जगाच्या केंद्रस्थानी सध्या जेन झी पिढी आहे. जेन झी म्हणजे झुमर्स. म्हणजे १९९७ ते २०१२ च्या दरम्यान जन्मलेली मुले-मुली. या पिढीने अनेक देशांमध्ये कसे सत्तांतर घडवले याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यात कौतुकच जास्त आढळते. सर्जनशील युवाशक्तीच्या बळावर कोणताही देश विकासाची स्वप्ने पाहू शकतो. भारत तर विश्वगुरू होण्याची महत्वाकांक्षा राखून आहे. तथापि वैचारिक परिपक्वतेअभावी आणि ते ज्यांना नेते मानतात त्यांचे प्रभावशाली नियंत्रण नसेल तर ही पिढी भरकटत जाण्याचा आणि त्यांनी छेडलेले कोणतेही आंदोलन दिशाहीन होण्याचा धोका कोणीही नाकारणार नाही. अशी पिढी रस्त्यावर उतरली तरी सरकारी मालमत्ता भक्ष्यस्थानी पडते. जी नागरिकांच्या करातून उभी राहाते.
नेपाळ हे त्याचे सध्याचे ज्वलंत उदाहरण आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. पण विध्वंस तर घडून गेला आहे. त्यामुळे आवाहन अर्थहीन ठरू शकेल. बालेन यांनी नेपाळचे नेतृत्व करावे असे युवांना वाटते. नेपाळमधील युवांचा संताप अनाठायी नव्हता. पण आंदोलकांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नव्हते. नेपाळच्या विध्वसांचे जे वृत्त माध्यमात प्रसिद्ध होत आहे ते या अर्थाने कमालीचे निराशाजनक आणि अस्वस्थ करणारे आहे. शासकीय कार्यालयांसह अनेक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त आहेत. तुरुंगातून कैदी फरार आहेत. हा देश विकासाच्या रांगेत किमान पन्नास वर्षे मागे गेला असे म्हणणे वावगे ठरू नये.
भारतातही समाजमाध्यमांवरील तथाकथित अनेक प्रभावकांची (इन्फ्लुएन्सर्स) वैचारिक प्रगल्भता चर्चेचा मुद्दा ठरू शकेल. मग त्यांना मानणार्यांकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करता येऊ शकेल का? अलीकडच्या दोन-तीन वर्षांपूर्वी एका भाऊने हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवले होते. तेव्हाही अशीच मोडतोड झाली होती. आंदोलनातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. हे लोकांच्या आठवणीत असू शकेल. तेव्हा मुद्दा आहे वैचारिक पिढी घडवण्याची जबाबदारी कोणाची? ती सामूहिक जबाबदारी आहे. पालक, समाज, राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, सामाजिक संस्था असे कोणीही त्या जबाबदारीतून वगळले जाऊ शकणार नाही.
सर्वांनी मिळून काम करणे ही काळाची गरज नेपाळने अधिकच ठसठशीत केली आहे. त्याची सुरुवात घरापासून होते. सुजाण पिढी घडवण्याची सुरुवात पालकांपासून होते. मूल्यसंस्कार करण्याची, मुलांना चांगला माणूस घडवण्याची संपूर्ण जबाबदारी शाळेवर ढकलण्याची फॅशनच अलीकडच्या काळात रुजली आहे. शाळा त्या बदलाचा एक भाग आहेत हे मात्र नक्की. पालक मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. मुले आणि पालक यांच्यातील संवाद हरवला आहे असे मानसतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचा विचार पालकांनी करायला हवा. मूल्यसंस्काराचे नवनवे आणि जेन झी ला आपलेसे वाटतील असे नवमार्ग शोधण्याचे काम जाणते आणि सामाजिक संस्था करू शकतील.
सर्वच राजकीय पक्षांच्या युवा शाखा आहेत. युवाशक्तीचा राजकारणाचे हत्यार म्हणून वापरण्यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही. सामाजिक समस्या तडीला लावण्यासाठी युवा शाखा रस्त्यावर उतरतात असे वरवरचे चित्र आढळते. त्यामागचा राजकीय स्वार्थ जनतेपासून लपत नाही. राजकारण करता करता त्यांत सामाजिक भान रुजावे म्हणून किती पक्ष काम करतात? निवडणुका जवळ आल्या म्हणजे कार्यकर्ता प्रशिक्षण राबवणे म्हणजे सामाजिक भान रुजवणे नव्हे. जेन झी तंत्रज्ञानाच्या काळातच जन्मली आहे. या क्षेत्रातील त्यांचे आकलन स्तिमित करणारे आहे. तोही संवादाचा एक मार्ग ठरू शकेल. समाजमाध्यमांवर समजदार, प्रगल्भ आणि अभ्यासू प्रभाविकांची कमतरता नाही. ते आदर्श म्हणून पुढे कसे येतील, ते आणि सामान्य युवा त्यांच्या संवादाचा पूल कसा उभा राहील, प्रभावकांच्या माध्यमातून सामाजिक भान कसे रुजेल यावर सर्वांनी मिळून काम करणे जाणत्यांना अपेक्षित असेल. किंबहुना ते करावेच लागेल.
वैचारिक समाजच विकासाचा मार्ग प्रशस्त करतो. भारत तर तरुणांचा देश मानला जातो. याच तरुणाईच्या बळावर महासत्ता बनू शकेल अशी आशा सातत्याने व्यक्त होते. जेन झी पिढी ताकदवान आहे. ते बदल घडवू शकतात हे अनेक देशांमध्ये अधोरेखित झाले आहे. तो बदल नकारात्मक घडवायचा की सकारात्मक या प्रश्नाचे सक्रिय उत्तर सर्वांनी मिळून शोधायला हवे. हा धडा नेपाळने घालून दिला असे म्हणणे संयुक्तीक ठरू शकेल.




