आषाढी वारीच्या पवित्र काळात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमलेला असतानाच हजारो मैल दूर लंडनच्या ऐतिहासिक लॉडर्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रचलेला इतिहास संपूर्ण देशाची छाती अभिमानाने फुगवणारा ठरला आहे. क्रिकेटची पंढरी लॉडर्सच्या ऐतिहासिक हिरवळीवर भारताच्या पराक्रमी रणरागिणींनी यजमान इंग्लंडचा तब्बल २७० धावांनी प्रचंड पराभव केला. हा देदीप्यमान विजय तब्बल १४२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवणारा आणि जागतिक क्रीडापटलावर भारतीय स्त्रीशक्तीच्या अभूतपूर्व कर्तृत्वाची सुवर्णमुद्रा कायमची उमटवणारा एक क्रांतिकारी क्षण आहे.
लंडनच्या या जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक मैदानावर सन १८८४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या पुरुष संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला गेला. मात्र, याच मैदानावर पहिल्या महिला कसोटी सामन्याचे आयोजन होण्यासाठी तब्बल १४२ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी जावा लागला. अखेर १० जुलै २०२६ रोजी भारत व इंग्लंडच्या महिला संघांमध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळविण्याचा सुवर्णयोग आला. भारतीय महिलांनी पराक्रम, जिद्द आणि अजोड कौशल्य यांच्या बळावर मिळविलेला हा विजय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाणारा मैलाचा दगड ठरला आहे.
भारतीय संघाने अभेद्य जिद्द, योग्य समन्वय आणि प्रचंड मानसिक ताकद यांचे उत्तम दर्शन घडविले. भारतीय संघाची धडाकेबाज उपकर्णधार स्मृती मानधनाने या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याच्या दोन्ही डावांत अनुक्रमे ८३ आणि ७० धावांची अत्यंत संयमी, परिपक्व आणि अप्रतिम खेळी करून संघाच्या विशाल धावसंख्येचा भक्कम पाया रचला. तिच्या या धाडसी फलंदाजीने प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच मोठा मानसिक दबाव निर्माण केला तर दुसरीकडे, मधल्या फळीतील हुशार फलंदाज यस्तिका भाटियाने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या आणि तंत्रशुद्ध कौशल्याच्या जोरावर लॉडर्सच्या मैदानावर दिमाखदार शतक झळकावणारी पहिली महिला कसोटीपटू बनण्याचा जागतिक बहुमान संपादन केला.
लॉडर्सच्या ऐतिहासिक खेळपट्टीवर शतक ठोकणे हे जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचे अंतिम स्वप्न असते आणि यस्तिकाने ते पहिल्याच संधीत अत्यंत दिमाखात पूर्ण करून दाखवले. फलंदाजीसोबतच गोलंदाजीच्या आघाडीवर भारताच्या गोलंदाजांनी दाखविलेले कर्तृत्व विशेष कौतुकास्पद ठरले. भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिने घेतलेले अपार कष्ट आणि अचूक मारा हा भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा मुख्य आधारस्तंभ ठरला. या गुणवान वेगवान गोलंदाजाने लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर एका डावात पाच बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज बनण्याचा जागतिक मान मिळवला. तिने दोन्ही डावांत मिळून एकूण सात बळी घेत इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिच्या या भेदक, प्रभावी आणि शिस्तबद्ध मार्यामुळे तिला या ऐतिहासिक सामन्याची सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या कुशल, आक्रमक आणि धोरणी नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने दाखविलेले हे यश अत्यंत प्रेरणारदायी आहे. हरमनप्रीतने जेव्हा लॉडर्सच्या बाल्कनीत उभे राहून तो ऐतिहासिक चषक हवेत उंचावला, तेव्हा ती केवळ एका चांदीच्या करंडकाची प्राप्ती नव्हती, तर भारतीय महिलांच्या अथांग संघर्षाचा, अथक परिश्रमांचा आणि अजोड आत्मविश्वासाचा तो सर्वोच्च जागतिक गौरव होता. या ऐतिहासिक आणि रोमहर्षक विजयानंतर क्रिकेटजगताचा देव मानला गेलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यासह देश-विदेशातील अनेक क्रीडा दिग्गजांनी भारतीय महिला संघाचे मनःपूर्वक आणि भरभरून अभिनंदन केले आहे. हा विजय केवळ क्रिकेट या खेळापुरता मर्यादित मुळीच नाही, तर तो भारतातील आणि जगभरातील कोट्यवधी लहान मुलींना क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य आणि करिअर घडविण्यासाठी एक नवी दिशा आणि प्रचंड मोठी प्रेरणा देणारा ठरेल.
एकेकाळी पुरुषी मक्तेदारी मानल्या गेलेल्या या क्रिकेटच्या खेळात आज भारतीय महिलांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जगात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जागतिक पातळीवर देशाची मान उंचावणार्या या सर्व रणरागिणींचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्या बीसीसीआय व क्रीडा व्यवस्थापनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भारतीय महिला क्रिकेटचा हा खर्या अर्थाने गौरवशाली सुवर्णकाळ असून, या संघाने आता मागे वळून न बघता भविष्यातही अशीच देदीप्यमान आणि ऐतिहासिक कामगिरी अविरतपणे सुरू ठेवावी, हीच १४० कोटी देशवासीयांची सदिच्छा आहे. क्रिकेटच्या पंढरीत उमटलेली ही भारतीय विजयाची सुवर्णमुद्रा क्रीडा क्षेत्राचा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. भारताच्या या पराक्रमी रणरागिणींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा!




