Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २६ जून २०२५ - सुख म्हणजे नक्की काय असते?

संपादकीय : २६ जून २०२५ – सुख म्हणजे नक्की काय असते?

काल-परवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांच्या सुखाविषयी चिंता व्यक्त केली. देशातील जनतेला कोणीही वाली नाही. त्यांच्या सुखाचा आलेख वाढवायला हवा. सेवा परमो धर्म आहे. शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवली पाहिजे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. भावना एकदम प्रामाणिक आहे. पण ते सुख मिळेल असे वातावरण निर्माण करायचे कोणी? लोकशाहीने ती जबाबदारी लोकप्रतिनिधींवर टाकली आहे. पण त्यांचा आणि लोकांचा संबंध फक्त मतदानाच्या दिवसापुरताच आढळतो.

गडकरींसारखे एक-दोन अपवाद त्याला असू शकतील कदाचित. गडकरी निदान दर्जेदार रस्त्यांचे सुख जनतेला मिळावे याच प्रयत्नात असतात. अन्यथा लोकांच्या पदरात वर्षानुवर्षे फक्त आश्वासनांचाच कोरडा पाऊस पडत आला आहे. निवडणूक जवळ आली की सामान्य माणसांच्या उंबर्‍यांची माती कमी होते. तेही वेड्यात निघतात. काही दिवस स्वतःला राजा मानू लागतात. मतदान पार पडते. निकालाचा दिवस लोकांचाही निक्काल लावतो. मग सामान्य माणसांचा एकदम कवितेतील गणपत वाणी होतो.

- Advertisement -

फरक फक्त इतकाच असतो, कवितेतील गणपत वाडी बांधायचे स्वप्न बघतो आणि लोक त्यांचे प्रतिनिधी काम करतील अशी अपेक्षा ठेवतात. ही करामत तेच करतात ज्यांच्यावर लोक त्यांच्या सुखाची जबाबदारी काही प्रमाणात सोपवतात. ज्यांना लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हटले जाते. पण ते निवडून आल्यावर होते उलटेच. जनता अजून अजून गर्तेत जाते. खरे तर लोकांची सुखाची भावना अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीत दडलेली असते.

YouTube video player

पाणी दारातील नळाला, पुरेसे आणि वेळेवर यावे. रस्त्यांना कमीत कमी खड्डे असावेत. दोन वेळचे घास पोटात जातील इतपतच पैसे देणारे काम हाताशी असावे. मुलांना सरकारी शाळेत किमान चांगले शिक्षण मिळावे. सरकारी दवाखान्यांमध्ये नीट उपचार मिळावेत. लोकांच्या सुखाच्या कल्पना इथपर्यंतच सीमित ठेऊन लोकशाहीने खरे तर तिच्या प्रतिनिधींवर उपकारच केले असे म्हणायला हवे.

पण वर्षानुवर्षे त्या सुखाऐवजी लोकांच्या नशिबाला तुंबड्याच लावल्या जातात. तुंबड्या लावणार्‍यांच्या सुखाचे इमले मात्र वाढतच जाताना दिसतात. काही दिवसांपूर्वीपर्यंत दुचाकीवर फिरणारी माणसे निवडून आल्यावर अचानक महागड्या चारचाकीत कशी फिरायला लागतात? त्यांचे बंगले कसे उभे राहतात? त्यांचे राहणीमान अचानक श्रीमंतीत कसे बदलते? जनतेला भेटणे दुरापास्त हा व्हायला लागते? याबाबतीत सगळे एकाच माळेचे मणी कसे बनतात? यामागचे कोडे लोकांना उमगत नाही.

निवडून आल्यावर अशी कोणती जादूची कांडी सापडते याचा शोध लोकांना लागता लागत नाही. काळ कोणताही असला तरी लोकांच्या पदरी फक्त शाब्दिक सुख पडेल आणि खरे सुख म्हणजे नक्की काय असते असे विचारण्याची वेळ कायमच येत राहील हेच गडकरी यांनाही सुचवायचे असावे.

ताज्या बातम्या

भरदिवसा भरवस्तीत चोरट्यांनी ‘धूमस्टाईल’ने साडेपाच तोळ्यांचे गंठण लांबवले

0
संगमनेर । प्रतिनिधी संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेशनगर परिसरात भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन ते...