नाशिक | विजय गिते | Nashik
नाशिक शहर (nashik city) काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचे (City President of Congress) भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. या पदाच्या निवडीचे भविष्य सांगणारांकडेही आता ‘ मुहूर्त ’ शिल्लक नाही,अशी काहीशी अवस्था या पदाची झाली आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही, अशी अवस्था या पदाची होऊन बसली आहे.
(नव्हे तर ती करून ठेवली आहे) आज करू उद्या करू,असे आश्वासन देणारे 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा नाशिक (nashik) भेटीवर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी पुन्हा एकदा शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष नेमणुकीला हुलकावणी दिल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याचाच फटका मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या ‘ आझादी की गौरव पदयात्रे ’ ला बसला. नेतृत्वाविना शहर काँग्रेस (congress) असल्यामुळे कार्यकर्तेही सैरभैर आहेत. परिणामी या पदयात्रेकडे काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे प्रकर्षाने जाणवले.
यामुळेच ‘आझादी की गौरव पदयात्रे’ची जबाबदारी घेतलेल्या काही स्थानिक पदाधिकार्यांनी कार्यक्रमाची आखणी करतांना विश्वासात न घेतल्यामुळेही या पदयात्रेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा पक्ष कार्यकर्ते करू लागले आहेत. काँग्रेस पक्षाच्यावतीने (congress party) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पदयात्रा काढण्याचे घोषित केले होते.
त्यानुसार 9 ऑगस्टपासून शहरातील विविध भागांत काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांकडून (Block President) पदयात्रा काढण्यात आली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामागे देखील पक्षांतर्गत गटबाजीची किनार असल्याची तक्रार केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शहर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या उपस्थितीत काढलेल्या पदयात्रेत देखील कार्यकर्त्यांची वाणवा दिसून आलीच.
पदयात्रेच्या प्रारंभी शहराच्या प्रमुख पदाधिकार्यांसह सिडकोतील (CIDCO) कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मात्र, पदयात्रा पुढे सरकल्यावर तेथील कार्यकर्ते पसार झाले, तर काही पदाधिकार्यांनीही काढता पाय घेतला. दुपारच्या जेवणादरम्यान काही काळ पदयात्रा विश्रांतीसाठी थांबल्यावर ही संख्या आणखीन रोडावली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील नाराज झाल्याची चर्चा रंगली.
या पदयात्रेचे काही स्थानिक पदाधिकार्यांनीच नियोजन केले असून, त्यात पक्षाच्या विविध आघाड्या व सेलच्या अध्यक्ष पदाधिकार्यांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार केली जात होती.त्यामुळे महिला, युवक, अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वा पदयात्रेपासून दोन हात राहिल्याचेही बोलले जात आहे.मात्र,आगामी महापालिका निवडणूक (Municipal election) डोळ्यासमोर ठेवून तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांनी या पदयात्रेत हिरिरीने भाग घेत मिरवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
शहराध्यक्ष पदाचा तिढा आज सोडवू,उद्या सोडवू अशी घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नाशिक शहरात दोन वेळा दौरा होऊनही नवीन शहराध्यक्ष त्यांना अजूनही देता आलेला नाही.नाशिक शहराला नवीन शहराध्यक्षपद मिळत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.गुरुमित बग्गा यांच्यानंतर शैलेश कुटे यांच्या नावालाही स्थानिक काँग्रेस पदाधिकार्यांनी विरोध दर्शविला आहे.
यामुळे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आता मीच एकतर्फी निर्णय घेतो,असा इशारा नाशिकच्या पदाधिकार्यांना दिला खरा मात्र,तो सत्यात कधी उतरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकमधील निवडक पाच, ते सहा झारीतील शुक्राचार्यामुळे शहराध्यक्षपदाचा पेच सुटत नसल्याने नाशिकच्या पदाधिकार्यांवर नाराज झालेल्या प्रदेशाध्यक्षांनी आता धाडसी निर्णय घेण्याची तयारी ठेवली आहे.ती सत्यात उतरण्याची वाट कार्यकर्ते पहात आहे.