समाजात जातिभेदाचे राजकारण जोरात सुरू असतांना, निश्चय केला तर दहा वर्षात लोकांच्या मनातून जातिभेद नष्ट करणे शक्य असल्याचा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच व्यक्त केला. जात समाजाच्या तळागाळात रुजली आणि भेदाभेदाचे कारण बनली. भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी जातिभेद नष्ट करावा लागेल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर विशिष्ट कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती शक्य आहे, असेही ते म्हणाले. भागवत यांनी अत्यंत जटील समस्येला थेट हात घातला आणि त्यावर व्यापक भूमिका घेतली, त्याचे समाज स्वागत करेल. कारण जातिभेदाचे उग्र चटके सामान्य माणसांना सहन करावे लागतात. हे भेद इतके खोलवर रुजले आहेत की, त्या अस्मितेपोटी अनेक माणसे त्यांच्या पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहात नाहीत.
जातिबाह्य विवाह आजही व्यापक पातळीवर समाजसंंमत नाहीत. जातिभेदाच्या भीषण परिणामांचे हे एक उदाहरण आहे. बाकी परिणामाची यादी मोठीच असू शकेल. जातिभेद सोडून द्या असे सगळेच सांगतात. सर्व संतांनी तरी वेगळे काय सांगितले? ‘संतू म्हणे जाती दोनच त्या आहे.स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे..’ असे संत जगनाडे महाराज म्हणतात. जातिभेद नको असे राजकारणी म्हणतात. जाती मानू नका असे सामान्य माणसे म्हणतात. सामाजिक संघटना त्याचाच पुनरुच्चार करतात. पण त्यासाठीची कालमर्यादा भागवत यांनी घालून दिली हे महत्वाचे आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी कालमर्यादा आवश्यक असते. संघाचे कोट्यवधी स्वयंसेवक आहेत. संघाचा जागतिक विस्तार देखील झाला आहे. संघाच्या सेवाकार्याचे अनेक दाखले अधूनमधून दिले जातात. अशा संघटनेचे प्रमुख जेव्हा उपरोक्त आवाहन करतात, तेव्हा त्याला सखोल अर्थ असतो. त्यांचे बोल त्यांंच्या अनुयायांसाठी अनमोल असतात. ते भागवत यांचे आवाहन निश्चितपणे मनावर घेतील अशी लोकांची अपेक्षा आहे.
संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या वर्षात संघ अनेक कार्यक्रम राबवताना आढळतो. अनेक प्रमुख मुद्यांवर काम करत असल्याचे स्वयंसेवक सांगतात. जातिभेद निर्मूलनासाठीचा कालबद्ध कार्यक्रम संघ हाती घेईल अशी आशा प्रगतिशील लोकांच्या मनात पल्लवित झाली असेल. सामान्य माणसांना बदल हवा असतो. तथापि, त्याचे निमित्त बनण्याचे धाडस सगळीच माणसे दाखवू शकत नाहीत. किंबहुना, त्याची सुरुवात दुसर्या कोणीतरी करावी अशीच भूमिका अनुभवास येते. तसे घडले तर सामान्य माणसे बदलकर्त्याच्या-संघटनेच्या मागे उभे तर राहातातच; पण ते बदल अंगीकारण्याचा मनापासून प्रयत्न देखील करतात. संघाचा विस्तार हे त्याचे चपखल उदाहरण ठरू शकेल. जातिभेदाचा मुद्दा देखील त्याला अपवाद नसू शकेल. संघाच्या पातळीवर असा कार्यक्रम सुरू झाला तर लोक देखील तो स्वीकारण्याची शक्यता कैक पटीने बळावू शकेल. नव्हे, संघाची कार्यपद्धती लक्षात घेता तसा उपक्रम तयार देखील असू शकेल. तथापि, राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे काय? संघशक्तीमुळे ज्यांना सत्ता मिळाली असे बोलले जाते, ते भागवत यांच्याइतकी व्यापक भूमिका घेऊ शकतील का, हा खरा प्रश्न आहे.
राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना जातिभेद प्रवाहात सामील करून घेण्याचे मोठेच आव्हान ठरू शकेल. कारण जातिभेदाशिवाय राजकारण शक्य नाही असा ठाम समज सगळ्याच पक्षांचा आढळतो. निवडणुकीच्या राजकारणात जाती अत्यावश्यक घटक असल्याचे लोक अनुभवतात. किंबहुना, उमेदवारीसाठी जात हा आवश्यक निकष बनला आहे यात कोणाचेही दुमत नसावे. त्यालाच जातीपातीचा समतोल विचार असे गोंडस नाव हेच पक्ष बहाल करतात. ज्या मनातून जात हद्दपार करण्याचे स्वप्न भागवत बघतात, त्याच मनामनात जात खोलवर रुजवण्यात राजकीय पक्ष आघाडीवर असतात. परिणामी जे नेत्यांच्या मनात, त्याचीच री कार्यकर्ते ओढतात. पण आता हा गुंता भागवत म्हणजेच संघ नक्की सोडवू शकेल. कारण सत्ताप्राप्तीसाठी अपरिहार्य घटक मानल्या जाणार्या संघाशी पंगा कोण घेऊ शकेल? त्यामुळे भागवत यांनी केलेले आवाहन काही काळानंतर लोकांच्या अनुभवास येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.




