Saturday, April 11, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १९ फेब्रुवारी २०२६ - नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

संपादकीय : १९ फेब्रुवारी २०२६ – नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. असे निमित्त साधून स्मरण त्यांचे करावे लागते, ज्यांचा विसर समाजाला पडतो. छत्रपती तर गेली ३९५ वर्षे सामान्य माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचे गारूड अनादी काळापर्यंत असेच कायम राहील. म्हणूनच त्यांची जयंती साजरी करण्यासाठी कोणालाही आवतण धाडावे लागत नाही. घरचे कार्य असल्यासारखी माणसे या दिवशी झपाटली जातात. त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अनेकांचे पाय आपसूकच गडकिल्ल्यांच्या, विशेषतः शिवनेरीच्या वाटेवर चालू लागतात. अनेक जण त्यांच्या परिसरातील पुतळ्याला नमन करतात. घरातसुद्धा त्यांच्या प्रतिकृतीला सजावट करतात. त्यांचे विचार आणि त्यांचा पराक्रमच तसा होता. त्यांचे विचार कालातीत आहेत. स्वराज्यात सामान्य माणूस कारभाराच्या केंद्रस्थानी होता. महाराजांचा कृषीविषयक दृष्टिकोन स्पष्ट होता. स्त्रियांची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावणेही त्यांना मंजूर होते.

- Advertisement -

रयत सुखी तर राजा सुखी हेच त्यांचे तत्त्व होते. स्वराज्याच्या या तत्त्वांशी बेईमानी करणार्‍याला कडक शासन हाच त्यांचा दंडक होता. या तत्त्वांपुढे नातीगोतीदेखील त्यांनी अनेकदा पणाला लावली. मावळ्यांच्या मनावर तेच बिंबवले. म्हणूनच लोकांनी त्यांना देवत्व बहाल केले आहे. त्यांचे वर्णन प्रजाहितदक्ष राजा असेच केले जाते. याचे अनेक दाखले गोष्टीरूपाने लोकांनी वाचले आहेत. इतिहासकारही सांगतात. त्यांची थोरवी वर्णन करणारे साहित्य उपलब्ध आहे. राजांचे विचार आजही अनुकरणीयच आहेत. त्यांचा पराक्रम आणि विचार जाणून घेत राहणे हे लोकांचे आद्य कर्तव्य आहे. ते अनेक मार्गांनी पार पाडले जाऊ शकेल. त्यांच्या इतिहासाचे वाचन आणि अभ्यास करता येईल.

इतिहासाच्या अप्रकाशित पानांचा शोध घेण्यासाठी संशोधन केले जाऊ शकेल. त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांना भेटी देता येतील. त्यांचा विवेकी दृष्टिकोन, सामाजिक सलोखा अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील. महाराजांचा प्रेरणादायी प्रवास लोकांपर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यात सरकार मोलाची भूमिका बजावू शकेल. गडकिल्ल्यांचे संवर्धन हा त्याचा एक मार्ग आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश झाला आहे. तसे अधिकृत प्रमाणपत्रदेखील सरकारला प्राप्त झाले आहे. मराठी मुलखातील जनतेला त्याचे कौतुक आहेच. महाराजांचे दुर्गविज्ञान, त्यांची स्थापत्य शैली, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदान याविषयी बोलणे हा लोकांच्या अभिमानाचा एक भाग आहे. राजकीय नेते आणि सत्ताधारी त्यात आघाडीवर असतात. पण दुसरीकडे त्याच किल्ल्यांचे संवर्धन करता येऊ नये? त्याला प्राधान्य देता येऊ नये? राजकारण करण्यासारखे अनेक मुद्दे असताना यावरून राजकारण केले जावे? अर्थात, असा दुटप्पीपणा अनेक बाबतीत सामान्यांच्या अनुभवास येतो हा भाग अलाहिदा. त्याची अनेक उदाहरणे सांगितली जाऊ शकतील. गडकिल्ले हा छत्रपतींच्या पराक्रमाचा जिताजागता स्रोत आहे.

युनेस्कोच्या प्रमाणपत्राने राजांचा पराक्रम जागतिक स्तरावर पोहोचला. पण तो प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी परदेशी आणि देशातील पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील, इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना हे किल्ले कसे दिसतील? कसे दिसतात? बहुसंख्य किल्ल्यांची पडझड झाली आहे. त्यांच्या संघर्षाच्या पाऊलखुणा पुसट होत चालल्या आहेत. त्यांचे संवर्धन हा संशोधनाचा, स्वतंत्र अभ्यासाचा आणि दीर्घकालीन धोरणाचा विषय आहे. किल्ल्यांची स्थिती, प्रदेशाची भौगोलिकता, हवामान, वातावरण, स्थानिक गरजा असे अनेक मुद्दे त्यात अंतर्भूत असतात. त्यानुसार प्रत्येक किल्ल्याचा आराखडा शास्त्रोक्त पद्धतीने तयार करावा लागेल. यात योगदान देण्यासाठी शिवप्रेमींची फळी इच्छुक असेल हे नक्की. त्यात नामवंत गिर्यारोहण संस्था, ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक, सामाजिक संस्था यांचा समावेश करता येईल.

शाळकरी मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यावरची अभिनव चित्रप्रदर्शनी केली जाऊ शकेल. ज्याद्वारे त्यांना शिवाजी महाराजांचा परिचय सोप्या पद्धतीने करून दिला जाऊ शकेल. कदाचित त्यातूनच राजांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची प्रेरणा मुले घेऊ शकतील. छत्रपतींचा देदीप्यमान इतिहास बिंबवण्याचे असे बहुविध मार्ग असू शकतील. मुद्दा राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा आहे. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी आणि सार्वजनिक मिरवणुका हे समीकरण झाले आहे. त्यात युवा उत्साहात आणि मोठ्या संख्येने सहभागी होतात. पण सरकारचा, राजकीय व्यक्तींचा आणि जनतेचाही तो उत्साह एका दिवसात मावळायला नको. कारण शिवाजीराजांचा सन्मान टिकवण्याची जबाबदारी सरकारची आणि जनतेचीदेखील आहे याचा विसर निदान यापुढे तरी पडू नये.

ताज्या बातम्या

भाडेतत्वावरील घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा...