Wednesday, April 29, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २८ ऑक्टोबर २०२५ - व्यापक मनोमिलन केव्हा?

संपादकीय : २८ ऑक्टोबर २०२५ – व्यापक मनोमिलन केव्हा?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने युती-आघाड्या अधूनमधून चर्चेत येतात. ‘याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याविना’ अशा आशयाच्या घोषणा राणा भीमदेवी थाटात सर्वच पक्ष करतात. तथापि, भाजपसारखा एखाददुसरा बलाढ्य पक्ष सोडला तर सत्ताप्राप्तीसाठी युती-आघाडीचे राजकारण इतर पक्षांंसाठी अपरिहार्य ठरत असावे. याची सुरुवात उद्धवसेना आणि मनसेना या दोन पक्षांनी केली आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्याचे त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यभरातील कार्यकर्तेही याच घोषणेच्या प्रतीक्षेत असावेत. जे सातार्‍यात घडले ते राज्यात इतरत्रही घडू शकेल अशा आशा त्यांच्या मनात पल्लवित झाल्या असाव्यात. तसेही या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळसणात याची चुणूक दिसली. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून साकारलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे लोकार्पण, दिवाळीनिमित्त काही शहरांमध्ये भेटवस्तूंचे वाटप, लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या सामान्यांच्या भेटीगाठी यातून त्याची चुणूक लोकांनी अनुभवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षवेधी मानली जाते. या निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसेना एकत्र येतील असे बोलले जाते. त्याची सुरुवात सातारा नगरपालिकेपासून झाली असे मानले जाऊ शकेल. दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी ती घोषणा केल्याने निदान यापुढे तरी दोन्ही पक्षांचे नेते ‘ताकाला जाऊन भांडे लपवणार नाहीत’ अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा, एकत्र येण्याच्या शयतेवर मनसेनेने म्हणजेच राज ठाकरे यांनी नेहमीच स्पष्टपणे भूमिका घेणे टाळले आहे.

कधी मराठीच्या-हिंदी सक्तीच्या मुद्यावर, कधी फक्त टाळी देण्यासाठी तर कधी भाऊ म्हणून एकत्र आल्याचे ते सांगत. निदान यापुढे तरी त्याला पूर्णविराम लावला जाईल का? या घोषणेमुळे राज्यातील अनेक राजकीय गृहीतके बदलण्याची शयता बळावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेत्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात. भाजप वगळता अन्य पक्ष या निवडणुकीकडे त्यांचे अस्तित्व बळकट करण्याच्या संधी म्हणून पहातात. कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी राबतात. स्थानिक पातळीवर पक्ष नेता होण्याचे स्वप्न ते उराशी बाळगतात. कामाची पावती म्हणून उमेदवारी मिळेल अशी त्यांची आशा असते. पक्षांसाठीही ते सोयीचे असते. अन्यथा, कार्यकर्त्यांची वर्णी कोठे लावायची या दुविधेत सगळेच पक्ष असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा एकूण पसारा मोठा आहे. हजारो जागांवर निवडणूक लढवली जाते. मतदारसंघगणिक राजकारण बदलत जाते असे म्हणतात.

युतीची घोषणा जितया लवकर केली जाईल तितकी राजकीय गणिते मांडणे सोपे जाऊ शकेल. जसे निदान मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तरी भाजप स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते जाणून असावेत. महायुतीमधील अन्य दोन पक्षधुरीण देखील ते जाणून असावेत. कदाचित त्यामुळेच बहुधा सर्वच राजकीय पक्षांचे पक्षप्रवेश जोरात आहेत. तरीही युतीची घोषणा सातार्‍यापुरती मर्यादित ठेवून ठाकरे बंधूंना काय साधायचे असावे? उद्धवसेना आघाडीतील पक्षांपैकी एक आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अन्य दोन पक्षांची प्रतिक्रिया आजमावणे हा त्यामागचा एक उद्देश असावा? राज यांना बरोबर घेतले तर आघाडीतील अन्य दोन पक्ष नेमकी काय भूमिका घेऊ शकतात? स्वागत करतात की नाही? याची लिटमस टेस्ट ते घेत असू शकतील.

मुंबई महानगरपालिकेपुरती काँग्रेसची भूमिका वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केली आहे. ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस जाणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा युतीकडे कसे बघतो हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. ते काहीही असो, उद्धवसेना असो वा मनसेना दोन्ही पक्ष स्वतंत्र राजकीय अवकाशाच्या आणि घवघवीत यशाच्या प्रतीक्षेत आहेत. ठाकरे आडनावाचे गारुड कार्यकर्त्यांवर अजूनही आहे हे दोघेही जाणून आहेत. त्याचा फायदा घ्यायच्या प्रयत्नात दोन्ही ठाकरे बंधू नसते तरच नवल. दोघांच्या भांडणाचा फायदा तिसर्‍याला होऊ नये असाही एक उद्देश असावा. युतीची घोषणा कार्यकर्त्यांसाठी आशादायक ठरू शकेल का हे येणारा काळच ठरवेल.

ताज्या बातम्या

पडसाद : आणखी एका कांदा समितीचा घाट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक कांद्याच्या समस्येवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच सचिव स्तरावर एका समितीची घोषणा करुन तसे राजपत्र प्रसिद्ध...