Saturday, November 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ नोव्हेंबर २०२६ - साखर कारखानदारीचा डोलारा कोसळतोय!

संपादकीय : २८ नोव्हेंबर २०२६ – साखर कारखानदारीचा डोलारा कोसळतोय!

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा, शेतकर्‍यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे साधन आणि सहकार चळवळीचा अभिमान असलेली साखर कारखानदारी आज गंभीर संकटातून जात आहे. ज्या कारखान्यांनी गावोगावी समृद्धी आणली, शिक्षण संस्था उभ्या केल्या, रोजगार निर्माण केला आणि ग्रामीण अर्थकारणाला गती दिली, तेच कारखाने आज आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडले आहेत. दोन दशकांपूर्वी राज्यात दोनशेहून अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. आज प्रत्यक्ष गाळप करणार्‍या कारखान्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे; अनेक कारखाने बंद, आजारी किंवा आर्थिक पुनर्रचनेच्या प्रतीक्षेत आहेत. ही केवळ एका उद्योगाची घसरण नाही, तर महाराष्ट्राच्या सहकार संस्कृतीसमोरील गंभीर आव्हान आहे.

- Advertisement -

मग या अधोगतीला जबाबदार कोण -कारखानदार, शेतकरी की शासन? या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही एका घटकावर दोष ठेवून मिळणार नाही. कारखानदारांचे चुकीचे निर्णय, राजकीय हस्तक्षेप, शेतकर्‍यांच्या रास्त अपेक्षा, शासनाची धोरणे, वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ अशा अनेक घटकांचा या संकटात वाटा आहे. त्यामुळे दोषारोपांपेक्षा वस्तुस्थितीचे प्रामाणिक विश्लेषण आवश्यक आहे. सर्वप्रथम कारखानदारांच्या जबाबदारीचा विचार केला पाहिजे. अनेक सहकारी कारखान्यांमध्ये सहकारापेक्षा सत्ताकारणाला अधिक महत्त्व मिळाले. सभासदांच्या मालकीचा उद्योग काही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठेचे आणि प्रभावाचे केंद्र बनला. संचालक मंडळातील गटबाजी, अनावश्यक नोकरभरती, अवाजवी खर्च, कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक शिस्तीचा अभाव यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती खालावली.

उत्पादन खर्च, साखर उतारा, गाळप क्षमता आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न यांचा शास्त्रीय विचार न करता घेतलेल्या निर्णयांची किंमत आज मोजावी लागत आहे. शेतकर्‍यांनाही या प्रश्नापासून पूर्णपणे अलिप्त राहता येणार नाही. उसाला योग्य दर मिळावा आणि पैसे वेळेवर मिळावेत, ही त्यांची मागणी रास्त आहे. ऊस उत्पादनासाठी भांडवल, पाणी, वीज, खते, मजुरी आणि वेळ खर्च होतो. तरीही पाण्याची उपलब्धता, जमिनीची क्षमता आणि स्थानिक परिस्थिती यांचा विचार न करता ऊस लागवड वाढवणे दीर्घकाळ हिताचे ठरणार नाही. पाणीटंचाईच्या भागात उसाचे वाढते क्षेत्र, तोडणी-वाहतुकीचे नियोजन आणि पीक विविधतेकडे होणारे दुर्लक्ष यांचाही विचार व्हायला हवा. शेतकर्‍यांनीही पाणी आणि बाजारपेठेचा विचार करून पीक नियोजन करणे आवश्यक आहे.

मात्र, कारखान्यांच्या गैरव्यवस्थापनाचा भार शेतकर्‍यांवर टाकणे अन्यायकारक ठरेल. यंत्रणा यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. शासन आणि धोरणकर्त्यांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ होत असताना साखरेच्या विक्री दरात पुरेशी वाढ न झाल्यास कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडते. कर्जावरील व्याज, उत्पादन खर्च, निर्यातविषयक निर्बंध आणि इथेनॉल धोरणातील बदल यांचा उद्योगावर परिणाम होतो. त्यामुळे शासनाने धोरणांमध्ये स्थैर्य ठेवून साखर उद्योगाला व्यवहार्य नियोजनाची संधी द्यावी. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता, उत्पादन क्षमता, कर्जाचा बोजा आणि पुनरुज्जीवनाची शयता यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा.

इथेनॉल, सहवीज निर्मिती, बायोगॅस आणि अन्य उपपदार्थांमधून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्नही बाजारपेठेचा अभ्यास करून करावेत. आज गरज आहे ती दोषारोपांच्या राजकारणापेक्षा आत्मपरीक्षणाची. कारखानदारांनी पारदर्शक, उत्तरदायी आणि व्यावसायिक कारभार करावा. संचालक मंडळांनी वैयक्तिक हितापेक्षा संस्थेच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य द्यावे. शेतकर्‍यांनी शाश्वत शेती आणि पीक विविधतेचा विचार करावा. शासनाने स्थिर धोरणे, वेळेवर निर्णय आणि प्रभावी देखरेख यांची हमी द्यावी. नियमित लेखापरीक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जाबचत, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सभासदांचा सक्रिय सहभाग या बाबी पर्याय नसून गरज आहेत. साखर कारखानदारीच्या अधोगतीला केवळ कारखानदार किंवा शेतकरी जबाबदार नाहीत; व्यवस्थेतील सर्व घटकांच्या चुका त्यामागे आहेत.

मात्र, नेतृत्व आणि निर्णयप्रक्रिया ज्यांच्या हातात आहे, त्यांची जबाबदारी अधिक आहे. शेतकर्‍यांचा ऊस, कारखानदारांचे सक्षम व्यवस्थापन आणि शासनाचे दूरदृष्टीचे धोरण यांचा समन्वय साधल्याशिवाय सहकाराचा डोलारा पुन्हा उभा राहणार नाही. कारखाने वाचले तर ग्रामीण रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांचे हितही टिकेल. म्हणून आज प्रश्न दोष कोणाचा, एवढाच नाही; तर जबाबदारी स्वीकारून साखर कारखानदारीला नवसंजीवनी देण्यासाठी पुढाकार कोण घेणार हा आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ : दुगांव ग्रामपंचायतीला १ कोटी रुपयांचा...

0
नाशिक, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. नाशिक विभागस्तरीय...