Wednesday, February 4, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ३० ऑगस्ट २०२५ - भेटीगाठी ही तर संस्कृती..

संपादकीय : ३० ऑगस्ट २०२५ – भेटीगाठी ही तर संस्कृती..

‘अतिथी देवो भव’ ही मराठी मुलखाची संस्कृती. त्यामुळेच दहा दिवसांसाठी पाहुण्या आलेल्या गणपतीबाप्पांंचे स्वागत मोठ्या दणयात झाले. उद्या घरोघरी गौरींचे आगमन होईल. बाप्पा परत जातील तरी स्वागताचा माहोल काही दिवस कायमच राहील. सणासुदीच्या दिवसात एकमेकांच्या घरी जाणे, भेटीगाठी घेणे, स्वागताचा आनंद लुटणे ही परंपराच आहे. लोक परस्परांना आग्रहाचे आमंत्रण देतात. लोक जातातही. यामुळे नव्याने ऋणानुबंध रुजतात. रुजलेले अधिक घट्ट होतात. मैत्रीचे धागे जुळतात.

- Advertisement -

मग राजकारण्यांच्या भेटीगाठींची इतकी चर्चा लोक का करतात? राजकारणी एखाद्या ग्रहावरून आलेले असतात, असे लोकांना वाटते का? त्यापैकी अनेक जण प्रभावी नेते असतील. त्यांच्यामागे लाखो कार्यकर्ते असतील. त्यांच्या सर्व प्रकारच्या श्रीमंतीने लोकांचे डोळे दीपतही असतील. पण नेते कधी ना कधी सामान्य माणूसच होते हे लोक कसे विसरतात? त्या अर्थाने परंपरा आणि संस्कृती ते कसे विसरू शकतील? अजित पवारांनीदेखील नुकतेच ते ठणकावून सांगितले. राजकीय भेटीगाठी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. उगाच त्यातून अर्थ काढू नका, असे बजावले. राजकीय नेत्यांमागे कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो. त्यांनाही नातेवाईक आणि मित्र असतात.

YouTube video player

सार्वजनिक सणांच्या काळात तेही नेत्यांना त्या नात्याने आमंत्रण देतात. मग राजकारण्यांनी जायला नको? चार लोक भेटले की सुखदुःखाच्या गोष्टी होतात. भावनांचे आदानप्रदान होते. परस्परांची ख्यालीखुशाली विचारली जातेच की. सर्वांचे सर्वांशी सारखेच पटते असे कधी घडते का? कोणी अधिक जवळचा तर एखादा जीवाभावाचा असतो. काही लाडके आणि काही दोडके असायचेच प्रत्येकाचे. नेत्यांचेही तसेच असते की. मग राजकीय भेटीगाठींमागे नेहमीच संशयकल्लोळ असतो असे लोकांना का वाटत असू शकेल? अर्थात, आवळा देऊन कोहळा काढणे ही नेत्यांची खासियत असते.

बुद्धिबळाचा खेळाडू कोणतीही चाल निरुद्देश रचत नाही. नेत्यांना लोक कसलेले खेळाडूच मानतात. कोणतीही भेट ते निरुद्देश घेणार नाहीत हे लोकांना वाटते. अर्थात ते प्रत्येक वेळी खोटे नसते म्हणा. ते गृहीतक तर मुख्यमंत्र्यांच्या अर्धांगिनीनेदेखील जाहीर मान्यच केले आहे. एक मात्र खरे की, भूतकाळातील अशा काही भेटींमुळे राज्याच्या राजकारणाचा पट बदलला. त्या त्यावेळच्या राजकीय खेळ्यांनी अनेकांची राजकीय गणिते उधळली गेली. सत्ताधारी आणि विरोधी यातील सीमारेषा पुसून टाकली. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. स्थानिक पातळीवर तिकिटांच्या इच्छुकांची संख्या ‘दिन दुगुनी..रात चौगुनी’ अशी वाढत आहे.

एरवी पाच वर्षे कार्यकर्त्यांना कोणी विचारत नसले तरी निवडणुकीच्या काळात त्यांचा भाव चांगलाच वधारतो. तसेही त्यांच्या घराचे उंबरठे नेते झिजवतात. सणवार हे त्याचे निमित्त बनवले इतकाच काय तो फरक असू शकेल. लोक उगा त्या भेटींची चर्चा करतात. संशयकल्लोळ, राजकीय भूकंप, टाळ्या अशी विशेषणे बहाल करून त्या भेटीचे उगाचच गूढ बनवले जाते. नेते किती वाजता निघाले? किती वाजता पोहोचले? किती वेळ थांबले? त्यांनी एकमेकांकडे कसे पाहिले? त्यांची ‘बॉडी लँग्वेज’ कशी होती? अशा प्रश्नांचा रतीब लोक घालतात. नेत्यांनाही तेच हवे असते म्हणा. मानव संसाधन आणि पायाभूत सुविधांचा विकास हे नेत्यांचे मुख्य कर्तव्य. पण लोक मात्र राजकीय चर्चांना भुलतात. कोणता नेता भारी यावरून प्रसंगी वाददेखील घालतात. पण एकदा का निवडणूक पार पडली की तुम्ही कोण आणि आम्ही कोण, असा अनुभव लोकांना येतो.

हे सोयीचे वागणे लोकांना कधी आठवू नये अशी सर्वपक्षीय नेत्यांची इच्छा असणे स्वाभाविकच. तसेही सर्वपक्षीय नेत्यांचे ‘खायचे आणि दाखवायचे’ वेगळे असतात. त्यामुळे मुखाने जरी भेटीगाठींना संस्कृतीचे लेबल चिकटवले तरी या भेटींची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी नेतेच पिल्लू सोडत नसतील कशावरून? तेव्हा आता लोकांनीच शहाणे व्हायला हवे. त्यांच्या परिसराचा विकास का झाला नाही याचा जाब विचारावा. त्यांच्या एका मताची ताकद लक्षात ठेवावी. नेते त्यांच्यापैकीच एक आहेत याची आठवण ठेवावी हेच बरे. उगा प्रत्येक भेटीमागचा अर्थ शोधत वेळ कशाला वाया घालवायचा?

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...