Tuesday, July 28, 2026
Homeदेश विदेशBSNL च्या संचालकांचा 'नवाबी' थाट! अंतर्वस्त्र, टॉवेल सांभाळायला 50 अधिकाऱ्यांची फौज

BSNL च्या संचालकांचा ‘नवाबी’ थाट! अंतर्वस्त्र, टॉवेल सांभाळायला 50 अधिकाऱ्यांची फौज

दिल्ली । Delhi

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) संचालक विवेक बंजल यांचा नियोजित प्रयागराज दौरा सध्या देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. या दौऱ्यासाठी स्थानिक प्रशासनाने तयार केलेला ‘विस्तृत’ प्रोटोकॉल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता कंपनीने बंजल यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बंजल १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रयागराजच्या दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्याच्या नियोजनासाठी तब्बल ५० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली कामे ही अत्यंत खासगी स्वरूपाची होती. यामध्ये संचालकांसाठी टॉवेल, कंगवा, हेअर ऑईल आणि अगदी अंतर्वस्त्रांची खरेदी करण्यासारख्या कामांसाठीही स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

या प्रोटोकॉलनुसार, संचालकांच्या संगम स्नानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ६ पुरुष आणि २ महिला कर्मचाऱ्यांना केवळ ‘स्नान किट’ तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय, प्रवासासाठी पांढरे टॉवेल असलेल्या आलिशान गाड्या आणि उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थांची चोख व्यवस्था करण्याचे आदेशही स्थानिक कार्यालयाने काढले होते. जेव्हा बीएसएनएल कंपनी हजारो कोटींच्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे, तेव्हा एका संचालकाच्या वैयक्तिक आरामासाठी सरकारी तिजोरीचा आणि मनुष्यबळाचा असा उधळपट्टीवजा वापर पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडिओ आणि आदेशाची प्रत व्हायरल होताच कंपनीच्या प्रतिमेला मोठा तडा गेला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर विवेक बंजल यांचा दौरा तातडीने रद्द करण्यात आला असून प्रशासनाने तो प्रोटोकॉल अवैध घोषित केला आहे. बीएसएनएल मुख्यालयाने या सर्व प्रकाराला ‘शिस्तभंग’ मानले आहे. आता बंजल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये या सर्व व्हीआयपी (VIP) संस्कृतीवर खुलासा मागण्यात आला आहे. जर त्यांचे उत्तर असमाधानकारक आढळले, तर त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. एका बाजूला सामान्य कर्मचारी काटकसरीचे धोरण अवलंबत असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अशा ‘शाही’ वागणुकीमुळे कर्मचारी संघटनांमध्येही नाराजी पसरली आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : १६० कोटींची ‘मास्तर’की! शालार्थ आयडी घोटाळ्यातील २९...

0
नाशिक | Nashik राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला अटकपूर्व...