नवीन वर्षात कोणतेही संकट येऊ नये अशीच प्रार्थना सर्वांनी केली असेल. पण त्या मुलींसाठी मात्र रोजचा दिवस संकट घेऊन येण्याची शक्यताच जास्त असू शकेल. म्हणूनच कदाचित कोणत्याही संकटाला पुरून उरण्याची क्षमता त्या खेळातून कमावत असाव्यात. ही कथा आहे, राजस्थानच्या अजमेर-केकरी परिसरातील सुमारे 14-15 गावांची. मुळात समाजव्यवस्था महिलांसाठी काहीशी अन्यायकारकच मानली जाते. त्यात भर म्हणजे त्या राजस्थानच्या. जे राज्य महिलांसाठी अजूनही काळाच्या पाच पावले मागेच मानले जाते.
बालविवाह तिथल्या मुलींच्या पाचवीलाच पुजलेला आढळतो. सुमारे अडीचशे मुली मात्र त्याविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना महिला जनाधिकार समितीने पाठबळ दिले. या मुली त्यांचे अकाली विवाह टाळण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्या गावांमधील सुमारे पाचशे मुली ़फुटबॉल खेळतात. अनेक मुली प्रशिक्षक बनल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठीदेखील या मुली जीवतोड मेहनत घेत असल्याचे यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. हा मुक्काम गाठणे त्यांच्यासाठी सोपे नसेलच. मुळात त्यांना आधी स्वतःशी लढावे लागले असेल. प्रवाहाला शरण जायचे नाही हे बजवावे लागेल असेल.
पालकांना भूमिका पटवून देऊन त्यांनाही परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी कष्ट उपसावे लागले असतील. पुढच्या आयुष्याला ध्येय आणि जगण्याला कारण दिले नाही तर पालक आणि समाज फारकाळ पाठिंबा देऊ शकणार नाही, हे मुलींच्या वेळीच लक्षात आले असावे. म्हणूनच गावोगावी फुटबॉल खेळणे सुरू झाले असावे. अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचे धाडस त्यातूनच मुलींना आले असावे. त्यांचा हा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षावर माहितीपट प्रसारित झाला आहे. त्याने अनेक पारितोषिकेदेखील पटकावली आहेत. देशात बालविवाहाची समस्या गंभीर आहे. ते रोखण्यासाठी सरकारी कायदे आहेत. समित्या आहेत.
सामाजिक संस्था आहेत. सरकार एक हेल्पलाईनदेखील चालवते. पण ‘घोड्याला फक्त पाण्यापर्यंत नेता येते..पाणी मात्र त्यालाच प्यावे लागते’ ही म्हण इथेही चपखल लागू पडू शकेल. समस्या सोडवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. रडूबाई बनून काहीच साध्य होणार नाही. संकटांना घाबरू नका. त्यावर मात करण्याची क्षमता कमवा. इतरांचा आधार बना. असेच त्यांना इतर महिलांना सुचवायचे असावे. मुला-मुलींचे सोळा-सतरा हे वय अडनिडे, धोकादायक वळणाचे मानले जाते. या वयात समज कमी असते असा पक्का ग्रह आढळतो. तथापि त्याच वयाच्या मुलींनी त्यांच्या कृतीतून या गृहीतकाला थोडा तरी धक्का द्यायचा प्रयत्न केला आहे. ‘एकत्रितपणे आपण सर्वोच्च शिखरावर पोहोचू आणि आमच्या सर्व शक्तीने आमचे ध्येय साध्य करू’ असे एक कवयित्री म्हणते. त्यातील मर्म लक्षात घेऊन नव्या वर्षात संकटांना भिडण्याचा संकल्प करूया.