Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २७ सप्टेंबर २०२४ - जबाबदारी सरकारचीच

संपादकीय : २७ सप्टेंबर २०२४ – जबाबदारी सरकारचीच

रस्ते अपघात आणि त्यात जाणारे बळी याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. एकूण मृत्यूंमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण त्यात यश येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

नियम आणि कायदेपालन समाजात रुजवण्यासाठी व रस्ते अपघात कमी करण्यासाठी शाळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढच्या पिढीची मानसिकता बदलण्यावर काम व्हायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. त्यामागे त्यांचे अनेक वर्षांचे कामकाज आहे. गडकरी यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. अत्यंत परखड व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना लोक ओळखतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सल्ल्यातील तथ्य समाज लक्षात घेऊ शकेल का? नियमपालन, सामाजिक भान, सामाजिक शिस्त, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये पुढच्या पिढीत रुजवण्यावर अनेक सामाजिक संस्था लक्ष केंद्रित करतात. कारण हे संस्कार मुलांची जीवनभर सोबत करतात. त्यांना चांगला माणूस म्हणून घडण्यात मोलाचा सहभाग नोंदवतात. असे शहाणपण रुजलेली मुले आदर्श नागरिक बनू शकतात.

- Advertisement -

गडकरी यांनाही कदाचित तेच सुचवायचे असावे. तथापि मुलांना शाळेचा सहवास काही तासांचा असतो. एरवी मुले पालकांच्या सहवासात असतात. अडनिड्या वयाची मुले त्यांच्या पालकांकडे बघून अनेक गोष्टी आपोपाप शिकतात. उपरोक्त मूल्यांबाबत त्यांच्या अनुभवास काय येत असावे? बहुसंख्य लोक नियमांना हरताळ फासताना आढळतात. पण या बेशिस्तीचा फटका त्यांना जेव्हा बसतो तेव्हा हेच लोक बेशिस्तीच्या नावाने शंख करतात. त्यांचा दुटप्पीपणाही मुले बघतात. बेशिस्तीचा दंड टाळण्यासाठी अनेक जण यंत्रणेला ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करत नाहीत का?

मोठ्यांच्या वर्तनावरून नियम मोडण्यासाठीच असतात असा मुलांचा ग्रह होऊ शकेल का? तसे केले तरी कारवाई होत नाही किंवा ती टाळली जाऊ शकते असेही मुलांना वाटत असावे का? रस्ते अपघात जितके घातक त्यापेक्षाही मुलांची अशी मानसिकता तयार होणे जास्त घातक ठरू शकेल का? नियमभंग हे रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण आहे. तेव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई गरजेची आहे. तो धडा मुलांना शिकवणे आणि तशी कृती त्यांच्या अनुभवास येणेही आवश्यक आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या