Friday, July 24, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २२ मे २०२६ - शिक्षण क्षेत्रातील बाजार बंद करा!

संपादकीय : २२ मे २०२६ – शिक्षण क्षेत्रातील बाजार बंद करा!

देशभरात वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणार्‍या नीट किंवा जेईईसारख्या स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि गैरव्यवहार आता नवीन राहिलेले नाहीत. अलीकडेच लातूरच्या आरसीसी या बहुचर्चित खासगी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने केलेली अटक हे सडलेल्या शिक्षण व्यवस्थेचे केवळ हिमनगाचे टोक आहे. नीटमधील प्रश्न कुठून मिळाले आणि ते पुढे कुणाकुणाला धाडले हा तपासाचा भाग असला तरी यानिमित्ताने वार्षिक लाखो कोटी रुपयांची उलाढाल असणार्‍या शिकवणी वर्ग नावाच्या समांतर शिक्षण व्यवस्थेचा भीषण चेहरा पुन्हा एकदा समोर आला.

- Advertisement -

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी लाखो रुपये मोजून या वर्गांचे उंबरठे झिजवणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक खरोखरच ज्ञानासाठी तिथे जातात की, केवळ संभाव्य प्रश्नपत्रिका किंवा शॉर्टकट मिळेल या आशेने? हा आता केवळ चिंतेचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा विषय बनला आहे. पूर्वी थोड्या कच्च्या असलेल्या विद्यार्थ्याला अतिरिक्त मार्गदर्शन करून त्याचा पाया पक्का करण्यासाठी शिकवणी वर्ग सुरू झाले. तो एक पूरक प्रयत्न होता. मात्र, गेल्या चार दशकांत या क्षेत्राचे संपूर्ण रूपच पालटून गेले आहे. चांगलं पॅकेज आणि भरघोस पैसे मिळवून देणारे करिअर पदरात पाडून घ्यायचे असेल, तर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम करणे हाच एकमेव खास मार्ग आहे, हा समज समाजात दृढ झाला. याच काळात खासगी शिक्षण संस्थांच्या वाढीचा मार्गही मोकळा झाला.

या संस्थांनी सुरू केलेल्या महागड्या, श्रीमंत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी लागणारी पात्रता मिळवण्यासाठी दहावीनंतर विज्ञान शाखेकडे वळणे विद्यार्थ्यांना गरजेचे वाटू लागले. या व्यावसायिक गरजेतूनच मग स्पर्धा सुरू झाली. गुणांच्या या शर्यतीचा फायदा घेत विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करायला सुरुवात झाली. सामान्य, निम्नहुशार आणि हुशार अशा तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली गेली आणि हुशार तुकडीसाठी अधिक व सामान्यांसाठी वेगळे असे शुल्काचे चढे दर ठरवले गेले. समजून घेण्यापेक्षा गुण कसे मिळवायचे याचे तंत्र शिकवणार्‍या या बाजारात शिक्षणाचा मूळ हेतूच हरवला. बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्राच्या सरासरी गुणांवर प्रवेश होईस्तोवर ही व्यवस्था एका मर्यादेत होती. परंतु नव्या शतकाच्या उंबरठ्यावर प्रवेशासाठी स्वतंत्र सामायिक परीक्षा म्हणजेच सीईटी आणि नीट आवश्यक बनली.

येथूनच या शिकवणी वर्गांच्या नफेखोरीला आणि दादागिरीला ऊत आला. आज लाखो रुपये खर्च करून पालक पाल्यांना कोटा, लातूर किंवा इतर शहरांमधील नामवंत क्लासेसमध्ये पाठवतात. पण तिथे खरोखरच गुणवत्तेचे धडे दिले जातात का? बहुतांश वेळा हे क्लासेस केवळ एका ठराविक पॅटर्नचा सराव करून घेतात. त्याहून भयंकर बाब म्हणजे, अलीकडच्या काळातील पेपरफुटीच्या प्रकरणांवरून असे दिसते की, काही नामांकित क्लासचालकांचे संबंध थेट परीक्षा घेणार्‍या यंत्रणांमधील भ्रष्ट घटकांशी असतात. संभाव्य प्रश्नपत्रिका किंवा थेट लीक झालेला पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. विद्यार्थी आणि पालकही गुणवत्तेवर विश्वास ठेवण्याऐवजी, या क्लासमध्ये गेल्यावर सेटिंग होऊन पेपर मिळेल किंवा मार्ग सोपा होईल, या आशेने तिथे प्रवेश घेतात का, अशी शंका घेण्यास वाव आहे. या समस्येला केवळ क्लासचालकांना जबाबदार धरून चालणार नाही.

आपली मुख्य प्रवाहातील महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था इतकी खिळखिळी व कालबाह्य झाली आहे की, तिथे स्पर्धा परीक्षांची तयारी होऊच शकत नाही, हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे. जोपर्यंत महाविद्यालये दर्जेदार शिक्षण देत नाहीत, तोपर्यंत खासगी क्लासेसचे दुकान बंद होणार नाही. सरकारने तपास संस्थांमार्फत चौकशी करून थांबता कामा नये. या लाखो कोटींच्या समांतर शिक्षण व्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी कडक नियमावलीची गरज आहे. तसेच परीक्षा पद्धती अत्यंत पारदर्शक आणि तंत्रस्नेही करणे गरजेचे आहे, जेणेकरून मोटेगावकरसारख्या कोणाचीही पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही. शेवटी पालकांनीही आपल्या मुलांना गुणांच्या आणि पॅकेजच्या अंधाधुंद शर्यतीत ढकलणे थांबवले पाहिजे.

शॉर्टकटने मिळालेले यश हे तात्कालिक असते, पण त्यामुळे मुलांची शिकण्याची खरी क्षमता नष्ट होते. जोपर्यंत समाजात गुणवत्तेपेक्षा जुगाड आणि सेटिंगला महत्त्व दिले जाईल, तोपर्यंत शिक्षणाचा हा बाजार असाच फोफावत राहील. आता वेळ आली आहे की, ही समांतर शिक्षण व्यवस्था मोडून काढून मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे; तरच देशातील तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित राहील.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...