Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रपडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

मुंबई । Mumbai

- Advertisement -

NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ भरती परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटल्याचा खळबळजनक आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. १०० पैकी तब्बल ७८ ते ९० प्रश्न परीक्षेआधीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आल्याने हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, २२ मार्च रोजी पार पडलेल्या या परीक्षेचे प्रश्न २० मार्चलाच व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फिरत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. हा संपूर्ण प्रकार अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे आणि छत्रपती संभाजीनगर येथील अन्य एका विद्यार्थ्याने MPSC व FDA प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्याने आपली तक्रार अचानक मागे घेतली. मात्र, अहिल्यानगरचा तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे आपल्या आरोपांवर ठाम असून, या घोटाळ्यातील संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी जप्त करण्याची मागणी त्याने लावून धरली आहे.

या खळबळजनक आरोपानंतर नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील MPSC कार्यालयात घाईघाईने उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली. सुरुवातीला आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी पत्रकारांना माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आणि “उद्या माहिती देऊ” असे सांगून बोलणे टाळले. मात्र, राजकीय आणि सामाजिक दबाव वाढताच अवघ्या दोन तासांत त्यांनी भूमिका बदलत अधिकृत स्पष्टीकरण जारी केले.

आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले की, “MPSC ने या कथित पेपरफुटी प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. प्राप्त पुरावे, तक्रारी आणि निवेदनांची सखोल पडताळणी केली जात आहे. तपासाअंती या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर फिर्याद (FIR) दाखल केली जाईल.” स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आता MPSC खरोखरच या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करते की हे प्रकरणही इतर घोटाळ्यांसारखे थंड बस्त्यात जाते, याकडे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

भीमनवार

MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचं पेपरफुटीवर पहिल्यांदाच भाष्य, खुलं पत्र लिहित...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (Drug Inspector) पदभरतीच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना आणि राजीनाम्याच्या...