Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १९ नोव्हेंबर २०२४ - दुःखितांच्या वेदनांच्या कळा आमच्याही उरात

संपादकीय : १९ नोव्हेंबर २०२४ – दुःखितांच्या वेदनांच्या कळा आमच्याही उरात

कोणत्याही ठिकाणाला आग लागली की एक प्रतिक्षिप्त क्रिया अनुभवास येते. त्या ठिकाणची आणि परिसरातील माणसे आगीपासून जीव वाचवण्यासाठी धाव घेतात. आगीत काही माणसे सापडली असतील का? ती अडकली असतील का? त्यांना तिथून बाहेर पडता आले नाही तर? असे प्रश्नही त्याक्षणी कोणाला पडत नसावेत. सामान्यतः असे घडणे स्वाभाविक मानले जाते. एवढेच नव्हे तर आग लागल्याच्या नुसत्या शंकेने किंवा अफवेनेदेखील माणसे चालत्या रेल्वेतून, इमारतींच्या खिडकीतून बाहेर उड्या मारतात. तो मानवी स्वभाव आहे, असेही अनेक जण म्हणतात.

पण झाँशी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरातील तिघांना मात्र उपरोक्त प्रश्न पडले. त्यावर त्यांनी त्यांच्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेश झाँशी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. माणसे आगीपासून वाचवण्यासाठी बाहेर धाव घेत असताना त्या तिघांनी मात्र रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि मदत केली. परिणामी काही बालकांचा जीव वाचू शकला. त्यांच्या या प्रयत्नांची गोष्ट माध्यमांत प्रसिद्ध झाली आहे.

- Advertisement -

मानवता अजूनही जिवंत आहे हेच त्यांनी समाजाला दाखवून दिले. हा मूल्यसंस्कारांचादेखील दाखला मानला जाऊ शकेल. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धाव घेऊन संस्कारांचा पगडा अजूनही बळकट असल्याचे त्यांच्या कृतीने अधोरेखित केले. आधुनिक साधनांच्या बोलबाल्याच्या काळात माणसे आत्मकेंद्रित आणि काहीशी स्वार्थी होत चालल्याची टीका वारंवार केली जाते. त्यातील तथ्यता अधूनमधून अनुभवासदेखील येते. पीडितांना मदत करण्याऐवजी घटनेचे चित्रिकरण करणारी माणसेदेखील आढळतात. क्षुल्लक कारणावरून माणसे एकमेकांचा जीव घेतात. असे घडले की चिंता व्यक्त केली जाते. माणुसकी, सामाजिक बांधिलकी, मदतीचा हात पुढे करणे संपुष्टात येत चालल्याचे बोलले जाते. तथापि समाजाचे चित्र लोकांना वाटते तितके काळवंडलेले नाही हेच उपरोक्त व्यक्तींनी त्यांच्या कृतीतून दाखवले.

समाजही त्यांच्या धाडसाचे नक्कीच कौतुक करेल. लागलेली आग आणि त्यात होरपळून मृत्यू झालेली अजाण बालके या घटनेने मने विषण्ण आहेत. दुर्दैवी घटनेनंतरचे कवित्व सुरू आहे. घटना कशी घडली? तेव्हाची परिस्थिती काय होती? कोण दोषी आहेत? याचा शोध सरकारी पद्धतीने घेतला जात असल्याचे सांगितले जाते. कदाचित दोषींना शासनही होऊ शकेल. नेमके काय घडेल हे कदाचित आगामी काळात समाजासमोर येईलही. तथापि मानवतेवरचा विश्वास बळकट झाला हे विशेष प्रेरणादायी ठरावे. ‘अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात, दुःखितांच्या वेदनांच्या कळा आमच्याही उरात’ असे कवी अनिल म्हणतात. मदतकर्त्यांच्याही मनात त्याच भावना असतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...