मुंबई । Mumbai
अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी दमानिया यांनी काही राजकीय नेत्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) सार्वजनिक केल्यानंतर, हे गोपनीय रेकॉर्ड त्यांच्याकडे आले कुठून, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला होता. यावरून रविवारी (०५ एप्रिल) दोन्ही नेत्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकींवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
या वादाची ठिणगी शनिवारी पडली, जेव्हा सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दमानिया यांनी सादर केलेल्या सीडीआरमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसल्याने यात काहीतरी ‘गडबड’ असल्याचा संशय अंधारे यांनी व्यक्त केला होता. याला प्रत्युत्तर देताना अंजली दमानिया यांनी पोस्ट केली की, त्यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची वेळ मागितली आहे. अंधारे यांनी मुद्द्यावर बोलण्याऐवजी वैयक्तिक द्वेषातून आपल्यावर टीका करू नये, असा सल्ला दमानिया यांनी दिला. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ कॉल का केले, रुपाली चाकणकर यांनी १७७ कॉल का केले आणि सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांसारख्या नेत्यांचे काय संबंध होते, याची चौकशी होण्याची गरज दमानिया यांनी व्यक्त केली.
अंजली दमानिया यांनी पुढे असेही नमूद केले की, त्या प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाहीत कारण त्यांना कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. मात्र, जेव्हा त्या एखादा मुद्दा हाती घेतात, तेव्हा तो पूर्ण ताकदीने लढतात, केवळ बोलत राहत नाहीत, असा टोला त्यांनी अंधारे यांना लगावला. दमानियांच्या या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी अत्यंत बोचरी टीका करत पुन्हा एकदा पलटवार केला. अंधारे यांनी दमानिया यांना ‘एका स्वयंघोषित समाजसुधारकाची सुधारित आवृत्ती’ संबोधत, त्यांच्याकडून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचा आरोप केला.
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, रुपाली चाकणकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे आणि या प्रकरणातील कोणत्याही दोषीची गय केली जाऊ नये, हीच त्यांची भूमिका आहे. मात्र, दमानिया यांना हे सीडीआर रेकॉर्ड कोणी दिले, हा मुख्य प्रश्न कायम आहे. “असे कोणते ॲप आहे ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग-आउटगोइंग कॉलचे कालावधी मिळतात? ज्या व्यक्तीने तुम्हाला ही माहिती दिली, त्या व्यक्तीवर तुमचा इतका विश्वास का?” असे थेट प्रश्न अंधारे यांनी विचारले आहेत.
याशिवाय, भाजपच्या नेत्यांचे नाव घेताना दमानिया आपल्या मित्र-नातेसंबंधांत किंवा सुख-दुःखाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे कारण का देतात, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. एरवी दुबई, अमेरिका किंवा आसाममधून अचानक ‘प्रकट’ होणाऱ्या दमानिया भाजपच्या संदर्भात शांत का असतात, अशी विचारणा करत अंधारे यांनी या प्रकरणाला अधिक धार दिली आहे. या दोन आक्रमक महिला नेत्यांमधील हा कलगीतुरा आता कोणत्या थराला जातो आणि पोलीस या सीडीआर प्रकरणाची दखल घेतात का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




