संपूर्ण पृथ्वीवर आच्छादले जाईल इतका प्लास्टिकचा कचरा साठत आहे. एका सामाजिक संस्थेने लोकसहभागातून मालवण परिसरातील समुद्रातून सुमारे 300 किलो प्लास्टिकचा कचरा संकलित केला. कसला होता तो कचरा? प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, काचेच्या बाटल्या आणि वेदनादायी म्हणजे त्यात अडकून मृत पावलेले निष्पाप सागरी जीव. उपरोक्त कचरा मानवनिर्मित आहे आणि माणसाच्या अक्षम्य बेजबाबदारपणाचे ते उदाहरण आहे. जे अवतीभवती सर्वत्र आढळते.
काल परवाच राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस सर्वत्र साजरा झाला. ‘स्वच्छ हवा..स्वच्छ पृथ्वी : शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने उचललेले एक पाऊल’ अशी या दिवसाची संकल्पना सांगितली जाते. प्रदूषण नियंत्रित ठेवायचे असेल तर शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त आहे यावर जगभरातील संशोधक आणि कार्यकत्यांचे एकमत आढळते. तथापि सामाजिक भान हरवलेल्या समाजाला ती संकल्पना आणि त्यातील मतितार्थ समजावून सांगणे हेच मोठे आव्हान आहे.
मुळात शाश्वत जीवनशैली म्हणजे काय हेच सामान्यांना त्यांना कळणार्या भाषेत समजावून सांगणे गरजेचे आहे. पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल अशा जीवनशैलीचा स्वीकार ही त्याची अत्यंत ढोबळ व्याख्या सांगितली जाऊ शकेल. अशी जीवनपद्धती स्वीकारली जाऊ शकते याची उदाहरणे समाजात आढळतात. तथापि निरक्षरता, बेरोजगारी आणि रोजच्या जगण्याची लढाई लढणार्या लोकांना शाश्वत जीवनशैलीकडे वळवणे ही फार दूरची गोष्ट ठरू शकेल का? मुळात लोकांना त्यांच्या कोणकोणत्या सवयींनी प्रदूषण वाढू शकते आणि ठरवले तर त्यांचा त्याग करणे शक्य होऊ शकते हे पटवून देणे आवश्यक आहे अशा कोणत्या सवयी आहेत आणि त्यांना पर्यावरणपूरक पर्याय कोणते हे मनामनावर बिंबवले जायला हवे.
शाळकरी मुलांपासून याची सुरुवात करणे अधिक लाभदायी ठरू शकेल. कारण ते उद्याचे नागरिक आहेत. मुलांचे वर्तन देखील याबाबतीत बेजबाबदार आढळते. कारण ते त्यांच्या पालकांकडे बघत मोठे होतात. पालकांच्या वर्तनाचा त्यांच्यावर प्रभाव असतो. प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे? ती कमी करण्यात नागरिक कसा सहभाग नोंदवू शकतात? प्रदूषणाचे परिणाम त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात हे मुलांना शाळाशाळांतून पटवून दिले जाऊ शकेल. मुलांची मने घडली तर सामाजिक बदल तुलनेने शक्य होऊ शकतात. नाशिक जिल्ह्यातील एक उदाहरण घेण्यासारखे आहे.
मानव आणि बिबट्या यांचा संघर्ष नवा नाही. वनविभाग आणि काही सामाजिक संस्था यांनी काही वर्षांपूर्वी ‘जाणता वाघोबा’ असा शाळाशाळांमधून उपक्रम राबवला. मुलांना त्या दृष्टीने सज्ञान बनवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना ‘बिबट्या दूत’ म्हटले गेले. मुले शिकली आणि त्यांनी त्यांच्या पालकांना त्यात सहभागी घेतले. तात्पर्य, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुजाण पिढी घडवण्यावर देखील अधिक भर दिला जायला हवा. जेणे करून सामाजिक भान जपण्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवणे शक्य होऊ शकेल आणि ती पिढी देखील त्यासाठी सक्षम बनू शकेल. कारण पर्यावरण प्रदूषण वाढतच जाईल अशीच दुश्चिन्हे आहेत.