बदलत्या कालखंडात लोकसहभाग हा विकासाचा नवा मूलमंत्र मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मध्ये याचा वारंवार उल्लेख केलेला ऐकायला मिळतो. याच मूलमंत्राने मांडवे गावातील विद्यार्थ्यांची शाळेची वाट काहीशी सुकर केली आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुयात मांडवे गावातील वृद्धा नदीवरील पूल उद्ध्वस्त झाला होता. पावसाळ्यातील पुरामुळे सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गाव परिसरातील मुलांची शाळा बंद झाली होती. बहुसंख्य गावकर्यांचाही संपर्क तुटला होता. ती समस्या सोडवण्यासाठी गावकरी एकत्र आले. त्यांनी लोकवर्गणी काढली. त्यातून रस्ता दुरूस्त केला. परिणामी सर्वांचीच सक्तीची गावकैद संपली.
मुलांची शाळा पुन्हा सुरू झाली. गावकर्यांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. रस्ता नादुरूस्त किंवा पूल उद्ध्वस्त या किती गावांच्या समस्या असतात? नदी किंवा ओढ्यावर पूल नसल्यामुळे जीव धोयात घालून शाळेत जाणार्या मुलांची छायाचित्रे अधूनमधून माध्यमांत प्रसिद्ध होतात. हा देश खेडीपाडी आणि वाड्या-वस्त्यांनी बनला आहे. तेथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावतात. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, जलसंवर्धन, नदी किंवा नाले प्रदूषण, वृक्षारोपण, उद्ध्वस्त उद्याने अशी अनेक कामे प्रलंबित असतात. ती कामे सरकारने करावीत, अशी लोकांची अपेक्षा असते. ती गैर नाहीच. अनेक कामांचे स्वरूप सरकारने करावे असेच असते हेही खरे. जनकल्याण हाच कोणत्याही सरकारचा पाया असतो. त्यामुळे लोकांचे जगणे सुखद आणि सुकर करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिक सरकारकडे मागणी करतात. प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात. रस्त्यावर उतरतात.
मांडवी गावातील नागरिकांनीदेखील सरकारकडे रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली होती. वाटही पाहिली होती, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. मागणी रेटता रेटता नागरिक एकत्र आले आणि त्यांनी रस्ता तात्पुरता का होईना दुरूस्त केला. पुढचे काम शासनाचे आहे. रस्ता कायमचा दुरूस्त केला जाईल आणि पूल उभारला जाईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा असू शकेल. सरकार कार्यक्षम असावेच. पण अनेक कामांसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते. ‘जो दुसर्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ असा उपदेश समर्थ रामदास स्वामींनी केला आहे. त्याचा तंतोतंत अनुभव असे लोक घेतात. सतत सरकारवर दुगाण्या झाडतात. तेही एकवेळ समजण्यासारखे आहे. पण तेवढ्यावरच न थांबता लोकही एकत्र येऊ शकतात. ते काम लोकांचेदेखील आहे या जाणिवेचा अभाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
वास्तविक गावांमध्ये, परिसरांमध्ये पिढ्यान्पिढ्या राहणार्या लोकांना सामाजिक समस्या, ती निर्माण झाल्याची कारणे, त्यावरचे उपाय याची वरवरची का होईना पण माहिती असते. महिलांचा त्यातील सहभाग समस्येची नेमकी तीव्रता आणि प्राधान्यक्रम निश्चित करू शकेल. कारण अनेक समस्यांचे परिणाम विशेषतः महिलांना जास्त प्रमाणात सोसावे लागतात. तथापि, महिलांचा सहभाग फार दूरची गोष्ट ठरावी, मुळात समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी किती जण दाखवतात? त्याउलट लोकसहभाग विकासाचा शाश्वत मार्ग आहे, याची जाणीव रुजलेली गावे आदर्श बनतात. तंटामुक्त होतात. स्वावलंबी बनतात. लोकसहभाग चमत्कार घडवू शकतो आणि सामाजिक बदलांची पायवाट प्रशस्त करू शकतो. बारीपाडा हे त्याचे चपखल उदाहरण ठरू शकेल.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त चैत्राम पवार यांचे ते गाव. त्यांचा पुढाकार आणि लोकांचा सहभाग यामुळे बारीपाडा आमूलाग्र बदलले आहे. जल, जंगल, जमीन, जन (माणूस) आणि जनावर या पाच गोष्टींवर त्यांनी काम केले. आज एकीचे बळ सगळे गाव चाखते आहे. अर्थात, झालेला बदल टिकवणे हेही मोठेच आव्हान असते. पण सामूहिक शक्ती तेही पेलण्याचे सामर्थ्य आणि युवाशक्तीला प्रेरणा देऊ शकते. ‘सुसज्ज असावेत गांवचे तरुण | कोणतेंहि संकट येतां ऐकून | आपुलीं सर्व कामें सोडून | धांव घ्यावी तयांनी..’ असे तिचे वर्णन केले आहे. याचे भान समाजात रुजू शकले तर सामाजिक बदल सहज शय वाटू शकेल.




