Friday, January 23, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २१ जानेवारी २०२६ - इथेही भरारी पथके!

संपादकीय : २१ जानेवारी २०२६ – इथेही भरारी पथके!

आता दहावी आणि बारावी इयत्तांसाठी घेतल्या जाणार्‍या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी देखील यंदा प्रथमच भरारी पथके नेमण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. या परीक्षा पारदर्शकपणे पार पडतात-याची पाहणी करणे, विद्यार्थ्यांनी जर्नल पूर्ण केली आहेत का, शाळेची प्रयोगशाळा अद्ययावत आहेत का, विद्यार्थ्यांचे प्रयोग करतानाची छायाचित्रे अशा अनेक बाबी हे पथक तपासेल असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हंटले आहे. कॉपीला अटकाव करण्यासाठी भरारी पथके नेमले जातातच त्यात आणखी एका पथकाची भर पडली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपी ही जुनाट समस्या बनली आहे.

- Advertisement -

प्रात्यक्षिक परीक्षा संस्थांतर्गत घेतल्या जातात. त्या सुद्धा पारदर्शकपणे पार पडत नाहीत, प्रयोग न करताही विद्यार्थ्यांना गुण दिले जातात अशी शंका सरकारला आली असावी का? मुलांनी कॉपी करू नये, अभ्यास करून परीक्षा द्याव्यात या अपेक्षा गैर नाहीच. तथापि शिक्षणाशी संबंधित, विशेषतः दहावी आणि बारावी इयत्तांशी संबंधित कोणत्याही परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवावेत असे विद्यार्थ्यांना का वाटते? या परीक्षांमधील प्रश्न साचेबद्ध असतात असा आक्षेप शिक्षणतज्ज्ञ घेतात. तरीही कॉपी करण्याची भावना अनेकांच्या मनात का बळावते? विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी निदान एकदा तरी करून पाहिलेले असतात असे मानले जाते. तरीही पारदर्शकता का राखली जात नसावी असे सरकारला का वाटते? कसेही करून गुण मिळवण्याचा अट्टहास का आढळतो? दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असे मुलांना का वाटते? यावर विचार व्हायला हवा.

YouTube video player

भरारी पथके नेमणे म्हणजे समस्येच्या फांद्या कापणे होय. मुळावर घाव घालायचे असतील तर उपरोक्तसह अनेक मुद्यांवर विचार करणे गरजेचे ठरू शकेल. शिक्षण म्हणजे फक्त उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. त्यातून शिकणे किती होते, व्यक्तिमत्व समृद्ध बनते का, विद्यार्थी विचारशील बनतात का, सुजाण माणूस घडतो का, असे मुद्दे त्यामुळे पालक आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गौण ठरतात. उदरनिर्वाहाच्या व्यापक संधी उपलब्ध करून देतात अशा शाखांमध्ये प्रवेश मिळवणे हेच ध्येय बनते. पालकांचीही तीच इच्छा आढळते. त्यासाठी घेतल्या जाणार्‍या प्रवेश परीक्षा आणि प्रत्यक्ष प्रवेश यासाठी किमान गुणांची मर्यादा असते. तेवढे गुण मिळवण्याच्या ओझ्याखाली मुले येणे स्वाभाविक. त्यामुळे कसेही करून संबंधित सगळ्या परीक्षांमध्ये गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी सगळी यातायात करू पाहातात.

शिक्षण म्हणजे नोकरी हे समीकरण अयोग्य नाही. व्यावहारिक दृष्ट्या योग्यही मानले जाऊ शकेल. तथापि ते म्हणजेच शिक्षण आणि तो उद्देश साध्य करून शकत नाहीत ते सगळे विद्यार्थी अपयशी.. किंबहुना जगण्याला नालायक असाच शिक्का मारला जाताना आढळतो. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कमी गुण मिळवणारे किंवा अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची हेटाळणी केली जाते. अपेक्षांच्या या ओझ्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमतांचा असतो, त्यांच्यात वेगवेगळी कौशल्ये असू शकतात. त्यांचा शोध लागला तर ते विद्यार्थी यशस्वी ठरू शकतात याचा विसर सगळ्या व्यवस्थेसह मुलांच्या पालकांना देखील पडतो. अशा क्क्षमतांचा शोध घेणे हा शिकण्यात एक टप्पाच नाही का? शिक्षण फक्त पुस्तक किंवा घोकंपट्टी केंद्री झाल्याचे हे परिणाम मानले जाऊ शकतील. जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारची कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स) अत्यावश्यक असतात.

समतोल विचार, संवाद, संयम, सहनशीलता, व्यवस्थापन-मग ते नात्यांचे असो किंवा वेळेचे, आव्हानांचा सामना आणि त्यावर मात करणे ही त्यापैकी काही. शिक्षण अनुभवयुक्त-आनंदी झाले तर अशी अनेक कौशल्ये विद्यार्थ्यांचा नकळत विकसित होतात. जी त्यांचे जगणे समृद्ध करतात. त्यांना उत्तम माणूस घडवतात. सुजाण माणसेच समाजाची पर्यायाने राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावतात. शिकण्याचा रचनावाद तेच सांगतो. या सगळ्या प्रवासासाठी यात पालकांची जबाबदारी आणि मानसिकता मोठी आहेच, पण ती प्रामुख्याने सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखून त्याची सातत्यपूर्ण अमलबजावणी गरजेची आहे. पण सध्या शैक्षणिक धोरणात देखील धरसोडवृत्तीचा प्रादुर्भाव आढळतो. सरकार बदलले की धोरण बदलताना लोक अनुभवतात. पण अंतिमतः ते हिताचे नाही, याची खूणगाठ सरकारांना मारावीच लागेल.

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...