वर्षानुवर्षे आणि विशेषतः पहलगाम घटनेनंतरच्या देशवासीयांच्या भावनेचे प्रतिबिंब क्रिकेटच्या मैदानावर उमटले.आशिया चषक स्पर्धेशी पहलगाम घटनेचा संदर्भ जोडला जाणारच होता. ‘खेळाच्या मैदानावर देखील ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे’, अशा शब्दात पंतप्रधानांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. मैदानावर ‘तिलक’ वर्माच्या दमदार खेळीने विजयाचा ‘तिलक’ सोपा केला. देशात भलेही वेगवेगळे वैचारिक मतप्रवाह असतील पण पाकिस्तान या मुद्यावर समाज एकवटतो.
एरवीदेखील भारत-पाकिस्तानचा सामना म्हणजे नागरिकांसाठी युद्धच असते. सामना सुरू असताना रस्त्यांवर सामसूम असते. भावनांचा पूर वाहात असतो. पहलगाम घटनेने त्या भावना अधिकच तीव्र केल्या आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळिकीचे जशास तसे उत्तर द्यावे आणि ज्याला ज्या पद्धतीने जमले त्याने त्या पद्धतीने पाकिस्तान मात द्यावी असेच १४० कोटी लोकांना वाटते. तेच खेळाडूंना देखील वाटते हे पाकिस्तान बरोबरच्या मैदानावरच्या प्रत्येक सामन्यात आणि विजयानंतरच्या संघ म्हणून घेतलेल्या भूमिकेवरून अधोरेखित होते. संघातील आघाडीच्या खेळाडू अभिषेक शर्मा याने त्याला शब्दरूप देखील दिले.
अंतिम सामन्यातील विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत भावना व्यक्त करताना अभिषेक म्हणाला, सूर्यकुमारने आणलेला आभासी चषक आम्हाला दिसत होता आणि त्याचे वजनही जाणवत होते. खरेच आहे ते. भारतीय संघावर देशातील १४० कोटी लोकांच्या पाकिस्तानविषयीच्या भावनांचे ओझे होते ते. देश आणि खेळ हे दोन वेगळे घटक नाहीत. खेळाडू देशासाठीच खेळतात. खेळाला राष्ट्राभिमानापासून वेगळे काढले जाऊ शकत नाही हा नवीन धडा खेळाडूंनी घालून दिला. तोच यापुढे निदान पाकिस्तानच्या बाबतीत तरी मैलाचा दगड मानला जाईल. संघ कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याचे स्पर्धेचे पूर्ण मानधन लष्कराला दिले. काही गोष्टी सगळ्याच्या पलीकडे असतात.
देशाच्या पुढे काहीच नसते अशा भावना त्याने या स्पर्धेत व्यक्त केल्या होत्या. पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर जी जी कृती केली त्याला आपल्याही खेळाडूंनी तसेच उत्तर दिले. मनात नसतानाही एकमेकांना आलिंगन देऊन आभासी खिलाडूवृत्तीने प्रदर्शन करणे सर्वांनी नाकारले. जे मनात नाही ते यापुढे कृतीत देखील नाही या देशवासीयांच्या भावनेशी खेळाडू प्रामाणिक राहिले. कदाचित त्यामुळेच आशियाई क्रिकेट परिषद व्यवस्थापनाला देखील काही गोष्टी बदलाव्या लागल्या. उदाहरणार्थ, एरवी नाणेफेकीवेळी एकच सूत्रसंचालक असतो. पण भारत पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये रवी शास्त्री आणि वकार युनुस असे दोन सूत्रसंचालक ठेवावे लागले.
भारताच्या चषक न स्वीकारण्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करावे लागले. खेळाडूंनी मैदानावरील त्यांच्या सांघिक वर्तनाची जबाबदारी देखील घेतली. तो संघाचा मैदानावरचा सामूहिक निर्णय होता. आम्हाला तशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या किंवा तशा कोणत्याही ई मेलबद्दल मला माहित नाही असे पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर सूर्यकुमार यादवने दिले. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी देशवासीयांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. विजयानंतरचा हाच जल्लोष सगळ्या देशाने साजरा केला. रात्री उशिरापर्यंत फटाके वाजत होते. भारताची सगळ्या जगात दखल घेतली जाते त्याचे कारण भारताची क्षमता, ताकद, भारताची वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय क्रिकेटचा संघ बलाढ्य मानला जातो.
एकदिवसीय संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने चार वेळा विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. दोनदा विश्वचषक जिंकला आहे. टी-२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक विजेतेपद पटकावले आहे. संघातील अनेक खेळाडू जागतिक क्रमवारीत सातत्याने स्थान मिळवत असतात. विक्रम रचत असतात. पराक्रम गाजवत असतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जेव्हा पहिल्यांदा आयपीएल भरवली तेव्हा तो जागतिक क्रीडा व्यासपीठांवर चर्चेचा विषय ठरला होता.
खेळाडूंच्या लिलावाची संभावना केली गेली होती. आज तेच मॉडेल अनेक देशांनी स्वीकारले आहे. या साखळी सामन्यांमध्ये खेळणे विविध देशांमधील खेळाडूंसाठी प्रतिष्ठेची बाब बनले आहे. हीच समग्र ताकद हाच संघाचा परिचय असतो. ती संघाने आणि खेळाडूंनी स्वपराक्रमाने मिळवली आहे. त्याच ताकदीच्या परिचय आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने जगाला पुन्हा एकदा झाला इतकेच. विजयी संघाचे अभिनंदन.




