आज दसरा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक. लोक त्यांच्या विविध शुभकार्यांची सुरुवात या दिवशी करतात. भारतीय हिंदू संस्कृतीतील हा महत्त्वाचा सण. याचे अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ सांगितले जातात. ते सांगणार्या अनेक कथाही प्रचलित आहेत. वाईटावर चांगल्याची किंवा दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींची मात हेच त्यांचे सार सांगितले जाऊ शकेल. आजच्या दिवशी सीमोल्लंघनाची प्रथा पाळली जाते. बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर या संकल्पनेकडे व्यापक अर्थाने पाहिले जाऊ शकेल.
आंतरराष्ट्रीय नकाशावर भारताची देश म्हणून चौफेर घोडदौड सुरू आहे. रोज त्याचे नवनवे दाखले समाज माध्यमांवर समाजाचे लक्ष वेधून घेतात. युवांच्या भाषेत व्हायरल होतात. आत्मसन्मान आणि स्वहित जपण्यासाठी ठाम भूमिका घेणारा आणि त्यासाठी जागतिक महासत्तेशीदेखील पंगा घेणारा देश ही भारताची नवी ओळख बनत आहे. देशांतर्गत स्थिरता, शांंतता आणि सुजाण समाज ती ओळख अधिक बळकट बनवू शकेल. प्रत्येक देशाच्या भौगोलिक सीमा असतात. त्या सीमा देशाचे नकाशावरील स्थान दर्शवतात. पण त्या सीमा म्हणजे देश नव्हे. त्या देशातील समाज ही त्या देशाची खरी ओळख ठरते. भारत हा तरुण देश मानला जातो. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. या घटकाने मनावर घेतले तर देश जगाला चकित करणारी प्रगती करू शकेल.
देशातील अनेक समूह, उद्योग, आस्थापना आणि युवा तसे काम करत आहेत. टॅरिफ युद्धात अनेक मोठ्या उद्योजकांनी देशाला पाठबळ दिले. सध्या झोहो खूप चर्चेत आहे. आमची कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला टक्कर देऊ शकते हे म्हणण्याचे धारिष्ट्य या कंपनीने कमावले आहे. ही वानगीदाखलची उदाहरणे. सामान्य माणसेही त्यांच्या परीने देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लावू शकतात. एकमेकांच्या घरी गेल्यावर लोक त्यांची सांपत्तिक स्थिती पाहत नाहीत तर त्या घरातील सदस्यांचे एकूण वर्तन बघतात. ते वर्तन त्या घराची सामाजिक ओळख ठरवते. तद्वतच, देशांतर्गत सामाजिक वर्तन देशाची सांस्कृतिक ओळख ठरवते. त्या पातळीवरचे वास्तव मात्र काहीसे अस्वस्थ करणारे ठरावे.
भेदाभेद, वैचारिक अस्थिरता, सामान्य नागरिकांमधील सुजाणत्वाचा आणि सामाजिक भानाचा अभाव चिंतेचा विषय आहे. मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत असे म्हटले जरी जात असले तरी जातीपातींच्या मुद्यांवरून माणसांमध्ये मनभेदच जास्त आढळतात. कायदे धाब्यावर बसवण्यासाठी आणि नियम मोडण्यासाठीच बनवले गेले आहेत, असा गैरसमज खोलवर मुरला आहे. माणसे वाटेल तिथे कचरा फेकतात. नद्यांचा नाला व्हायला हातभार लावतात. सार्वजनिक जागा अस्वच्छ करणे किंवा रस्त्यांवर थुंकणे हा सामान्य माणसे त्यांचा जन्मसिद्ध अधिकार मानतात. रांगेत उभे राहायला कोणीच तयार नसते. मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. सामाजिक दंगली उसळल्या की दंगलखोर सार्वजनिक मालमत्तेला आग लावतात. तथापि, सार्वजनिक मालमत्ता नागरिकांनी भरलेल्या कररूपी पैशातूनच निर्माण केली जाते हे अनेकांच्या गावीदेखील नसते. भ्रष्टाचार वाढल्याची तक्रार सगळेच करतात. पण तो वाढण्यासाठी माणसेच त्यांच्या कळत-नकळत कारणीभूत ठरतात.
माणसे चुकीच्या विचारांच्या प्रभावात येतात. अशा विविध मुद्यांवरून देशांतर्गत अस्थिरता देशाच्या प्रगतीतील मुख्य अडथळा तर असतेच, पण ती मनुष्यत्वाचीदेखील मोठी हानी ठरते. दसर्याला सोने लुटण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहात पाळली जाते. आपट्याच्या झाडांच्या पानाच्या रूपाने माणसे प्रतिकात्मक सोने लुटतात. समाजविघातक आणि उपरोक्त सवयींवर, बेजबाबदार वर्तनावर, व्यसनाधीनतेवर, नियम मोडण्याच्या वृत्तीवर मात करण्याचा निश्चय माणसे आजच्या निमित्ताने करू शकतील. वाईटावर चांगल्याची मात करण्याचे सीमोल्लंघन करू शकतील. वैचारिक प्रगल्भतेचे, संयमाचे, सहनशीलतेचे, सामाजिक समरसतेचे, बंधुत्वाचे सोने लुटू शकतील. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूलभूत तत्त्वे मानली जातात. ती आचरणात आणण्यासाठी असतात याची जाणीव होणे म्हणजे खर्या अर्थाने दसरा साजरा झाला असे ठरू शकेल. असा समाज देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ठरतो. देशातील तरुण लोकसंख्येने मनावर घेण्याची गरज आहे. ती जाणीव निर्माण व्हावी, याच दसर्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा.




