Friday, July 24, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २९ एप्रिल २०२६ - शिवरायांचे राजकारण आणि विखारी अज्ञानाचा विळखा

संपादकीय : २९ एप्रिल २०२६ – शिवरायांचे राजकारण आणि विखारी अज्ञानाचा विळखा

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक नाव नसून, ते अस्मितेचे, प्रेरणेचे आणि नैतिकतेचे सर्वोच्च अधिष्ठान आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून शिवरायांच्या नावाचा वापर करून ज्या प्रकारचे राजकारण खेळले जात आहे आणि त्यांच्या इतिहासाचे जे विकृतीकरण केले जात आहे, ते पाहता विद्वत्ता आणि संयम या दोन्ही मूल्यांचा महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे की काय, असा प्रश्न पडतो. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेली शिवीगाळ व धमकी आणि दुसरीकडे बागेश्वरबाबांनी महाराजांच्या कार्याबद्दल केलेले अज्ञानी विधान, या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुजाण परंपरेला काळिमा फासणार्‍या आहेत.

- Advertisement -

लोकप्रतिनिधी हा जनतेचा आरसा असतो, पण आमदार संजय गायकवाड यांनी ज्या भाषेत प्रकाशकांशी संवाद साधला, तो लोकशाहीला शोभा देणारा नाही. शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहून एप्रिल १९८८ मध्ये प्रकाशित करून दशके उलटली. या पुस्तकाने शिवरायांची रयतेचा राजा ही प्रतिमा जनमानसात रुजवली. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला त्यातील मांडणीबद्दल आक्षेप असेल, तर तो वैचारिक पातळीवर नोंदवायला हवा होता. मात्र, थेट फोन करून मारण्याची धमकी देणे आणि शिवीगाळ करणे हे शुद्ध मसल पॉवरचे प्रदर्शन आहे. ही केवळ एका व्यक्तीला दिलेली धमकी नसून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इतका राडा केल्यानंतर केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय संपवण्याचा प्रयत्न झाला. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षकाच्या भूमिकेत शिरतात, तेव्हा समाजात चुकीचा संदेश जातो. शिवरायांनी कधीही सत्तेचा वापर सामान्यांना घाबरवण्यासाठी केला नाही, हे या नेत्यांनी विसरू नये.

दुसरीकडे, स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणार्‍या बागेश्वर बाबांनी तर इतिहासाचीच मोडतोड केली. शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी समर्थ रामदास स्वामींकडे राज्य सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली, असे विधान करणे हे केवळ अज्ञान नसून महाराजांच्या अजोड कर्तृत्वाचा अपमान आहे. ज्या राजाने शून्यातून स्वराज्य उभे केले, जो मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडला आणि ज्याने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला, तो राजा थकला होता असे म्हणणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीबद्दल ऐतिहासिक मतभेद असू शकतात, परंतु महाराजांनी राज्य सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली, याला कोणताही भक्कम ऐतिहासिक पुरावा नाही. अशा प्रकारच्या विधानांमागे एक विशिष्ट विचारसरणी लादण्याचा किंवा सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो का? असा संशय निर्माण होतो.

आजकाल एक नवीन ट्रेंड पाहायला मिळतो, आधी जाणीवपूर्वक वादग्रस्त किंवा अपमानकारक विधान करायचे, समाजात तेढ निर्माण करायची आणि वातावरण तापल्यानंतर माफी मागून मोकळे व्हायचे. गायकवाड असोत वा बागेश्वरबाबा, दोघांनीही प्रक्षोभक कृत्यांनंतर माफी मागितली. पण ही माफी पश्चात्तापातून आलेली आहे की कायद्याच्या आणि जनक्षोभाच्या भीतीने? केवळ शब्दांची माफी पुरेशी नसते, तर अशा कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक सामाजिक आणि राजकीय बहिष्कार आवश्यक असतो. इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांना आणि लेखणीवर लाठी उगारणार्‍यांना जर जरब बसली नाही, तर भविष्यात कोणीही उठेल आणि महाराष्ट्राच्या दैवतांवर चिखलफेक करेल. महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे, जिथे तर्क आणि विवेकाला महत्त्व दिले जाते. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी शिवीगाळ करतो, तेव्हा तो स्वतःचा दर्जा तर घसरवतोच, पण त्याला निवडून देणार्‍या मतदारांचाही अपमान करतो. शिवरायांचे नाव घेणार्‍यांनी किमान महाराजांची मर्यादा आणि प्रशासकीय शिस्त आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच, जेव्हा सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला माणूस एखाद्या प्रकाशकाला धमकी देतो, तेव्हा संपूर्ण साहित्यिक विश्व असुरक्षित होते.

जर उद्या प्रत्येक पुस्तकावर अशाच धमक्या येऊ लागल्या, तर नवीन विचार मांडण्याची हिंमत कोणी करणार नाही. त्यामुळे समाजाने आणि सरकारने अशा वेळी लेखकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञानाभिमुख, शिस्तप्रिय आणि प्रगल्भ विचारांचे राजे होते. त्यांच्या नावाने राजकारण करताना किंवा प्रवचने देताना किमान अभ्यासाची जोड असणे आवश्यक आहे. आमदार गायकवाड यांची गुंडशाही आणि बागेश्वर बाबांचे अज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जिथे विवेकापेक्षा उन्मादाला जास्त महत्त्व दिले जाते. हे संपूर्ण प्रकरण केवळ दोन व्यक्तींपुरते मर्यादित नाही; ही वैचारिक गुंडशाही विरुद्ध प्रगल्भ महाराष्ट्र अशी लढाई आहे. महाराष्ट्र हे विचारांचे राज्य आहे. इथे तलवारीपेक्षा लेखणीला आणि दहशतीपेक्षा संवादाला महत्त्व दिले गेले आहे. ही प्रगल्भ वैचारिक परंपरा जपणे आणि महाराजांच्या नैतिक मूल्यांचे संवर्धन करणे, हीच त्यांच्या चरणी वाहिलेली खरी कृतज्ञता ठरेल. अन्यथा, शिवरायांचे नाव घेऊन, त्यांनीच शिकवलेल्या नीतिमत्तेला हरताळ फासणे ही नवी प्रथा पडायला वेळ लागणार नाही.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...