महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा वारसा लाभला आहे. तो वारसा जतन करायचा असेल तर लोकांना अंधश्रद्धांचा त्याग करावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विचारांचा संघर्ष विचारांनी करणेच राज्यघटनेला अभिप्रेत आहे. तथापि, लोकांना त्यांच्या मूलभूत कर्तव्याचा विसर पडला आहे, असे मत माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांची संपन्न परंपरा आहे. त्यांनी सर्वांनीच त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या परीने समाजावरचा अंधश्रद्धांचा विळखा हटवण्यासाठी कष्ट वेचले. अभंगांमधून कठोर प्रहार केले. शिक्षणाने माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. माणसे तर्कसंगत विचार करू लागतात.
सामाजिक बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होते. माणसे अनिष्ठ रुढी आणि परंपरा यांचा त्यांच्याही नकळत त्याग करतील अशा उद्देशांनी समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारकांनी शिक्षणाचा प्रसार केला. त्याला काहीअंशी फळे आली, नाही असे नाही. पण कालौघात बहुसंख्य लोकांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला आढळतो. संतांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे बहुसंख्य माणसे विसरली असावीत. अन्यथा संतांचे विचार अंमलात आणले गेले असते. उद्धार संत न करिती| मार्ग सांगती जनांपति| त्यांच्या बोधवचने प्रगती| केली पाहिजे साधके॥ असा उपदेश संत तुकडोजी महाराजांनी केला आहे. अशा संत वचनांमधील गर्भितार्थ लोकांनी लक्षात घ्यायला हवा. दुर्दैवाने राजकारणीही त्यांच्या सोयीनेच विचारांचा पुरस्कार करतात. अघोरी पूजा करतात. मुख्यमंंत्री गणपतीला दूध पाजतात.
मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री कामाख्या देवीच्या दर्शनाला जातात. ही शासकीय पातळीवरील कायद्याची पायमल्ली नाही का? समाजावर राजकारण्यांचा प्रभाव असतो त्यामुळे लोकांनाही तेच बरोबर वाटू लागले तर त्यात नवल नाही. कोणत्याही चांगल्या बदलांची सुरुवात स्वतःपासून करायची असते. पण त्याऐवजी बदल नेहमी दुसर्याच्या घरापासून सुरू व्हावेत अशीच अपेक्षा आढळते. म्हणूनच, ‘अण्णा हजारे कुठे आहेत’ अशा आशयाची विचारणा करणारा फलक पुण्यात झळकला. त्याला अण्णांनी जे उत्तर दिले ते लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे ठरू शकेल. वयाच्या नव्वदाव्या वर्षी अण्णांनी काम करावे आणि लोकांनी मात्र झोपून राहावे हे योग्य नव्हे, असे अण्णांनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. दुसर्याकडे बोट दाखवून बदल घडणार नाहीत याची आठवण अण्णांनी करून दिल्याचे त्यात म्हटले आहे.
संत आणि समाजसुधारकही त्यांच्या साहित्यातून वेगळे काय सांगतात? वास्तविक, सामाजिक विकास प्रक्रियेतील लोकसहभाग सामाजिक परिवर्तन प्रक्रियेला गती देतो आणि शाश्वत विकास घडवू शकतो याची अनेक उदाहरणे आढळतात. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही त्यापैकी काही गावांची नावे. अशा अनेक गावांचा कायापालट लोकांच्या बळावरच होऊ शकला. अण्णांच्या पुढाकाराने माहिती अधिकार कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, लोकपाल, लोकायुक्त अशा कायद्यांची शस्त्रे लोकांच्या हाती दिली. अनेक गावांनी कात टाकली. तथापि अण्णांच्या मागेही लाखोंची लोकशक्ती उभी ठाकली होती म्हणूनच परिवर्तन घडू शकले हे अण्णांनीही अनेकदा मान्य केले आहे. म्हणजेच लोकसंघटनेत विलक्षण ताकद असते. पण त्याची जाणीव अभावाने आढळते. त्याऐवजी कायदे धाब्यावर बसवणे, नियमांना हरताळ फासणे, नियमांची आणि कर्तव्याची आठवण करून देणार्यांशी अरेरावीचे वर्तन यालाच पराक्रम मानला जातो.
सामाजिक भानाचा अभाव मग यंत्रणेच्याही सोयीचा ठरतो. उदाहरणार्थ, जादूटोणाविरोधी कायदा करून काही वर्षे उलटली. पण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे यंत्रणेचेच कर्तव्य असते याचा सोयीस्कर विसर सर्वांना पडतो. २०१३ साली हा कायदा अस्तित्वात आला, पण अद्यापही त्याच्या नियमांमध्ये स्पष्टता नाही. लोकांपर्यंत हा कायदा पोहोचलेला नाही, अशी तक्रार या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते करतात. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अनेक बदलांना मारक ठरू शकतो. सुजाण समाज तसा दबाव यंत्रणा आणि शासनकर्त्यांवर निर्माण करू शकतो. यंत्रणेला जनहिताची कामे करण्यास भाग पाडू शकतो. पण त्यासाठी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव असायला हवी. सामाजिक भान जागरुक असायला हवे. याचीच आठवण न्यायमूर्तींनी आणि अण्णा हजारे यांनी करून दिली आहे. त्यातील मतितार्थ लोक लक्षात घेतील का?




