Wednesday, February 25, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २५ फेब्रुवारी २०२६ - पण ऐकणार कोण?

संपादकीय : २५ फेब्रुवारी २०२६ – पण ऐकणार कोण?

उद्धव ठाकरे यांनी नेते आणि राजकारण्यांना एक सल्ला दिला. सल्ला म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनाशी दडलेली खोल भावना त्यांनी व्यक्त केली असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरू शकेल. विधान परिषदेत अजित पवार यांच्यावरील शोक प्रस्तावावर बोलताना त्यांनी राजकारणात जीव नकोसा होईल, एवढे आरोप आणि त्याला सहन होणार नाही इतकी बदमानी कोणाचीही करू नये, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेला सल्ला मोलाचा आहे. तो अमलात आणला गेला तर राजकारणाची सभ्यता राखायला मदतच होऊ शकेल.

आरोप-प्रत्यारोप आणि बेताल बडबड एवढ्यापुरतीच सध्याच्या राजकारणाची व्याप्ती उरली असावी. गरळ ओकण्यासाठी राजकारणातील वाचाळवीरांना कोणतेही निमित्त पुरते. महाराष्ट्राच्या राजकारणाला सभ्यता, सौहार्दता आणि मर्यादेचा वारसा होता. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा वस्तुपाठ कृतीतून घालून दिला. विरोधी नेते अथवा मुद्दे यावर त्याच मर्यादेत टीका केली. अनेकदा टीकेचा सामना करायची वेळ त्यांच्यावरही आली. पण पलटवारही मर्यादेतच झालेले आढळतात. पण तोच वारसा विकून खायचा निर्धार आजच्या तमाम नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला असावा.

- Advertisement -

घरातील लहान मुलांवर नम्रता, मर्यादा, शब्द जपून वापरणे, कोणत्याही परिस्थितीत तोल न जाऊ देणे, एकमेकांचा उद्धार न करण्याचे संस्कार जाणीवपूर्वक केले जातात. त्यांचे वर्तन त्याला पूरक असेल यावर कटाक्ष ठेवला जातो. हेच संस्कार राजकारण्यांनी पुरते अर्थहीन ठरवायचा जणू विडाच उचलला आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. पक्षागणिक वाचाळवीरांचा चेहरा बदलतो इतकाच काय तो फरक. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा नुसता धांडोळा जरी घेतला तरी सामान्य माणसांची मान खाली जाईल आणि अशा विधानांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाईल हे नक्की.

YouTube video player

शेतकर्‍यांना भिकारी संबोधणे, एकमेकांच्या वाडवडिलांचा-पिताश्रींचा उद्धार करणे, अफजलखानाची तुलना, खड्ड्यांची तुलना अभिनेत्रींच्या गालाशी करणे, शेतातील भाजीपाला शाळेत विकायला आणायचा सल्ला विद्यार्थ्यांना देणे..ही त्यापैकी काही मुक्ताफळे. मग त्यांचे कार्यकर्ते देखील जाहीर सभेत विरोधकांचे हात पाय तोडण्याची भाषा करताना आढळतात. या बोलभांडांनी वायफळ, दणका, वार, पलटवार, हल्ला, प्रतीहल्ला असे अनेक शब्द अर्थहीन आणि गुळगुळीत करून टाकले आहेत. याचा एक गंभीर दुष्परिणाम कदाचित कोणाच्याही लक्षात आला नसावा. यामुळे मर्यादाहीनता सामान्य बाब बनते. ‘चलता है’ वृत्ती रुजते. असे बोलणे म्हणजे राजकारण करणे आणि वाचाळता हा पक्षप्रवेशाचा निकष आहे असे कार्यकर्त्यांना वाटू लागले तर ते नवल ठरत नाही. त्याचे प्रत्यंतर खालच्या पातळीवर उमटते.

कार्यकर्ते एकमेकांचा यथेच्छ उद्धार करून एकमेकांची डोकी फोडतात. एकमेकांच्या उरावर बसतात. याला आवर घालायचा कोणी हा खरा प्रश्न आहे. कारण सगळे अधूनमधून त्याच पालखीचे भोई बनतात. कार्यकर्त्यांचे कान उपटायचा अधिकार गमावतात. अजित पवार मात्र याला अपवाद ठरतात. ते उमदे नेते होते. एकदा त्यांच्या उपस्थितीत एका पक्ष पदाधिकारिने विरोधी नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत टीका सुरु केली. तेव्हा अजितदादांनी जाहीरपणे तिच्या मुसया आवळल्या होत्या. हे चूकच आहे असे ठणकावून सांगितले होते. वाणीच्या मर्यादा उल्लंघनाचे दुष्परिणाम त्यांनाही जाणवले होते. तेव्हापासून त्यांनी कटाक्षाने काही गोष्टी टाळल्या. तसे अनेकदा बोलूनही दाखवले होते.

जपून बोलण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना ते वारंवार देत. त्यांच्या वाटेवर पाऊल ठेवण्याची तयारी किती नेते आणि कार्यकर्ते दाखवतील? तथापि तसे करणे म्हणजे मुद्यांचे आणि विकासाचे राजकारण करणे. लोकांच्या प्रश्नांवर बोलणे. विकासाचे दीर्घकालीन धोरण ठरवणे. एकूणच सुरक्षित सामाजिक वातावरण निर्माण करणे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे. नियमांचे कठोर पालन करणे आणि करायला लावणे. रोजगार निर्माण करणे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कर्तव्य आणि जबाबदार्‍यांची नोंद सुद्धा लांबत जाणारी ठरू शकेल. किती राजकीय पक्ष राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी दाखवतील? तेव्हा प्रसंगी तसा सल्ला सगळेच देतात. अंमलात आणणारे मात्र अभावानेच आढळतात.

ताज्या बातम्या

लाच

३० हजारांची लाच घेताना मोठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला, पण झाडाझडतीत...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiओडिशाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कटक मंडळाचे खाण उपसंचालक देबब्रत मोहंती याला...