मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
येत्या 12 मार्च रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने अपेक्षेप्रमाणे संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आहे. उमेदवारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे या दोघांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी पाच उमेदवार देऊन भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 30 एप्रिल अशी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने काल 9 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. तर विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणार्या पोटनिवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले सुनील कर्जतकर हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. तर विवेक कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. भाजपने पक्षाच्या सरचिटणीस माधवी नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या यादीत संजय भेंडे यांच्याही नावाचा समावेश आहे.
प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणार्या प्रज्ञा सातव यांनी डिसेंबर 2025 मध्ये तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. ही पोटनिवडणूक सुद्धा बिनविरोध पार पाडणार आहे. पोटनिवडणुकीच्या जागेचा कार्यकाळ जुलै 2030 पर्यंत आहे.
जिल्ह्यातील आमदारांची संख्या 17 वर इतिहासातील विक्रम
जिल्ह्यात 12 विधानसभा आमदार आहेत. त्याशिवाय नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून संगमनेरचे सत्यजित तांबे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विधानपरिषदेतून कर्जत-जामखेडचे प्रा. राम शिंदे यांना संधी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यानंतर आता कर्जत जामखेडचे सुनील कर्जतकर आणि कोपरगावचे विवेक कोल्हे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे जिल्हयातील आमदारांची ताकद वाढली असून संख्या 17 वर गेली आहे. हा जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रम आहे. सर्वाधिक तीन आमदार कर्जत-जामखेड मतदारसंघाला मिळाले त्या खालोखाल संगमनेर, शेवगाव-पाथर्डीत प्रत्येकी दोन आमदार आहेत. आता कोपरगावला दोन आमदार होणार आहेत.
विधानसभेच्या आमदारकीसाठी काळे आणि कोल्हे कुटुंबियांतील संघर्ष वर्षानुवर्षे जिल्ह्याने पाहिला आहे. दोन्ही कुटुंबापैकी एकाच कुटुंबाला आमदारकीचा मान मिळत होता. मात्र प्रथमच या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना आमदारकीचा मान मिळत आहे. आमदारांच्या संख्येवाढीमुळे जिल्ह्यातील आमदारांचा आवाज बुलंद होणार आहे. शिवाय विकास कामांचा निधीही या वाढीव आमदारंच्या माध्यमातून वाढणार आहे.
अमित शाहांचा शब्द अन् फडणवीसांची भेट; विवेक कोल्हेंना मिळाले निष्ठेचं फळ
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणार्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपला पत्ता जवळपास निश्चित केला आहे. कोपरगावचे तरुण नेते विवेक कोल्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या खलबतांनंतर कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विवेक कोल्हे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आणि आग्रही होते. मात्र, राज्यातील महायुतीचे सत्तासमीकरण आणि पक्षाची भविष्यातील रणनीती लक्षात घेता, भाजपने त्यांना विधानसभा न लढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे, खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हे यांना दिल्लीत बोलावून घेऊन पक्षाची भूमिका समजावून सांगितली होती. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत कोल्हे यांनी त्यावेळी माघार घेतली होती. अमित शाह यांनी त्यावेळी दिलेल्या शब्दाची पूर्तता आता विधान परिषदेच्या उमेदवारीच्या रूपाने होत असल्याचे मानले जात आहे.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही विवेक कोल्हे यांच्या नावाची मोठी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी जातीय आणि सामाजिक समीकरणे जुळवताना पक्षाने इतर चेहर्यांना प्राधान्य दिल्याने त्यांची संधी हुकली होती. या पार्श्वभूमीवर, काल रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि विवेक कोल्हे यांच्यात झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट नसून, ती उमेदवारी फायनल करणारीच ठरली. या संधीमुळे अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या तरुण फळीला मोठी ताकद मिळणार आहे. निष्ठावान कार्यकर्त्याला आणि संयम दाखवणार्या नेतृत्वाला पक्ष कधीही वार्यावर सोडत नाही, हा संदेश या माध्यमातून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




