Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २३ सप्टेंबर २०२४ - उत्सव पर्यावरणपूरक वळण घेतोय

संपादकीय : २३ सप्टेंबर २०२४ – उत्सव पर्यावरणपूरक वळण घेतोय

यंदाच्या अनंत चतुर्दशीला समाजाने पर्यावरण रक्षणासाठी ‘साथी हात बढाना’चा अनुभव घेतला. पर्यावरण रक्षणासाठी सामान्य माणसे देखील जागरूक झाल्याचे सुखद दर्शन हा उत्सव गेली काही वर्षे घडवत आहे. सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवर असे प्रयत्न सुरु झाले आहेत.

कोणत्याही चांगल्या बदलाची प्रक्रिया अत्यंत संथ असते. तथापि सामाजिक संस्थांच्या अथक प्रयत्नांना हळूहळू फळे येत आहेत. लोकही या परिवर्तनाच्या यात्रेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे लोक समजून उमजून पुढाकार घेत आहेत हे कौतुकास्पद आहे. अनेकांनी धातूच्या मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. अंकुर गणेश मूर्तीना लोकांनी प्रतिसाद दिला. लाल मातीची मूर्ती घडवतांना त्यात झाडाचे, वेलीचे किंवा एखाद्या पालेभाजीचे बी ठेवले जाते. हाच अंकुर गणेश. अशा मूर्तींचे घरच्या कुंडीत विसर्जन करतात. बी रुजते आणि झाड वाढते.

- Advertisement -

शाडू मातीच्या मूर्ती बसवणार्‍यांची संख्या वाढत आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून या मोहिमेने अजून एक नवे वळण घेतले. शाडू मातीच्या मूर्ती घरीच विसर्जित करून ती माती पूनर्वापरासाठी एका विशिष्ट ठिकाणी संकलित करणे सुरु झाले आहे. त्यासाठी अनेक संस्था स्वयंस्फूर्त पुढाकार घेत आहेत. त्यालाही लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. गणपती मूर्ती दान करा, पूजेचे निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाका किंवा त्यासाठीच्या गाडीत टाका अशी मोहीम राबवण्याची परंपराच रुजली आहे. प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर त्यात सहभागी होणार्‍या सामाजिक संस्थांची संख्या वाढत आहे.

यंदाही हजारो लोकांनी त्यांच्या मूर्ती दान केल्या. निर्माल्य नदीपात्रात टाकण्याचा मोह टाळला. नदीचे पाणी वाहत नाही. त्यामुळे विसर्जित केलेल्या मूर्ती वाहून जात नाहीत. त्या खाली बसतात. शाडू मातीचा थर जमा होतो. नदीचे प्रदूषण होते. जलाशये प्रदूषणमुक्त ठेवणे ही लोकांची देखील जबाबदारी आहे. याची जाणीव वाढत आहे. हवामान बदलाचे फटके सर्वांनाच बसतात. कोणताही ऋतू त्याचे वेळापत्रक पाळत नाही हे आता लोकांच्याही लक्षात आले आहे. केवळ गणेशोत्सवच नव्हे तर कोणताही उत्सव पर्यावरणपूरक साजरा करणे आणि निसर्ग संवर्धन करणे ही काळाची गरज बनत आहे. त्यादृष्टीने ज्याने त्याने योजलेले उपाय स्वागतार्ह आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या