवा मोठा, तो निर्धोक पार पाडणे ही सरकार आणि आयोजकांची आणि तसा तो पार पडू देणे ही नागरिकांची जबाबदारी आहे.
दोन्ही घटना कोलकात्यात घडलेल्या असल्या तरी नाशिक जिल्हा प्रशासनासाठी त्या दिशादर्शक ठरू शकतील. दोन वर्षांनी कुंभमेळा होऊ घातलाय. कोट्यवधी भाविक येण्याचे अंदाज आतापासून व्यक्त होत आहेत. बेभान गर्दीमुळे घडणार्या जीवघेण्या प्रसंगांचे चटके नाशिक जिल्हा प्रशासनाने भूतकाळात सहन केले आहेत. त्यामळे एकूणच कुंभमेळा नियोजनात गर्दीचे व्यवस्थापन हा सर्वोच्च प्राधान्याचा एक मुद्दा असेल याची खात्री बाळगावी की अपेक्षा व्यक्त करावी?




