हीच भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल. अजितदादा आपल्यातून जाऊन काही तास उलटले आहेत, तरीही कार्यकर्ते आणि अवघ्या मराठीजनांचा त्यावर विश्वास बसत नाही. हे सत्य स्वीकारण्याच्या मन:स्थितीत मराठी मुलुख आजही नाही. कोणत्याही क्षणी दादांचा दूरध्वनी येईल आणि त्यांना उत्तर किंवा जाब द्यावा लागेल असेच अनुक्रमे कार्यकर्ते आणि प्रशासनाला वाटत असेल. जमेचे राजकारण करण्यासाठी अनेक चेहर्यांनी राजकारणात वावरावे लागणे ही सामान्य बाब आहे, हे मांडले जाणारे गृहीतक अजितदादांनी नेहमीच खोटे ठरवले.
दिलखुलास, बेधडक, स्पष्टवक्तेपणा, शब्दाचा पक्केपणा, धाडसी आणि अभ्यासू वृत्ती ही त्यांची काही स्वभाववैशिष्ट्ये. दोन चेहर्यांनी वावरणे हा त्यांचा स्वभाव नव्हताच. त्यामुळे अनेकदा वादही झडत. त्याची राजकीय किंमतही त्यांनी अनेकदा मोजली. पण त्यांना त्याची फिकीर नसायची. कारण ते जसे होते तसेच सर्वांच्या अनुभवास येत राहिले. पण त्यात चूक झाली याची त्यांना खात्री पटली तर माफी मागण्याचा उमदेपणाही त्यांच्याकडे होता. आघाडी धर्म पाळतानाही युतीतील पक्षाला जाहीरपणे खडेबोल सुनावण्याचा रोखठोकपणा त्यांच्याकडे होता. त्यासाठीची जोखीम घ्यायची त्यांची नेहमीच तयारी आढळायची. कार्यकर्त्यांचे मोहोळ हा कोणत्याही राजकीय नेत्याचा एका अर्थी प्राणच मानला जाऊ शकेल.
राजकारणात नेत्याला कार्यकर्ते मोठे करतात. किमान अजितदादा तरी तसे मानायचे. त्यांनी राजकीय कारकिर्दीत कार्यकर्ते जपले. माणसे जपली. माध्यमांनी अथवा विरोधकांनी युती-आघाडी किंवा निवडणुकांशी संबंधित विचारलेल्या प्रश्नांविषयी बोलताना, कार्यकर्त्यांना फार नाराज करणे मनाला पटत नाही, अशीच भावना ते नेहमी व्यक्त करत. हा वारसा त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याकडून घेतला आणि तो जपला होता. दांडगा जनसंपर्क हे त्यांचे आणखी एक स्वभावैशिष्ट्य. दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, ग्रामविकास, नियोजन अशा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूषवली. उपमुख्यमंत्री म्हणूनही दीर्घकाळ काम केले. खाते कोणतेही असो, त्या विषयाचा त्यांचा अभ्यास पक्का असायचा.
प्रशासकीय कामकाजाची त्यांना सखोल माहिती असायची. त्यांना माणसांची पारख असायची. त्या बळावरच त्यांची प्रशासनावर पक्की मांड होती. त्यांच्यासमोर एखादा विषय आला आणि त्यांना त्याची माहिती नसायची असे अधिकार्यांच्या कधीही अनुभवास आले नाही. किंबहुना, इतरांपेक्षा कांकणभर अधिकच त्यांच्या अभ्यास असायचा. त्यामुळेच लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलेले काम होणार आहे की नाही हे ते ठामपणे सांगू शकत. अचूक निर्णय घेत. ते प्रभावीपणे अंमलात आणत. समोर आलेल्या फाइल्स साठवून ठेवू नका, त्यावर निर्णय घ्या असेच ते अधिकार्यांना सांगत. राजकारणात अलीकडच्या काळात अभ्यासू वृत्ती हा दुर्मिळ गुण असणार्या मोजक्या लोकांपैकी ते एक होते. त्यांची कार्यक्षमता विलक्षण होती. झपाट्याने ते काम करायचे. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा. पहाटे वातावरण आणि माणसाचे मन देखील शांत असते. विचार किंवा काम वेगाने होते असे ते म्हणत.
अपघाताच्या दिवशी देखील ते भल्या सकाळी बारामतीला निघाले होते.. मैत्रीला ते विलक्षण पक्केहोते. कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या जिवलग मित्रांच्या मागे उभे राहिले. मग ते मित्र राजकारणातील-समाजकारणातील अथवा वैयक्तिक आयुष्यातील असोत. पक्ष किंवा त्यांचे नेते सत्तेसाठीच राजकारण करतात. राजकीय महत्वाकांक्षा फलीभूत व्हावी, या उद्देशाने त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली. त्यावेळी राजकीय धुरंधरांसह जनतेला कमालीचा धक्का बसला होता. पण युती केली म्हणून अजितदादांनी त्यांच्या वैचारिक भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या वारशाला त्यांनी कधीही तडा जाऊ नाही. त्या भूमिकेशी ते ठाम राहिले. अधिवेशन अथवा अन्य कोणत्याही कारणांसाठी त्यांचे नागपूरला जाणे व्हायचे. तेव्हा आघाडीचा धर्म या गोंडस नावाखाली देखील संघाच्या मुख्यालयाला भेट देणे त्यांनी नेहमी टाळले. त्यांनी नेहमीच विकास आणि विकासाचेच राजकारण केले. म्हणूनच बारामतीमधून ते सलग सात वेळा निवडून येत राहिले. त्यांच्या जाण्याने लाखो कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आधारवड अचानक उन्मळून पडला आहे. यापुढे ङ्गदादाफ अशी हाक कोणाला मारायची या भावनेने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यांच्या अकाली निधनाने अस्वस्थता असली तरी जनता त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. अजितदादांना श्रद्धांजली.




